Saturday, 28 December 2019

मन पाखरु..पाखरु...

मन पांखरू पांखरूं
त्याची काय सांगूं मात ?
आतां व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायांत....

अशीच काहीशी गत हा मिसळणाचा, मसाल्याचा डबा आज भरताना झाली. या डब्यातले काही जिन्नस तळाला गेले होते. वेळ मिळताच डबा भरायला घेतला.
ज्या डब्याला दहावेळा उघडल्याशिवाय भारतीय, महाराष्ट्रीयन स्वैपाक होऊ शकत नाही तो तिखट-हळद-मसाल्यांचा डबा. सातत्याने हाताळून जरासा कळकटलेलाच असतो. तसं त्यातल्या वाट्या काढून बाहेरचा डबा जरा सटीकपणे धुतला जातो म्हणा अधूनमधून.
पण या हळद-तिखट-जिरे-मोहरी-मसाला-मेथ्या-उडदाने भरलेल्या वाट्यांचा नंबर तसा कधीतरीच लागतो. त्यात परत आदला बदल झालेल्या त्यांच्या चमच्यांमुळे, जरा सांडलवंडीमुळे एखाद्या शाळकरी मुलीच्या रंगपेटीसारखीच अवस्था या डब्याची झालेली असते. 
बरं नुस्ते रंगच नाहीतर आतल्या जिनसांच्या दरवळीची पण सरमिसळही झालेली असते. 

स्वैपाक घरातल्या इतर त-हेवाईक भांड्यांच, त्यांच्या निरनिराळ्या आकारांच, मेटलचं, कुठून कधी आणि कसे आणलेतच्या कथांचं भरपूर कवतिक होतं असतं. पण या स्वैपाक घराचा आत्मा असलेल्या डब्याला काही कथाच नसते हो. म्हणजे अतिपरिचयात अवाज्ञा झाल्यासारखीच यांची गत असते. कधीतरी लग्नात पुढे मागे हा डबा घरात येतो. पटापटा हळद-तिखटाने, जिरे-मोहरीने भरला जातो आणि तदनंतर हा डबा आणि डब्यातल्या मसाल्यांचा वापर कधी हातवळणात बसतो हे त्या नवथर विवाहितेला  देखील कळत नाही. हातासरशी उघडायचा डबा की चमचा-अर्धा-पाव चमचा यातले मसाले कढईत टाकले की लगेच हा डबा हातावेगळा होतो. जी गत डब्याची तिच गत आतल्या जिनसांची. वैयक्तिकरित्या कायम उपेक्षित.

आता हे बघा तिखट. मस्त पैकी दळदार लालचुटुक रंगातली सुक्या मिरच्यांची पावडर. तिखटपणा साठी निझामबादी मिरच्या प्रसिद्ध आहेत तर रंग आणि झणका असं दोन्हीसाठी नंदूरबारी मिरच्या प्रसिद्ध आहेत. अर्थात मधूनच सांगलीवाल्यांचीही 'आम्हीच थोर'ची टिमकी ऐकायला येते बरंका. 
आणि हो, हल्ली ते घराघरातनं बेडग्या मिरच्यांचही फार स्तोम वाढलंय म्हटलं. आणि कोण्या दिड शहाण्याने मिरच्यांच्या धुरीची कल्पना शोधलीये देवजाणे. नक्कीच कुणीतरी पुर्षाच काम असावं हे. भले इकडे 
स्वैपाकघरात कोथिंबीरीची काडी मोडणार नाहीत पण हे असले जालीम शोध तेच लावू जाणे.
ही बघा रवाळ पिवळी धम्मक हळद. हिच्या दर्शनानेच पाव तब्येत बरी होते. उग्रट पण औषधी वासाने पुढची पाव तब्येत अजून बरी होते. उरलेली अर्धी तब्येत हिच्या सेवनाने बरी होते. अश्शी गुणाची आहे म्हणता ही हळद. आता मेंदी-आलत्याची कितीकं कवतिकं का होईनात, पण हळदीने रंगलेल्या सुगंधी तळहातांना बघून जो रोम्यांटिक फिल येतो त्याला तर तोडच नाही हो. हं..आता इथे मात्र पच्चीम माराष्ट्राच्या हळ्दीला खरोखर तोडच नाई. 
चवी ढवीचं सोडून द्या, हळद पाहिलीकीच आपलं तरी मन प्रसन्न होतं बुवा. सहाणेवरचा अर्धवट झिजलेला हळकुंडाचा तुकडा गृहिणीची सौंदर्यासक्त समजेला भलतच ठळक करतो.
परत तिच कथा पी हळद आणि हो गोरी या म्हणीची. आता या म्हणीला अनेक सामाजिक संदर्भ असले तरी हळदीच्या औषधी गुणांनी शरीरावर होणा-या अंतर्बाह्य परिणांमामुळे या मिसळणीच्या डब्यातलंच काय आपल्या आयुष्यात देखील अनन्यसाधारण स्थान या रुपवान हळदीला आहे.

आता हे बघा जिरे-मोहरी. हे म्हणजे आपल्या आयुष्यातल्या नवरा-बायको सारखेच जोडीने असणार. जिरे आपले मंद चवीचे, असून नसून सारखेच असल्यासारखे. अगदीच भाजले कुटले तर जरा दरवळून उठणार. पण मोहरीचा झणका काही विचारु नका. संसारात मुरलेल्या(इथे भरडलेल्या असं वाचलं तरी चालेल हो) बाई सारखीच ही मोहरी वा तिची डाळ उत्तरोत्तर झणकी, सणकी होत जाते. उगा आवडते म्हणून जास्तीचा घास घ्याल तर मस्तकात सण्णकिनी फणकारा गेलाच समजा. 
आणि काय ते हिचं त्या गरम तेलात तडं..तडं... तडतडणं ? 
बापो ! ही तडकायला लागली की जरा अंतर राखूनच रहावं बरं.
अर्थात या तडतडी शिवाय न स्वैपाकात मजा न संसारात राम. 
पण हिच्या मातकट, गुळमुळीत रुपावर जाऊ नका हं. मोहरीची झाडं-शेती पायलीये का कधी ? 
अहो...तो काटा-चमच्याने भाकर तोडणारा करण जोहर पण या मोहरीच्या पिवळ-पोपटी शेतीवर जाम फिदा हाय म्हट्लं. झाडून सगळ्या हिरॉईनी आणि हिरो पंजाबातील या मोहरीच्या शेतात एकदा तरी नाचून जातातच. आणि काय तो सरसों साग आणि मक्के की रोटी लागते. व्वा ! एकदा चाखूनच बघा. गारठलेल्या हिवाळ्यात तर या पदार्थाला तोड नाही. 
पण हां...हे पदार्थ करावेत पंजाब्यांनीच. उगा खायला आवडतो आणि करायला जमतो म्हणून कुणीही हा पदार्थ करायचा घाट घालू नये बर्का. 
जेनो काम तेनो थाई, दुजा करे तो गोता खाई. आपण मराट्यांनी फक्त मोहरीचं तेल तेही हिवात मसाजला वापरावं. या तेलाचा आणि आपला येवढाच संबंध. बाकी तडतडी मोहरी तं पाचवीलाच पुजलेली आहे म्हणा आपल्या. So no complaints.

आता हा रवाळ काळा मसाला. याचं किती म्हणून कवतिक असावं मी म्हणन्ते ? व्यक्तीपरत या मसाल्याचे नुख्से असतात. परत सासर माहेरची इस्पेशालिटी असते ती वेगळीच. त्यात परत कोल्हापूरचा वेगळा, तर सोलापूरचा निराळा. नागपुरवाले आपल्याच तो-यात तर मराठवाडी आपल्याच मिजाशीत. 
आणि मुंबई-पुणेवाले ? बापा, यांची मेट्रोपॉलिटन शान तर अजूनच न्यारी. काही करायचं नाही धरायचं नाही. चटपटीत शब्दात समोरच्याचं, त्याच्या पाककौशल्याच कवतिक केलं की समोरचा गपचिप किलोभर मसाला देऊन यांची बेगमी करुन देणार. त्यामुळे काळ्या-गोड्या मसाल्यांचे यांचे स्वत:च्या अस्मितेचे जालिम नुख्से नसले तरी इथुन तिथुन वानोळ्यात आलेल्या बारा गावच्या मसाल्यांमुळे यांची आयतीच चंगळच असते. 
असो असते एकेका शहराची पण ललाटरेषा भार्री.
आता या काळ्या मसाल्याचा शोध पण गरजेतून लागलाय. आल्या गेल्याच करताना गृहिणीची तारांबळ उडू नये आणि पावन्याचं अगत्य देखील निगुतीने व्हावं म्हणून हा तयार मसाला हाताशी अस्तोय. पण या मसाल्याची लोकप्रियता बघून कितीतरी मसाले आता जन्माला आलेत. कांदा-लसुण, पुलाव-बिर्यानी, चिकन-मटन मसाला, ओला-सुका मसाला, लाल-हिरवा मसाला...आता इतके खंडीभर तयार मसाले मिळाले तं बायांनी त्या पाटा-वरवंटा, खलबत्त्याचं आणि रिकाम्या वेळेचं करायचं काय ? 
असो आपण किती ताप करुन घ्यायचा डोक्याला ? आपल्याही डोक्याला लिमिट आहे की !

आता हे पांढरे उडीद आणि कडकडीत मेथ्या. हे दोन्ही जिन्नस म्हणजे सासर-माहेरच्या बुजुर्गांसारखे असतात. महत्वाचेही असतात. पण रोजही नको वाटतात. 
बस्स ! इधर उधर का प्रेंझेंसही काफी होता है. 
तसं मोसमाप्रमाणे मेथ्या आणि उडीद झकासच लागतात म्हणा. पण तेही अधूनमधूनच. तरीपण मेथीची भाजी, मेथीदाणे जास्त जवळचे असतात आणि वाटतात पण. 
या डब्यातली उडीदडाळ म्हणजे एन आर आय नातलगांसारखे. फक्त काही काळासाठीच उपयोगी. त्यामुळे ब-याच घरात या ठिकाणी वा वाटीत कधी हिंग असतो तर कधी खोब-याचे तुकडे, सुक्या मिरच्या असतात तर काही जणं चक्क मीठही ठेवतात. 
या मिसळणीच्या डब्यात कशाला मीठ पाहिजे ? 
त-हेवाईक का असेना पण चांगले सहा-सात जणं सुखाने एका डब्यात नांदत असताना हा मीठाचा खडा इथे पाहिजेच कशाला. ठेवाव्यात आपल्या चार सहा मिरच्या नाहीतर खोब-याची वाटी. या हळद-तिखटाने, मसाल्याने बरबटलेल्या खोब-याच्या वाटीलाही एक छान दरवळ लागलेला असतो. चिंच-गुळाच्या आमटीला या मिसळणीच्या डब्यात मुरलेलं खोबरंच लावावं. फार सुरेख चव येते. 
आणि हो, एक सांगायचच राहिलं, इथला चमचा तिथे गेला, हळदीचा जि-यात गेला, मसाल्याचा उडदात गेला तर, किंवा मोहरीचे दाणे हळदीत गेले, मेथीचे दाणे तिखटात पडले तरी फार अवडंबर माजवू नये. तसंही मिसळण्याच्या डब्यात काय, आयुष्यात देखील चमच्यांना फार महत्त्व देऊ नये. 
या अशा उन्नीस बीस गलथानपणानेच स्वैपाक अजून रुचकर होतो हा अनुभवाचा सल्ला आहे.😉

No comments:

Post a Comment