पॅडीज मार्केट.
सिडनी. ऑस्ट्रेलिया.
ऑस्ट्रेलियातल्या उत्तरेकडील केर्नस या जंगली भागातून सिडनीत परतल्यावर आम्ही साधारण सहा सात दिवस एक दिवसाआड एक असे लग्नघरीच बिझी होतो. त्यामुळे मधला एखादा दिवस फ्री मिळाला की पटकन फिरुन यायचो. ज्यांच्याकडे उतरलो होतो त्यांच्या घराजवळच रेल्वे स्टेशन होते. त्यामुळे त्यांनी कारने स्टेशनपर्यंत सोडलं की आम्ही निश्चिंतपणे भटकंती करुन यायचो. सबवेचं सुंदर जाळं. कुठेही गर्दी, रेटारेटी, घोळ नाही. त्यामुळे हे प्रवास बिनघोर आरामात झाले. डिसेंबर तोंडावर आलाय त्यामुळे क्रिसमसची तयारी जिकडे-तिकडे सुरु झाली आहे. इथल्या ब-याच स्टेशन्सवर बरीच ग्राफिटी चितारलेली आहे. बहुतांशपणे स्टेशन एरियातलं वैशिष्ट्य अधोरेखित करणारी सुटसुटीत आणि रंगबिरंगी चित्र मोहवून टाकतात. अर्थात अधूनमधून काळ्यारंगातली विद्रोही ग्राफिटी काही ठीकाणी दिसलीच.
तर असेच एका मधल्या दिवशी डार्लिंग हार्बर जवळच्याच पॅडीज मार्केटला गेलो. हातात फारसा एजंडा नव्हता. त्यामुळे रिलॅक्स्ड होतो.
सिडनीतलं मध्यवर्ती भागातलं हे मार्केट म्हणजे आपल्या काळबा देवी किंवा तुळशीबागेची सुधारीत आवृत्ती. हे मार्केट दोन-तीन मजली आहे म्हणे पण आमची एकाच मजल्यात खरेदी युक्त हौस भागली आणि दिवस सरला.
भव्य इमारतील्या बेसमेंटपासूनच बाजार गच्च भरलेला. ऑस्ट्रेलियन शिस्त इथे मोडीत निघालेली. अर्थात आपल्या इतकाही गदारोळ नव्हता. पण पाऊल टाकताच at home feel आला. दाराशीच एक फिलीपिनो मल्टीपरपज पिलर प्रात्यक्षिकासह विकत बसला होता. सरसर सालं निघणारी काकडी, गाजर, आणि कोबी व इतर भाज्यांच होणारं तरत-हेचं पिलिंग, श्रेडिंग बघून झटक्यात स्वत:साठी व इतरांनाही द्यायला म्हणून प्रत्येकी तीन-चार पिलर्स घेऊन शॉपिंगचा शुभारंभ करुन टाकला.
दाटीवाटीने असलेली, मालाने खचाखच भरलेली चिंचोळी दुकानं. सगळं मार्केट फिलिपिनो, थाई, जापानीज, चिनी, इंडोनेशियनांच्या ताब्यात. त्यातही महिला विक्रेत्या जास्तच. कपडे, चपला, पर्सेस, हॅन्डीक्राफ्ट, एॅबओरीजिनल आर्टच्या वस्तु, खेळणी, इलेक्ट्रॉनिक वस्तू...थोडक्यात संसारोपयोगी सगळ्या गोष्टी तिथे मिळत होत्या. फार स्वस्त नाही पण ब-यापैकी रिझनेबल किंमतीत. आम्ही हिरण्यला डोळ्यापुढे ठेवून सिंथेटिक मास्कस विकत घेतले. काही प्रिंटेड एॅबओरीजिनल आर्टच्या पर्सेस, पाऊचेस घेतले. एका खेळण्याच्या दुकानात शिरलो. अगदी छोटी छोटी प्लॅस्टिक खेळणी, खुपशी तर कार्टुनमधली कॅरेक्टर्स. विक्रेती एक हसरी चिनी. दुकान खरंतर या महिलेची मुलगी चालवते. पण ती कुठेतरी बाहेर गेल्यामुळे चिनी माताजी दुकान सांभाळत होत्या. भाषेचा गंध नाही. आमचं तिला कळेना, तिचं आम्हाला कळेना. तरी खाणाखुणा करुन खिंड लढवली. लायटर मागितला. उंई..उंई...करत विविध प्रकारचे लायटर्स दाखवले. विमानातही हे लायटर नेता येतं हे पटवायला उंई..उंई...करत तिने त्या चिंचोळ्या आणि खच्चून भरलेल्या दुकानात चक्क पळून दाखवलं. तिला काय सांगायचं आहे हे शेवटपर्यंत कळले नाही. पण प्रत्येकच चौकशीला तिच्या उंई..उंईच्या हस-या आणि उत्साही उत्तराने आमची भलतीच करमणूक झाली त्यामुळे एक झक्क लायटर घेत, झटपट सेल्फी घेत तिला टाटा केला. त्या लुटूलुटू चिनीच्या उंई, उंईने आमची नंतरही खूप करमणूक झाली. आया इथुन तिथुन सारख्याच.
तरत-हेच्या वस्तू बघत, माणसं निरखत, खरेदी करत दिवस कसा गेला कळलंच नाही. इथे सबवेचं सर्वदूर जाळं असलं तरी डार्लिंग हार्बरला भरपूरच पायपीट होते. दिवसभर फिरुन दमलो. मग जरा आडगल्लीतल्या कॅफेटेरियात डोकावलो. उंच व देखण्या इमारती, विस्तिर्ण झाडं, सुबक स्वच्छ रस्ते-गल्ल्या, ठीकठीकाणी असलेले बसण्यासाठीचे बेंचेस, निरनिराळी शिल्प, काही गरजू स्ट्रीट परफॉर्मर्स आणि या सगळ्यांना व्यापून राहिलेला कॅपिचिनो कॉफीचा सुवास. या सुवासानेच थकवा पळतो. तरी आम्ही लगबगीने घरी परतलो कारण आम्हाला वधुच्या कुटुंबियांसाठी घरचं केळवण करायचं होतं. परत सबवेमधे सुखाची जागा. निवांत गप्पा मारत परतलो.
.
No comments:
Post a Comment