Wednesday, 11 December 2019

साथी हाथ बढाना...

साथी हाथ बढाना...

ओह ! परत फाईल वरचं राहिली वाटतं.
लेटिशिया..प्लिज वर जाऊन त्या मनीप्लांट जवळची माझी डेंटिस्टची फाईल आणतेस का ?
हो...लगेच आमची लेटिशिया हरणासारख्या टणटण उड्यामारत वरच्या मजल्यावर गेली पण एका झटक्यात (गोंधळ होऊ न देता) फाईल घेऊन परत दुडूदुडू खाली आली पण.
आता ही लेटिशिया एक ब्राझिलियन सुकुमार षोडशा. इतकी छान रमली आहे आमच्या घरात. एकतर सध्या तिला भरतकामाने फारच झपाटून टाकलंय. 
रॅप अराऊंडचा ब्लॅक अँड व्हाईट ब्लॉक प्रिंटच्या स्कर्टवर चटकमटक भारतीय रंगातल्या रेशमाने भरतकाम करत आहे. सध्या साखळी टाक्यांनी रेषा भरत आहे. अगदी एकदोनदाच चुकली पण आता छान झपाटल्यासारखी सुरेख साखळी टाका करत आहे.

कधीही, कुठल्याही कामाला, मदतीला तयार. तेही हसतमुखाने. होस्ट पॅरेंट म्हणून हा फरक भारतीय मुलं-मुली आणि परदेशी मुलं-मुलींमधे फार प्रकर्षाने जाणवतो. 
एका आवाजात ही मुलं-मुली मदतीला तयार असतात. कुठलंही काम सांगा कुठलीही जाणवेल अशी तक्रार न करता, वैताग न दाखवता, सबबी न सांगता ही मुलं मदतीचा हात पुढे करतात. आणि एकदा काम समजलं की दुस-यांदा न सांगायला न लावता ते काम आटोपशीरपणे पूर्ण संपवतात. 

सध्या भाजीबाजारात पालेभाज्या, मटार-तुर शेंगा भरपूर आल्या आहेत. बाजारात सुध्दा it's okay म्हणत अवजड सामान उचलतील, शिस्तीतच गाडीत ठेवतील, घरात आणतील, भाजी-सामानाच्या सॉर्टिंगला मदत करतील. लगेच भाज्या निवडायला, मटार सोलायला बसतील. हातात घेतलेलं कामही निटसच करतील. लगेच कचरा डस्टबीनमधे टाकतील, टेबल पुसून घेतील. आता कुणालाही (विषेशत: भारतीय मुलांना आणि पुरुषांना) वाटेल त्यात काय इतकं. 
पण आपली भारतीय मुलं अशी समजूत उमजून नाही वागत. (We all need to introspect here) 
One always have to ask or demand for their help, and that to at every step till the work finishes.

होतं कधी तरी असं. 
दोन-तीन मेथीच्या-कोथिंबीरीच्या गड्ड्या, किलो दोन किलो मटार सोलणं, बाकी भाजीबाजार आवरणं, घरातली बाकी कामं...अगदी थकायला होतं. 
पण ही एक्स्चेंजमधे आलेली मुलं तुमची धावपळ जाणवली तर लगेच मदतीचा हात पुढे करतात. आता व्यक्तीपरत्वे आणि पुरुष-स्त्री या संदर्भात उन्नीस बीस फरक असतोच. पण कुठलंही रोजचं रुटीन काम किंवा एखादं जास्तीचं काम घरातल्या व्यक्तीवर पडत असेल तर समजून उमजून पुढे येणं, मदत करणं आणि ख-या अर्थाने हसतखेळत, नाकदुऱ्या काढायला न लावता एखादं काम करणं आणि सततच मदतीची हाक देऊन, चुचकारत एखादं काम कसं का होईना पण करवून घेणं यात जमीन अस्मानाचा फरक असतो.

आपल्याकडे तसंही घरकामाला, शारिरीक श्रमांना तुच्छ लेखलं जातं. अभ्यास-करियर पुढे सगळं तुच्छ आहे आपल्याकडे. त्यामुळे दैनंदिन वा प्रासंगिक घरातल्या-बाहेरच्या श्रमीक कामांना कुणीही सिरियसली आणि रिस्पेक्टफुली घेत नाही. गरजेपोटी, प्रेमापोटी करणारा करत रहातो आणि इतरांच्या नजरेत त्या कामाची वा व्यक्तीची व्यर्थता गडद होत जाते.

खरं सांगायचं तर काम करण्यापेक्षा समोरच्याच्या कष्टाच्या, अडचणीच्या जाणीवेतून पुढे आलेला मदतीचा हातच अर्धे श्रम सार्थकी लावतो. 
काहीही म्हणा ही परदेशी मुलं do you need any help म्हणत आसपास घुटमळतात, एखादं काम थडीला लावायला तत्परतेने मदत करतात तेव्हा त्यांच्या या आपल्याप्रतीच्या, कामाच्या प्रतीच्या जाणीवेचं कौतुक करावं तेवढं थोडं वाटतं.

कोथिंबीर-मेथी निवडणं असो, वा चहा करणं असो वा जेवणाची आधीची तयारी वा नंतरची आवरा आवरी असो वा बाजारात सामान उचलणं असो वा दाराला कुलूप लावायची मदत असतो. यांच्या या मदती पेक्षाही ही समंजस जाणीव काळजात फार घर करते. 

मला तर वाटतं भारतीय कुटुंबातील मुलं आणि पुरुष यांच्याइतके पंचवीस टक्के जरी समजुतदार आणि मदतगार झाले तरी भारतीय घरा घरातलं सौख्य पन्नास टक्क्यांनी नक्की वाढेल.

घरकामाला वा कुठल्याही शारिरीक श्रमांना तुच्छ लेखणं, ती कामं करणा-यांच्या प्रती असंवेदनशील असणं आणि त्या कामाचं मोल न समजणं...मला वाटतं भारतीय कौटुंबिक चौकटीची, भारतीय महिलांची ही फार दुखरी आणि हळवी बाजू आहे. 
We need to overcome this lacuna.
Sooner the better.

No comments:

Post a Comment