Monday, 9 December 2019

टॅक्सी ड्रायव्हर...१ पुणे

अस्ताव्यस्त वाढलेलं पुणं. 
पुर्वे कडून पश्चिमेकडे जायचं म्हटलं तरी धस्स होईलसं. तरी हल्ली त्या घासाघीशीवाल्या रिक्षांना उबर-ओला टॅक्सीजमुळे जरब बसलीये. कुठेही रहात असा. 
फोन केला की दहा-बारा मिनिटात टॅक्सी दाराशी. रुट ठरलेला, पैसा ठरलेला. आपलं ठिकाण येईस्तोवर ऐसपैस सैलावत बसायला आपण मोकळे.☺️

एवढ्यातच भल्या पहाटे पुण्याहून निघाले. इच्छित स्थळी पोहोचायला टॅक्सी केली. साधारणपणे पंचवीस किलोमीटर अंतर. मुलीला बाय करुन निघाले. किरकोळ चणीचा टॅक्सीवाला. खरंतर मला टॅक्सीवाल्यांशी बोलायला आवडतं, पण आजची वेळ भलतीच गारठ्याची आणि सकाळची होती. तरी एक सुरक्षितता म्हणून ड्रायव्हरला तुम्ही कुठले म्हणून हा प्रश्न केलाच. एक जुजबी चौकशी काय केली आणि गडी जो बोलायला लागला तो थांबेचना.🤨
पण भरपूरच मजेशीर निघाली ती वल्ली.

मी गुजरातचा माडम, पन माजी बायको मराटी हाये. एकदम जबरी मराटी.
...बापरे जबरी म्हंजे ?🤔
जबरी म्हंजे, सांगतो ऐका आता.
...वाह, मराठी चांगल येतंय तुम्हाला. 
काय करता जबरा बायको असली की असेच होते. आता गंमत ऐका. मला मराटी जितकी येते त्याच्या धा टक्के पण गुजराती माज्या बायकोला येते नाई. आवो मराटी नाई आले तर मला जेवन मिलनार नाई. आता तुमी मराटी लोकं कसं म्हन्ते चला, जेवाला वाढले, वाढू का ? आता हेच बोलन गुजरातीत तमना जम्मानु आपो अशें बोलते. पन माजी बायको काय म्हन्ते माहितै का ?तमना जम्मानु टाको. आता मी काय कुत्रा हाये का टाको म्हनायला. पन ती तशेच म्हन्ते. मी बोल्लो, तुला गुजराती नाय आलं तरी चालेल पन सगल्यासमोर तमना जम्मानो टाको म्हनुन माजा असा कुत्रा करु नको.😲
पन जबरा आसली तरी बायको चांगली हाय.
...होका ?😊
माज्या वाईट सवयी तिनं सोडवल्या. मी आदुनमदून बियर पित होतो, विमल गुटका खात होतो. हिच्यामुळं सगळं बंद जालं. घर स्वच्छ ठेवती, जेवण चांगलं करती. तशी चांगलीच हाय ती. माझ्या सगळ्या खोड्या तिनं बंद केल्या पन मी तिची एक वाईट सवय नाई सोडवू शकलो.
...कोणती ?
शापिंगची. बाबो, इतकं शापिंग करती थी की मी बेजार होतो.🤯
...पण तुमचं लग्न कसं झालं ? ती मराठी, तुम्ही गुजराती ?
मी एका बिल्डरकडे ड्रायवर म्हनुन होतो. तर ही तिथे एकदा कॉम्पुटरचा इंटरवू द्यायाला आली होती. इंटरवू जाला तसा मालकानं विचारलं की तुमी इथे कोनाला ओळखता का ? तर तीने मला ओलखते असं सांगितलं. आजुबाजुचे सगले हसले. मग हीची ड्युटी सुरु जाली. आपिसातले सगले लोकं मला बगितलं की हसायचे. ही पन हसायची. सगले मला बगून, तिला बगून हसतेत याचा मग मला एक दिवस राग आला. एकदा तिला मी जोरातच विचारले, का गं तु मला कसी ओलखते. त्या दिवशी सगळ्यांसमोर ओलखते आसं का बोल्लीस ? मग ति म्हनली मी समोरच्या हापिसात नोकरी करत होते. तर रोज तुला पहायची म्हनुन तुला ओळखते म्हटलं मी. मग मी म्हन्लं, आसं अर्धवट का सांगितलं ? पुर्ण सांगायचं ना ? सगळे मला हसतेत तुझ्यामुळे. मग ती रडायला लागली. मग मी घाबरलो. कारन आमचा मालक जयभीम होता आनी बायकांची फार इज्जत करत होता. लगी देवासारकंच मान देत होता बायकांना. मला वाटले आता ही जर रडत मालकाकडे गेली तो आपलं काई खरं नाई.😨
...का बरं, नौकरी गेली असती का तुमची ?
नौकरी ? मालकानं मारलं पन आस्त. डेंजर मानुस हाये तो. मग मी तिची विनवणी केली की तु हे मालकाला सांगू नको. बरं म्हन्ली. मग हळू हळू आमची मैत्री जाली. कदीतरी मी तिला घरी गाडीने सोडायचो. ति माज्यासाटी डबा आनायची. मालकाला घेऊन बाहेरच्या गावाला गेलो की स्टाफ फोन करुन विचारायचा कदी येनार म्हनुन. हसी मजाक मदे दिवस जात होते. मला ती आवडू लागली. मग तिला लग्नाच विचारलं. माझं एक लग्न ठरुन मोडलं होतं. घरचं चांगलय, पन मी ड्रायवर म्हनुन कुनी मुलगीच मिळेना. मी फार फ्रस्ट्रेट जालो. हिमालयात जायचा विचार करायला लागलो. 
मोदी बायको असूनही हिमालयात जातेत तर आपन बायको मिलत नाई म्हनुन जायला काय हरकत हाये असं वाटायचे.😁 पन मग हिच्याशी मन जुळलं. 
पन हीचे नखरे सुरु जाले. 
आसं कसं ? मी मराटी, तु गुजराती. माज्या आईला मला सांभालावे लागते. मी म्हनलं जशी तुजी इच्छा.😌
परत नाराज जालो. विचार केला आपला बी राहुल गांधी होतो आता. गुजराती-मराटी एक पन पोरगी मिळना.☹️
पन मग येकदा माज्या भावाने चालिस दिवस उपास केलते. त्याची समाप्ती कात्रजच्या जैन मुनींच्या मठात होती. मी तिला पुजेला बोलावलं. मग तिने आईला सगलं सांगितलं. तिची आई म्हन्ली, लग्न कर वा नको करु. आपन पुजेला तं जाऊन येऊ. आसं करुन दोगी माझ्या घरी आल्या. आमचं दहा-बारा जनांच कुटुंब पाईलं, सगलं वेवस्थित वाटलं त्यांना मग ती लग्नाला तयार जाली.🙂
लग्नाची बी एक गोष्टच हाय. मी तिला म्हन्लं लग्नानंतर आपन फिरायला जाऊ. आता ते लोनावला, महाबळेश्वर सगलेच जातेत. तिला म्हन्लं आपन गुजरातेत आबू, नाथद्वार आसं फिरु तुला आमची घरही दाखवतो. तर बरं म्हन्ली. लग्नला तीन महिने होते.आता आदीच लग्नाचा खर्चा त्यात परत फिरायचा खर्च. तिला सांगितले शापिंग बिपिंग काई नाई आपन फक्त फिरु.तर म्हन्ली मला लगनाची गिफ्ट पाहिजे. मी म्हन्लं मी गरीब मानुस. कडकी हाय माजी. तं म्हन्ली मला काय माहित नाय, तुला मला धा हजार शापिंगला द्यावेच लागतील. तिच्या मैत्रिनीपन फार शान्या हायेत. एक दिवस पैशे टाकायचा डब्बा घेऊन आली आनी म्हन्ली तु रोज पाचशे कमावतो ना ? या डब्यात रोज दोनशे टाकायचे. महिन्याला सहा हजार आशे तिन महिन्यात आठरा हजार जमतील. मग आपन लग्न करु, फिरायला जाऊ. पैशाचं टेंशन नको.💞
मी रोज पैशे डब्यात टाकायला लागलो. पन फिरायला गेलो तो अहमदाबादला सकाळी सातला बस पोचली. लगेच म्हनली चल बाजारात. निघायच्या आदीच कुठला बाजार, कसला बाजार शोधून ठेवला होता तिनं. दिसली साडी कि घे, आवडला ड्रेस की घे. आसं करुन धा हजार तिथेच उडाले. मी टेंशनमदे. मी म्हन्लं आदीच मी ड्रायवर, आता तं तु माजा हमाल करुन टाकलास. इथंच आशे पैशे उडवले तं खायचं काय ?
म्हन्ली किरकिर करु नको. घरी आहेत ना पैशे. मग फिरुन घरी आलो. मग तो पैशाचा डबा उघडला. सांगा बरं किती पैशे निघाले असतील मॅडम ?🤔
...(अंदाजाने)खाडे बिडे धरुन निघाले असतील पंधरा हजार.☺️
नाही, फक्त दोनशे रुपये. मी एकच नोट रोज टाकायचो, तिच नोट परत काढून घ्यायचो. दुसऱ्या दिवशी तिच नोट परत टाकायचो.🥴 खूप भांडली, सोडून जाते म्हन्ली. पन मग समजूत घातल्यावर राहिली. पन मग चार सहा दिवस जेवण बंद. मी पराठे केले की हिच खायची, मी स्वत:साटी भाजी केली की हीच संपवून टाकायची.
🙈🙉🙊

एकदा तिचा वाढदिवस होता. म्हन्ली मला काय देणार ? मी म्हन्ल काय देवू ? म्हन्ली डोक्यावर हात ठेव. 
ठेवला. आता शपथ घे मला शॉपिंगला कदी नाही म्हणणार नाहीस. आता आली ना पंचाईत. घेतली शपथ. पन मी म्हन्लं आज तुजा वारा (दिवस) आहे, माजाही वारा येईलच ना ?😉 
मग पुडच्या महिन्यात माजा वाडदिवस आला. म्हन्ली तुज्यासाटी सरप्राईज गिफ्ट हाये. मी म्हन्लं सरप्राईज नको. गिफ्टच द्यायचं तर ठेव डोक्यावर हात. ठेवला. आता घे शपथ मी कधीही तुज्या पैशाने शापिंग करनार न्हाई म्हनुन.😬 घेत नाई म्हन्ली आसली शपथ. आसली जबरा बायको हाय माजी.
...मुलं आहेत का तुम्हाला.
हो एक चार वर्साचा मुलगा हाये. ती डे केयर मदी नौकरी करती. जातो तिच्या मागं. 
मग एकदा वैलेंटाईन डे आला. परत म्हन्ली तु मला काय देणार ? मी म्हन्लं लगीन झाल्यावर आसले व्हेलेंटाईन वगैरे काय नसते. जादा से जादा दहा रुप्याची क्याडबरी. नाई मला काईतरी पाईजेच म्हन्ली. माज्या मावस भावाचं लगन हाये. मावशीचा तिलाच फोन होता. म्हन्ली तिकडं मुंबैला लग्न हाये, मला नवीन साडी पाईजे. आता इतक्या साड्या हायेत आजून कशाला नवी साडी. मी म्हन्ल मी गरीब मानुस हाये. पैशे नाई माझ्याकडं. तर म्हन्ली तु खरं जैन गुजराती न्हाई जैन मारवाडीच हाये. सतत रडत आसतो पैशे नाई, पैशे नाई. 
गुजराती नाई, हाडाचा मारवाडी हाईस तु. मी लगेच मावशीला फोन लावला, आपल्याकडची आजून किती लगीन शिल्लक हाईत ते एकदाच सांग म्हंजी मी पैशे बाजूला टाकतो, कारन प्रत्येक लगनाला माज्या बायकोला नवी साडी पाईजे. मी ड्रायवर मानुस, कुटुन इतका पैसा आनु ? मावशी पन हसायला लागली.😁
एक दोनदा तिनी घर सोडायचं नाटक केल्त. एकदा आसच भांडण झालं, रागात ब्याग उचलून दडादडा जिना उतरुन गेली. आता माजा बी स्वोभाव मिस्किल हाये. जाऊन जाऊन कुट जाईल. मागच्या गल्लीतल्या आईकडं. मी पन लगेच दाराची कडी लावून घेतली. पंधरा-वीस मिनिटात दडादडा दार वाजवलं. मी म्हन्ल आता जरा हिला दाखवलंच पाईजे. दहा मिनिटं दारच उगडलं न्हाई. मग उगडलं तर घाबरुन आत आली, गळ्यात पडली आनी म्हन्ली तिकडे रस्त्यावर पांढ-या साडीतली चुडैल उभी हाये. मी म्हन्लं देवा...बरी चाल्ली होती. कुठुन ती चुडैल मधे आली कोन जाने ? 
बरी गेली आसती. मी पन सुटलो आसतो. 😜 तेव्हा पासून आता गपचिप राहती. मीच आता ब्याग भरुन ठेवलीये. काई भांडन झालं की म्हन्तो चाल्लो मी गुजरातला. मग खरच घाबरती. 
...तुमचे नातेवाईक येतात का तुमच्याकडे ?
हो, आई येती. दोघी पन गुनानी राहतात. हिचं मराटी तिला कळत नाई, तिचं गुजराती हिला कळत नाई. पन तुमचे आमचे लुच्चा, गधडा हे शब्द सारकेच हायेत. आईला सांगितलं हे शब्द वापरु नको, तिला समजल आजून रागराग करील. राग आला की खूप चिडते. मग मी म्हन्तो थांब, आदी जरा आगीचा बंब बोलावतो. मग आजून चिडती.😠 माजा पन स्वोभाव आसा हसी मजाकचा, तिचा बी तसा.
पन सुखाचा सोंसार चाल्लाय.☺️
...इकडे मागे बघा. एक फोटो घेते तुमचा. 
(माझंही उतरायचं ठिकाण जवळ आलं होतं)
म्याडम तुमी पत्रकार हाये का ? मी आपलं मन की बात बोललो. कुटं छापून आणू नका बरं. माज्या बायकोन वाचलं तं एक नाई तीन महिने जेवण बंद होईल माजं.😁
Don't worry. तुमच्या बायकोपर्यंत नाही पोहंचणार यातलं काही.😊

टॅक्सी थांबली. पैसे दिले घेतले आणि एका मिश्किल, निर्मळ आणि आनंदी माणसाचा निरोप घेतला.🙂



No comments:

Post a Comment