Tuesday, 19 November 2019

समृद्ध समाधान

जवळच्या कुटुंबीयांच्या निमित्ताने नगरच्या नामांकित हॉस्पिटलमधल्या वेटिंग रुममध्ये....
 
बाई...तुमी कोन्च्या गावच्या ?
मी, औरंगाबादची. तुम्ही ?
आमी...नेवाश्याकडच्या. मपल्या मालकाला बरं लागना म्हनुन इथं आलोया. ही मही पोर्गी हाय. 
औरंगाबाद म्हंजी लयीच दूरुन आलाता तुमी.
हं. तुम्ही आला आहात का कधी औरंगाबादला ?
लय दिसं झालेत. आमच्या वावरातला गहू विकाया यायचो तिथं. ***शेठकडं लगी दोन-चार वर्स नेमानं यायचो आमचा गहु घ्येऊन. पन नंतर बंदच झालं येनं. आमच्ये इस हजार बाकी हायता त्या शेटकडं.
बापरे ! वीस हजार ? मग परत मागायला गेला नाहीत का ? 
त्या खेडूत स्त्रीयांच्या रहाणीमनावरनं ते विस हजार तेव्हांही आणि आजही फार महत्त्वाचे असावेत असं मी अनुमान काढलं.
यकदा गेल्तो बाई. पन त्यो म्हन्ला माजी पोर्गी अम्रिकेला चाललीया, त्याला इमानाचं तिकीट काढाचं व्हतं, नंतर या म्हन्ला. मंग काय परत गेलोच न्हाईता.
अहो, तेव्हा नाही पण परत का नाही तुम्ही गेला पैसे मागायला ? विस हजार काही कमी नाहियेत असे तसे सोडायला. (माझं संशयी मन खळवळून उठलं.) आपल्या शहरातल्या एका मोठ्या आडत व्यापा-याकडच्या गल्ल्यात विस हजार नसावेत वा एका कष्टकऱ्याला त्याचे हक्काचे पैसे द्यायची दानत नसावी याचा मला विषाद वाटला.
जाऊद्या. आमी खेड्याची मान्स लयी जानकार असत्योत. आसलं त्याची पन काई आडचन. 
आपन जानीव ठेवनार न्हाय तं कोन ठेवनार ? 
शेहेराच्या मानानं खेड्याकडली मान्स जादाच जीव ओळखून अस्त्येत. 

आयसियुतल्या आपल्या म्हता-यासाठी लेकीसह इतर पाच-सहा नातू कामंधामं सोडून धावत आलेत याचं आजीबाईंना अपार समाधान होतं, समृध्द कवतिक होतं. 
त्यापुढे हे गंगार्पण केलेले-व्यवहारी चतुरपणाने करवून घेतलेले विस हजार खिजगणतीतही नव्हते.

No comments:

Post a Comment