औरंगाबाद शहरात भरणा-या जागतिक बौध्द धम्म परिषदेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या चित्र कार्यशाळेला आज प्रारंभ होत आहे. तत्पुर्वी काल बुध्द शिकवणी व विचारांवरच एक व्याख्यान बुध्द धर्माचे अभ्यासक डॉ अरविंद गायकवाडांचे मालती आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले होते.
त्यामुळे बरेच कलावंत भेटले. तसा साधारणतः नेहमीचाच ग्रुप असतो. तरी काही चेहरे नवे वाटले.
मॅडम, मला ओळखलं नाही का ? मी अमुकतमुक.
नाही रे ओळख नाही लागत आहे.
साधारण दहा वर्षांपूर्वी मी एम एफ ए केलेलं. विद्यार्थ्यांमधे मीच एक प्रौढा, बाकीचे तमाम विद्यार्थी पंचवीशीतले. दहा वर्षांचा कालावधी लोटलेला. पंचवीशीतले धडपडे तरुण मुलं आता पस्तीशीत आलेले. नोकरी-संसारात नव्याने गुंफलेले. साहजिकच माझ्यापेक्षा त्या तरुणांमध्ये बराच फरक झालेला.
नाही तो मुलगा ओळखायला आलेला.
अरे मला आठवतच नाहीये. कुठे बसायचास रे तु ?
मॅडम तुमच्या शेजारीच तर बसायचो मी.
हो ? अरे मग मला का नाही आठवत आहे. (मनातल्या मनात वयामुळे येणा-या धुसर स्मरणशक्तीला बसलेली धडक जाणवली)
तुझी चित्र-पेंटिग्ज कशी असायची सांग बरं ? काही थीम-फॉर्मस वगैरे. म्हणजे मला आठवेल.
मॅडम मी बांबूवर पेंटिंग करायचो. माझ्या प्रत्येक पेंटिंग मधे बांबूचे फॉर्मस असायचे.
हां...हां...आठवलं..आठवलं. एकदा लंच ब्रेक नंतर आपण तिचं चौघ खूप गप्पा मारत बसलो होतो. तुझ्या चित्रांवर पण बोललो होतो, बरेच जोक्स करुन हसलो होतो आणि तासाभरात मला चिकन गुनियाचा एॅटॅक आला होता.
तो मुलगा होका असं म्हणत आठवल्या सारखं करुन नुस्ता हसला.
खरंतर माझ्या चिकन गुनियाच्या एॅटॅक विषयी त्याला काही माहित असायचं कारण नव्हतं. पण त्यादिवशी माझी मात्र हालत फार वाईट झाली होती. तो दिवस विसरणं अशक्य आहे.
या मुलांशी हसत खेळत बोलत असतानाच दुपारचे दोन ते चारच्या दरम्यान अंग भरुन आलं आणि जॉईंटस तर इतके दुखायला लागले की माझी चारचाकी चालवत घरी जायचाही कॉन्फिडंस मला राहिला नाही. डिपार्टमेंट मधेही बसवेना आणि गाडी चालवत घरी जायचीही हिंमत होईना.
बरं डिपार्टमेंटमध्येही कुणी गाडी चालवत मला घरी सोडून शकेल अशी परिस्थिती नव्हती. शेवटी ऑफिसमधून कुणाला बोलवावे म्हटले तर नव-याला देखील चिकन गुनियाने नेमके त्याच वेळी गाठलेले. तोही कसाबसा धडपडत गाडी चालवत घरी निघाला होता. शेवटी केली हिंमत आणि तशीच रामभरोसे सावकाशपणे गाडी चालवत घरी पोहोचले.
घरी जाऊन पलंगावर कोसळत नाही तर नवरा देखील तशाच अवस्थेत घरी पोहोचला. संध्याकाळच्या जेमतेम पाच वाजता आम्ही जे पलंगावर कोसळलो ते पुढचे चोवीस तास उठूच शकलो नाहीत. पुढेही ते ताप आणि अशक्य अंगदुखीचं दुखणं आठ-दहा दिवस तर सांधेदुखी पुढचे दोन सिझन पर्यंत पुरली. अर्थात ही कथा त्या मुलाला माहित असणं शक्य नाही पण मी मात्र कधीच विसरु शकणार नाही. माझ्या मुलीलाही नंतर पंधरा दिवसांनी चिकन गुनियाने हैराण केले. त्यावेळी आमच्या कॉलनीत दहा-बारा जणं चिकन गुनियाचे शिकार झाले होते. चोरांच्या टोळ्या तशा या डासांच्या टोळ्यांनी आमच्या वर हल्ला केला होता.
तर ते असो.
एखाद्या चित्रकाराची चेह-याने नाही पण पेंटिंग्जच्या विषयाने, स्टाईलने ओळख लागणं यासारखा आनंद वा समाधान नाही.
No comments:
Post a Comment