आमच्या राहत्या घरात बनारसी आवळ्याच झाड आहे. यंदा तुडुंब आवळे लागलेत. वरच्या गॅलरीतून फांद्या झटकल्या की टप्पोरे आवळे टपाटप खाली पडतात. त्यामुळे कुणीही यावं आणि फांद्या झटकाव्यात आणि टोपलंभर आवळे न्यावेत हा कार्यक्रम चालू आहे. शेजार पाजार, मैत्रिणी, कामवाल्या अगदी वेळकाढून आवळे नेताहेत, आम्हीही वाटत आहोत.
तर आज सायंकालीन मदतनीस,
काकू..आज आवळे नेते हं म्हणत मागे अंगणात गेली. पण आवळे वर लागलेले.
अगं थांब मी वरुन पाडते.
जाऊद्या काकू आज नको, मला पण रुम बघायला जायचंय. उद्या नेते.
तुमच्या कडं चंदन आहे काकू ?
हो, तुला ओळखता येतं चंदनाच झाड ?
हो, आमच्याकडच्या वावरात आहेत बरीच चंदनाची झाडं.
आता माझीही उत्सुकता चाळवली. आमच्या हिरण्यच्या परिसरात शेकड्यांनी चंदन झाडं आहेत. आपोआप उगवलेली, वाढणारी. तशी तर औरंगाबाद शहरातही अनेक आहेत ही झाडं. पण सर्वसामान्यांना ही वाढलेली झाडं लक्षातच येत नाहीत, बहरलेली झाडं नजरेत भरत नाहीत. फक्त ही झाडं चोरीला गेली की चर्चा होते, दैनिकातून बातम्या येतात.
आमचीच काय अगदी कलेक्टर, कमिशनरच्या बंगल्यातली चंदन झाडं-खोड रात्रीतून चोरीला जातात. कुणीही काहीही करु शकत नाही.
खरंतर जेमतेम सुदृढ दंडा एवढ्या जाडीच्या खोडातून चंदन गाभा मुळीच हाती लागत नाही. निदान एखाद फूट रुंद तरी खोड झालं तरच काही चंदनी गाभा मिळू शकतो. आणि सुगंध म्हणाल तर त्यातही परत मातीचं, हवामानाचं कॉन्ट्रिब्युशन असतंच की. त्यामुळे कर्नाटकी चंदनाची बरोबरी ही आपोआप आणि गचपणात वाढणारी आमची चंदन झाडं करु शकत नाहीत. पण तरीही आमच्यासह सगळ्या सर्वसामान्यांना या चंदन झाडांचं खूप कवतिक असतं. पण सगळी हौस त्या सुवासिक चंदन चोरीच्या बातम्या वाचूनच पुरी करावी लागते. या चोरांच्याही हाती काय लागतं असेल माहित नाही. पण रात्रीतून जमिनीलगतची चंदन खोडं कापणा-या टोळ्या आमच्या भागात भलत्याच सक्रिय असतात. म्हणजे चंदन झाड आणि त्याचा सुगंध यापेक्षा चंदन झाड आणि चोर-चोरी हेच समिकरण आमच्यासाठी तरी आहे.
हिरवंगार व रसरशीत वीसेक फुटी चंदन झाड हकनाक धारातीर्थी पाडलेलं पाहिलं की अक्षरशः जीव तुटतो आणि चोरांच्या नावे बोटं मोडली जातात.
.....तर मग काय करता गं तुम्ही लोकं त्या झाडांच ?
काही नाही. विकतात.
.....विकतात ? मराठवाड्यातला पहिला चंदन विक्रेता याची देही याची डोळा दिसला.
.....अस्स. कुणाला विकता, कधी आणि कसा विकता ?
त्येवढं काय माहित न्हाई, पन व्यापारी येतेत आणि रात्रीचं विकत घेऊन जातेत.
.....होका, आणि भाव काय असतो गं ?
माहित नाही, पण साताठ हजार मिळतात वाट्ते. चंदन महाग असते ना ? आणि सगळं झाड नाही नेत जमिनिजवळचा गाभा नेतात, मुळं तशीच रहातात त्याला. परत पालवी येते, झाडही वाढतं पण पहिल्यासारखा वास नाही येत त्याला.
आमच्या इथल्या माळरानातल्या चंदन विक्रीचा हा राजरोसपणे चालणारा व्यवहार पहिल्यांदा ऐकायला मिळाला.
डौलदार, तपकिरी पण सुगंधी बुंधा आणि नजाकती पोपटी भरगच्च बारकिशी पानं असणा-या भारतीय वैभवाच्या चंदन झाडांची व्यवहारी कथा ऐकून मनोमन चुटपुटले.
आवळ्यांच्या निमित्ताने बाईने घराला, अंगणात गोल चक्कर मारलीच होती. गेल्यासरशी दोन जास्वंदही तोडून घरी नेण्यासाठी म्हणून बाजूला ठेवली होती. आम्ही सहसा अंगणातली फुलं कुठल्याच कारणाने तोडत नाही. कधीतरीचा अपवाद म्हणजे फक्त गजरे करु शकणा-या जाई, जुई आणि कुंद फुलांचा. आताशा तर कुठलीही फुलं तोडून घरात सजावट करणं मला क्रिमिनलच वाटायला लागलं आहे. तर ते असो.
....तू तोडलीस का गं जास्वंद ?
हं.
.....का बरं ?
काई नाई देवाला वाहिन. रंग तं किती छाने.
.....हं, थांब मी फोटो काढते. फोटोंच्या निमित्ताने फुलं हलवली तर कळ्या पण दिसल्या.
.....अगं...तू कळ्या पण तोडल्यास ?
होना, उद्या-परवा फुलतील, मग वाहते देवाला.
.....इतक्या छोट्या कळ्या फुलणार ?
हो, पाण्यात टाकल्या की फुलतात चांगल्या.
घाईघाईत काम आटोपून बाई लगबगीने गेली. वळून पाहिलं तर फुलंही जागेवर, कळ्याही जागेवर.
अरेच्या, रुम बघायला जायच्या धांदलीत विसरली वाटतं.
आवळ्यांच्या लोभाने बागेत गेलेल्या तिला ही सुरेख जास्वंद फुलं बघून देव आठवले, कळ्या बघून परवा-तेरवाच्याही देवपूजा लक्षात राहिल्या.
पण लगेचच घर-रुम बदलायच्या संसारी व्यवधानात त्या फुलांचा, कळ्यांचा व अनुषंगाने देवाचाही विसर पडला.
आता तिच्यासाठी म्हणून चुटपुटले आणि फुलं आणि कळ्या पाण्यात ठेवल्या.
हो ना, त्यांना का उगाचच शिक्षा ?
No comments:
Post a Comment