Sunday, 10 November 2019

तन मन...आनंद, आनंद....

खरंतर कुठलंही ठोस कारण नसतं तरीपण कधी तरी एखादा दिवस, एखाद्या दिवसातला एखादा प्रहर तनमन प्रसन्नचित्त रहातं. काहीतरी काम करता करता गुणगुणावं आणि आपणच आपल्या मुडवर चकीत व्हावं. 
शरीर हलकं वाटतं, मन आनंद-आनंद असतं. 
न भुतकाळातल्या चिंता आठवतात न भविष्य भेडसावतं. 
फक्त आणि फक्त हाच क्षण वा हाच प्रहर. 

खरंतर इतकी तरल मनोवस्था होण्या इतकेही आपण आता भाबडे राहिलेले नसतो वा इतकेही कशासाठी अधीर नसतो. तरीपण प्रौढावस्थेतील स्वत:च्याच तनामनाचं हे अवचितपणे झालेलं प्रसन्न ट्युनिंग आपल्याला चकीत करतं.

काय खाल्लं, काय केलं बरं आज आपण ? का आपण आज इतके तृप्तपणे अलवार झालो आहोत ?
का आपण एखाद्या पिसागत तरंगल्यासारखे फील करत आहोत ?

न कुठलीही मानसिक चिंता वा कुठलीही शारिरीक खुटखुट आपल्या आसपास देखील नाहीये.
बस, यही एक पल है. 
फक्त आपला आणि आपलाच.
मनही फुलपाखरागत झालेलं असतं, शरीरही हरणागत हुंदडत असतं, गळ्यातून गुणगुणी तान निघत असते, 
दो लब्जों की है ये कहानीचे रेडियोवरचे सूर अजूनच या मुडला चार चांद लावत असतात. हातून एखादा नेटका पदार्थ झटपट तयार होतो. 
एक परमानंदी पण मनस्वी अवस्था. 
पुन्हापुन्हा खरी का खोटी वाटावी अशी तरल व आल्हाददायक स्थिती. शेयर करायलाही आसपास कुणी नसतं. पण कुणी नसल्याचीही खंत नसते. 
हा एक परम सुखाचा अंतर्नाद आहे. आपणच आपला जाणावा, अनुभवावा आणि त्या सुवर्णक्षणांना मनोमन धन्यवाद द्यावेत. 
तनामनाच्या एकरुप तरलतेचे असे क्षण वारंवार यावेत.

No comments:

Post a Comment