*गुलफ़ाम* मतलब...
१) बहोत सुंदर २) सुकुमार ३) जिसका रंग गुलाब फुल के रंग जैसा हो. (~googal )
आमच्या शहरात ठराविक असे मुस्लिम मोहल्ले आहेत. इथे पुर्वी देखील बहुदा चिंचोळ्या गल्ल्या आणि मुस्लिम घरांचीच वस्ती होती. पण रस्ता रुंदी करणामुळे रस्तेही मोठे झालेत आणि जरा छोटेखानीच पण झकपक कपडा मार्केटही इथे तयार झालंय. निचे दुकान, उपर मकान स्टाईल.
इथला मुख्य ग्राहक मुस्लिम-बोहरी समाजच असतो. पण हल्ली कुणी कुठल्याही प्रकारचा कपडा वापरतय, कापडंही छान असतात, बहुदा दुबईचा माल असतो पण त्यामानाने दर वाजवी असतो. अर्थात जरा बघूनच माल घ्यावा लागतो. रंगरुपामधे जरा मुस्लिम टच असलेली कापडं कधीतरी वापरायला छान वाटतात.
त्यामुळे सर्वधर्माच्या चोखंदळ ग्राहक महिलांची इथे सततच वर्दळ असते. ईदीमधे तर भलतंच झगमगाटी माहौल असतो इथे.
रुंद पन्ह्याची तागी भरपूर व्हरायटीची पण सिंथेटिक, नेट, वेल्वेटची कापडं इथे मिळतात. त्यामुळे साड्या, लहंगे, दुपट्ट्यांसाठी, फर्निशिंगसाठी मिक्स अन् मॅच करायला इथे वाजवी दरात खूपच स्कोप असतो.
सगळे दुकानदार मुसलमान. नौकरवर्ग मुसलमानच. बहुतांश कमी शिकलेले.
तर काल अशीच या भागात फिरत होते. प्रत्येक दुकानाचं वैशिष्ट्य असतं. कुठे झिरझिरीत कापडंच, तर कुठे नेटची चमचम, कुठे वेल्वेट, तर कुठे पडद्याची कापडं, तर कुठे बुरखे. आपल्या गरजेनुसार पाय-या चढायच्या.
साडी पन्ह्याच्या भरतकामी नेट कपड्याच्या शोधात एका दुकानात शिरलो. दुपारची वेळ, त्यात शुक्रवार. एखादं दोनजणंच होते. एक अगदी लहानखूरी, अटकर बांध्याची व्यक्ती. अगदी मुसलमानी पेहरावात. फिकट रंगाचा झब्बा, पांढरा अरुंद आणि लांडा पायजामा. डोक्यावर जाळीची टोपी, गालफडं बसलेला, दाढी राखलेला चेहरा अतिशय सात्विक. जो आहे तो माल तत्परतेने दाखवला, नसलेला माल शेजारी बघा म्हणाला.
बोलणं अतिशय मार्दवशील. चेहऱ्यावर नितळ भाव, डोळ्यातही सच्चाई. बोलण्यात येस मॅडम, नो मॅडमची पॉलिश्ड पखरण. शेवटी न राहवून विचारलंच चाचा आप कहां के हो म्हणून. तर चाचा तसे इथलेच. पण वडिलांच्या नौकरीमुळे बालपणीच मुंबईत गेलेले. पण नंतर पिताजी दुबईत गेले आणि यांची गाडी अकरावीतच अडकली आणि चुकीच्या मित्रपरिवारामुळे रुळावरुनही घसरली. वेळीच सावध झाले, सावरले. कामाच्या निमित्ताने परत औरंगाबादला परतले, इथलीच बायको केली आणि आता मुंबईला विसरुन सुखाने औरंगाबादलाच रहाताहेत.
स्वच्छ बोलणं, संबंध नसतानाही माझ्यासारख्या ति-हाईताला अशी आपल्या आयुष्यातील वळणं नेटकेपणाने सांगणं. का कुणास ठाऊक पण मला ही व्यक्ती जुजबी बातचीतीवरुन अंतर्बाह्यपणे निर्मळ वाटली. मनाला भावली.
चाचा, एक फोटो ले लू आपका ?
हां क्युं नहीं ? लिजीये ना मॅडम म्हणत गुलफ़ाम शेख चाचा त्या झगमगीत रंगबिरंगी बॅगराऊंडवरती एक सौम्य पण लोभस हसू देत आनंदाने ऊभे राहिले.
लिखाणाला विषय तर मिळालाच होता.
नाव विसरु नये म्हणून मोबाईल कीप मधे नाव टाईप केलं तर माझ्या मोबाईलमध्ये डोकावत मॅडम pham नहीं Gulfam स्पेलिंग है म्हणत सहजपणे दुरुस्ती सजेस्ट केली आणि नमस्ते म्हणत एक आदबशीर आणि मंदस्मितवाला निरोपही दिला.
No comments:
Post a Comment