गांधी जयंतीच्या निमित्ताने...
साधारण 2015 मधे लिहून ठेवलेलं हे लिखाण आहे.
असच पोस्ट करायच राहून गेलं. आज गांधी जयंतीच्या निमित्ताने परत एकदा देश गांधीमय झाला असतानाच हे लिहिलेलं आठवलं, जून्या डायरीतलं पानही सटीकपणे सापडलं. वाचून पाहिलं, जे व्यक्त केलय त्यात काहीही बदल न करावासा वाटता लिहिलय तेच लिहून काढावसं वाटतय.
माझ्या मुलीचा जन्म गुरुपौर्णिमेचा. त्यादिवशीच्या गुरु महात्म्याविषयी अनुसरुन हे लिहिलय.
आज गुरुपौर्णिमा. वर्तमानपत्रातून ४ दिवसांपासूनच गुरुपौर्णिमेनिमित्यच्या ठिकठिकाणच्या कार्यक्रमांच्या भरपूर बातम्या आहेत. आणि आमचं फेसबूकही गुरुवंदनेनं तुडुंब भरलेलं आहे. तिथीने माझ्या मुलीचा जन्म गुरुपौर्णिमेचा. सकाळीसच तिला व्हॉट्सऍपवर परत एकदा शुभेच्छा द्याव्या म्हटल्या तर बाईसाहेबांनी व्हॉट्सऍप स्टेटस् चक्क मराठीत टाकलेलं.
'जितकं जगलो तितकं कमी'.
अक्षरशः मोहरुन गेले.
मला बरेचसे कॉम्प्लेक्सेस आहे. काही अडगळीला पडलेत तरी हल्ली ब-याच कॉम्प्लेक्सेसची अधूनमधून जास्तच आठवण होते कारण आपला रसरसलेला सोशल मिडिया आणि त्यावर रोजच कुठला न कुठला दिवस जोरदारपणे साजरे करणारे आपण.
तर आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा.
ज्यांच्याकडे डोळे मिटून मनाने, भावनेने, श्रध्देने सुपुर्त व्हावं असा माझा कोणताही शैक्षणिक, व्यावहारिक, संसारिक, अध्यात्मिक गुरु अजूनपर्यंत तरी नाहिये.
शिक्षणानी मी खरी चित्रकार. पण त्यातलं कर्तृत्व म्हणाल तर नसल्या इतपत शुल्लक. मला पुर्वी सारखं वाटायचं व अजूनही वाटतं, ना आपण दलित, ना आपण मागासलेले, ना आपण दारिद्रय रेषेखालचे,
ना आपण दुःखाने-कष्टाने-संकटाने पिचलेले, ना आपण परिस्थितीने रंजलेले-गांजलेले..आपल्या हातून कशी काय कला साकार होणार ?
कारण दुःख, दारिद्रय, संकटांनीच कला पोसली जाते असा एक सर्वमान्य समज आहे. मग माझं कसं होणार ?
आपण तर सुस्थित वरच्या थरातले.
कायम फुलपाखरागत जगणारे. आणि जी काय संकटं आली आहेत ती स्वतःहून ओढवून घेतलेलीच आहेत त्यामुळे त्याचाही खेद नाही. त्यामुळे कलेच्या प्रांतात तरी मी निदान माझ्या समाधाना पुरतं तरी काही करु शकेल का नाही अशी एक छळवादी शंका मला सतत त्रस्त करत असते.
पण तुमच्या रोजच्या रुटीन जगण्यात सुध्दा तुम्ही सतत काहीतरी शिकतच असता. अगदी अनाहूतपणे तुमच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींमुळे, ऐकीव-वाचिव गोष्टींमुळे सुध्दा तुम्ही शहाणे होत असता.
गुरु म्हणजे अगदी लोड, तक्क्याला रेलून बसलेली व्यक्तीच असली पाहिजे असं काही नाही. आपण अशा विराजमान गुरुंच्या पायाशी मान खाली घालून बसलं, संकटांचा पाढा वाचला आणि मग त्यावर त्या गुरुंनी आपल्याला त्यासंकटावरचा रामबाण उतारा
सांगीतलाकीच गुरु-शिष्य परंपरा पुर्णत्वाला जाते असं नाही.
जात-पात, धर्म-संस्कृती, लहान-थोर, आर्थिक स्तर, शैक्षणिक पात्रता या सगळ्याच्या पलिकडे जाऊन प्रत्येकच व्यक्ती तुम्हाला काहीतरी शिकवून जात असते. इच्छा आणि मानसिकता असेल तर प्रत्येक घटना, क्षण, व्यक्ती तुमचा गुरुच असते. एवढी मानसिक आणि वैचारिक लवचिकता असेल तर रोजच्या साध्या जगण्यातनं सुध्दा तुम्ही एक माणूस म्हणून प्रगल्भ व उन्नत होऊ शकता असं मला वाटतं.
माझा तथाकथित देव आणि त्यासंबंधीचे उपचार या पध्दतींवर तसा विश्वास नाही. त्यामुळे या विचारांवर ठाम रहाताना भारतीय कुटुंब व्यवस्थेत, समाज रचनेत माझा कायमच कस लागत असतो. वेळोवेळी चर्चा होतात, वादावादी-वितंडवाद होतात. अर्थात गप्प बसून बाजूला व्हायची सुज्ञ वेळ माझ्यावरच येते.
पण अशा भावनिक आणि वैचारिक कसोटी पहाणा-या क्षणी मी नेहमी गांधीजींना आठवते. त्यांनी कधी केले होते-आहेत का असले कर्मकांड-सणवार,
धर्म-जाती-लिंगनिहाय गोष्टी ?
तर उत्तर आहे, नाहीच!
भारतीय कुटुंबात थोड्याफार फरकाने देव-देवी, उपासनांच्या पध्दती, काटेकोर रितीरिवाज, कर्मकांड, समजूती याचा फार पगडा आहे. त्यामुळे वर्षातून निदान ४-५ वेळा तरी माझ्या आयुष्यात या अनुषंगाने कोड्यात टाकणारे प्रसंग आयुष्यात ऊभे रहातात. अश्या समरप्रसंगी गांधीजी कसे वागतील याचा मी माझ्या बकुबाने अंदाज काढून तसच वागायचा शक्यतो प्रयत्न करते. म्हणजे मी काही गांधी विचारप्रणाली कोळून प्यायले आहे असही नाही. पण मला जेवढे गांधी विचार कळले, भावले, ते विचार मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. दूरान्वये का होत नाही पण गांधीजी आणि त्यांचे काही विचार मला गुरुसमानच आहेत.
परंतु गांधीजींच्या आयुष्यातील प्रार्थनेच्या अनन्यसाधारण महत्वापर्यंत, तसेच इतर अनेक विचारांपर्यंत मी अजूनही पोहंचू शकले नाही, ना ही माझी अजून तरी तशी धारणा पण झाली आहे.
लोखंडाला-सोन्याला परीस घासून जशी त्याची पारख करतात, तसच मी प्रसंग बांका आल्यास गांधी विचारांशी तो प्रश्न ताडून बघते आणि निश्चिंतपणे निर्णय घेते.
No comments:
Post a Comment