सक्काळी झोपेतून उठलं की आधी बाल्कनीचं दार, खिडक्यांची दारं उघडायची सवय आहे. आमच्या या बाल्कनीच्या मागे पाठीला पाठ लावलेला आमचा आणि शेजारचा बंगला आहे. साहजिकच जरा गच्च झाडी आहे. आमची पेरु, चिकू, आवळ्याची झाडं, त्यांचा आडमाप वाढलेला जांभूळ.
मस्त घनदाट झाडोरा बाराही महिने असतो. वैयक्तिक शिस्तीने बरेच पक्षी या झाडावर दिवसभरात हजेरी लावून जातात. निवांत शिळ घालत घटका दोन घटका बसतात.
बुलबुल, पारवे, सातभाई, देवकावळा, फुलचुखे तर अनेक. पहाटेची किलबिल ऐकत डोळे उघडायला छानच वाटतं. पण सगळ्यात छान काय असेल तर साधारण दुपारच्या बारा-साडेबाराला ऐकू येणारी एक अनोखी शिळ. या अनोख्या शिळीचा पक्षी मला कधीच दिसला नाही. पण त्याच्या त्या ठराविक वेळच्या गोड पण खणखणीत शिळीचा विसरही कधी पडला नाही.
या ठराविक वेळेत खोलीत आले की कान कानोसाच घ्यायचे त्या शिळीचा. ही शिळ पण इतकी एकस्वरी पण सुश्राव्य व दिर्घ असायची की उगाचच बाल्कनीत जाऊन इकडेतिकडे डोकावून त्या पक्षाला शोधावसं वाटायचं नाही. शांतपणे त्याची ती बिनधोक छायेतली आत्मविश्वासपूर्ण शिळ ऐकतच बसावसं वाटायचं.
आधूनिकीकरणाच्या रेट्यात, स्मार्ट सिटी बनण्याच्या तडाख्यात मध्यवस्तीत काही पक्ष्यांना निवांत बसायला एक थांबा आहे, अनडिस्टर्बड रियाज करायला एक हिरवी सावली अजूनही मिळते आहे याचंच मला अप्रुप वाटायचं. आणि ही जागा माझ्या घरातच आहे याचाही फार आनंद वाटायचा. भलेही ती जागा इतरांच्या दृष्टीने अडगळीची, गचपणाची का असेना.
तर काल अचानक ठकठक आवाज आला. पाहिलं तर एक लाकूडतोड्या ते जांभळाचं झाड तोडत होता. झाडाच्या खालच्या फांद्या शेजा-यांच अंगण व इतर खोल्या फार अंधारुन टाकत होत्या बहुदा.
या झाड तोडीची आच तेव्हा मला इतकी जाणवली नाही. उलट डांस कमी होतील या आशेने जरासं बरंच वाटलं. डेंग्युच थैमान पेपरमधनं कळतंय ना. भुतदयेचा कितीही कळवळा असला तरी पहिल्यांदा आपला जीव महत्त्वाचा असतो की.
पण आज खिडकी उघडली तर हिरवी गर्द झाडी जाऊन तिथे लख्ख उजेड दिसला. खटाखट तोडलेल्या फांद्यांवर एक फुलचुखा कावराबावरा होऊन बसलेला दिसला. आज त्याचा स्वरही हरवला आहे.
त्याचं विश्वासाचं, सावलीतल्या निर्विघ्न थांब्यांच ठिकाण नष्ट झालयं. त्याची आणि त्यांच्यासारख्या इतर पक्ष्यांची बाग नष्ट झालीये हे ओरडून इतरांना सांगण्या इतकाही त्याचा आवाज निघत नाहीये.
He is under shock.
एखाद्या जबरी धक्क्याने माणसाची वाचा जाते म्हणतात. पक्ष्यांनाही हे लागू आहे वाटतं.
अस्वस्थपणे, मुकपणे कोवळं ऊन अंगावर घेत एक हरवलेली हिरवी, ओलसर सावली शोधणारा एकाकी फुलचुखा अंतर्बाह्यपणे मला हलवून गेला.
No comments:
Post a Comment