काल मार्कोसला घेऊन औरंगाबाद शहरातल्या प्राचीन अशा कर्णपूरा जत्रेत गेले होते. दरवर्षी नवरात्रात ही जत्रा भरते. आम्ही सत्तर साली इथे रहायला आलो तेव्हापासून दरवर्षी इथे एकतरी चक्कर असतेच. अर्थात पुर्वीच्या आणि आत्ताच्या जत्रेत अमुलाग्र बदल झालाय. माझ्याही नजरेत आणि मानसिकतेत बदलाव आया हे. तरीपण या जत्रेत गेलं की जुन्या आठवणींचा पिंगाच सुरु होतो मनात. बालपणी मनाला भावलेलं, आवडलेलं काहीतरी शोधण्यात, हुडकण्यातच आता इथे वेळ जातो. आणि हे हरवलेलं हुडकता हुडकता नवीनच काहीतरी गवसून जातं.
आज तर ब्राझिलियन किशोरवयीन मुलगा बरोबर आहे त्यामुळे तर अजूनच वेगळ्या नजरेनी सगळ्या गोष्टी टिपल्या जाताहेत. मार्कोसला आपली जत्रा संस्कृती सांगणं आणि जुने लॅन्डमार्कस शोधणं अशा लपंडावात छान झाली ही जत्रावारी.
आम्ही शाळेत असताना दर नवरात्रात निदान दोन-तीन वेळेला तरी या जत्रेत जाणं व्हायचंच. पहिली भेट भल्या पहाटेच्या अंधारातच मंदिरात जाण्यासाठीचीच असायची. तेव्हा देवीच्या दर्शनाची काही असोशी नसायचीच. ओढ असायची ती कपाळावर ओमचा, त्रिशूळाचा चंदन टिका छापून घ्यायची. नंतर पिपाण्या, पिटपिट्या आणि योयो हे रबर आणि बॉलचं खेळणं विकत घ्यायची. आणि हा सगळा कार्यक्रम आटोपून घरी येऊन लगेच दप्तर उचलायचं की शाळेला पळायचं. आजचा अदालत रोड ते सरस्वती भुवन या परिसरात आम्ही वीस मिनिटांत पायी पोहोंचायचो.
शाळेतला सिन तर बघण्यासारखा असायचा. दर चार विद्यार्थ्या मागे एकाच्या कपाळावर या जत्रेतला आयकॉनीक चंदन टिळा असायचाच. आणि दर पाच पंचवीस मुलांमधे पिटपिट्या किंवा योयो हे खेळणं असायचंच. त्या वयात झटपट सकाळी आंघोळ करुन जत्रेत जाऊन कोण टिळा लावून येतं याची एक छुपी अहमिकाच असायची. आम्हाला जेमतेम दोनदा असं पहाटेसच जाणं जमायचं. पण काही मुलं-मुली रोज भल्यापहाटे उठून, जत्रा गाठून तो टिळा लावून येत आणि शाळेत भलताच तोरा दाखवत असत.
तसंच त्या पिटपिट्यांचा आवाज.
बापरे !
प्रार्थनेच्या आधी, डबासुट्टीत आणि शाळा सुटल्यावर या पिटपिट्यांच्या टॉक...टॅक... टॉक...टॅक अशा खणखणीत आवाजांचा हैदोस असायचा अगदी. कित्येक वांड पोरांना तर बेलगामपणे शाळेतमधे या पिटपिट्यांचा आवाज करण्यामुळे आणि येताजाता योयो एकमेकांना मारण्यामुळे मास्तरांचा मारही मिळायचा. या अशा खोडकर, आवाज करणा-या हजार बाराशे मुलांना सांभाळताना शाळेचे, मास्तरांचे काय हाल होत असतील ते आता कळतंय. पण ते काही असो या जत्रेमुळे शाळेतही दहा दिवस चैतन्य रहात असे हे ही खरंच.
मग एखाद दिवस दुपारी वडिलधाऱ्यांबरोबर जाणं व्हायचं. तेव्हा मात्र चंदन टिळा-बिळाचा आग्रह सोडून लाकडी हातपाळणे, हत्ती-घोड्यांच्या लाकडी चक्र्यात बसणे, फुगे, थोडं फार बांगड्या-टिकल्या अशी खरेदी करणे, देवीचं यथासांग दर्शन घेणे आणि काहीतरी च्याऊम्याव खाणं अशा गोष्टींना प्राधान्य असे.
दर्शनासाठी देवीच्या सभामंडपात खचाखच गर्दी असायची. आपल्या माणसांपासून ताटातूट व्हायची पण शक्यता असायची. मग आम्ही हरवल्यानंतर कुठे थांबायचं याचे थांबे आधीच ठरवून ठेवायचो. त्याकाळी गर्दीचा फायदा घेत कुणा ओळखीच्याची पर्स, सोनसाखळी, बांगड्या चोरीला गेल्याच्या कथा खूप ऐकायला येत असतं. मुलींची छेडखानी पण होत असे. त्यामुळेच या जत्रांमधून ग्रुप्स करुन आम्ही फिरत असू.
सगळे संभाव्य धोके असले तरी भलतीच मज्जा यायची.
दहा-बारांची एक टोळी एकदा का या लाकडी पाळण्यात बसली की आरडाओरडीला अगदी ऊत यायचा. तेव्हांचे ते तीस चाळीस फुट उंचीचे पाळणे हाताने ढकलले जायचे. डिझेलवर चालणा-या भव्य आकाशपाळण्यांनी हे गोंडस हातपाळणे कधी गिळंकृत केले कळलही नाही. या डिझेलच्या पाळण्यांची उंची आणि अनकंट्रोल्ड स्पीड बघूनच घाबरं सुटायचं. पंचवीसेक पाळणे कम खुर्च्या भरुन होईस्तवर कितीही उंच गेलो तरी काही वाटायचं नाही. पण एकदा का सरसर हे भिमकायी चक्र फिरु लागले की पाचावर धारण बसायची. विशेषतः उंचीवरुन खाली येताना पोटात खड्डाच पडायचा.
भले भले घाबरायचे, किंचाळायचे. मग या चक्रामधल्या एकेक पाळण्यांमधे कायमच एकदोघं मोठी माणसं आणि दोन-तीन छोटी मुलं बसवून सुरक्षा पाळत असत. पण मग टोळ्या फुटायच्या. त्यांचही वाईट वाटायचं पण मग मागच्या-पुढच्या पाळण्यातल्या मित्र मैत्रिणींचे खाली वर जातानाच्या आरोळ्या ऐकून भलतंच स्फुरण चढायचं. खाली जमिनीवर उभं राहून आपल्याकडे नजर ठेवून असणा-या पालकांना, लहान भावंडांना, भित्र्या मैत्रिणींना वाकुल्या दाखवताना तर एक जबरदस्त किकच बसायची आणि भिती तर कुठल्या कुठे पळून जायची. या पाळण्यात बसल्याखेरीज कुणाचीच जत्रा पुर्ण होत नसावी.
तशाच त्या लाल चिंचा. म्हणजे या परिसरात चिंचेची झाडं खूप आहेत. लहान पोरं फुलं-पानं-नारळं विकणा-या आईबापा शेजारी ढीगभर चिंचा विकत बसायचे. कर्णपु-यातून आलं की एकदा तरी चिंचेचा ठेचा ठरलेला असायचा. तसंच आम्हा मुलींना त्या लाल चिंचांच काय कवतिक असायचं बापरे. आतून लाल असणारी चिंच तोडून ओठांवरन फिरवली की ओठ लालचुटुक व्हायचे आणि आमची लिपस्टिकची हौस भागायची. आजच्या जमान्यात या लाल चिंचांना हर्बल, ऑरगॅनिक लिपस्टिक म्हणून भाव मिळायला हरकत नाही.
पण हाय !
आज दहा ठिकाणी विचारलं चिंचा कुठे मिळतील म्हणून. पुढे..पुढे...करत जात राहीले. मंदिर आलं तरी चिंचा मिळेना. शेवटी एका चिंचेच्या झाडाखालीच दुकान थाटलेल्या एका मुलाला विचारलं..अहो इथे चिंचा विकत नाहीये का कुणी ?
चिंचा ? ह्या काय झाडावरती आहेत की.
अहो या झाडावरच्या नाही. विकायला नाहीत का ? झाडावरच्या कोण काढून देणार आम्हाला ?
घ्या की तुमच्या तुम्ही काढून. आज रविवारची गर्दी आहे. कोणाला वेळ आहे इथे ?
तेही खरंच.
छोटेखानी पण रसरशीत कर्णपु-याच्या जत्रेनी आता कात टाकली आहे. जेमतेम दहा-बारा दिवस चालणारी जत्रा आता दिवाळी पर्यंत रहाते. देवीला जायच्या रस्त्याच्या दुतर्फा भरणारी जत्रा आता छानच फुगली आहे. संसारपयोगी वस्तुंची दुकानं वारेमाप वाढली आहेत. सगळा फुटकळ व्यापार गुजरात-राजस्थानच्या भटक्या विक्रेत्यांच्या हातात आहे. गोंदवणं, दागिने, खेळणी, मास्कस, शोभेच्या वस्तू, चपला, भांडीकुंडी, कपडे, गंगावणांचे स्टॉल्स, पाणीपुरी, कचोरी, समोसे, चायनिजचे खाद्यपदार्थांचे ठेले, दर्शनाच्या बहाण्याने सेल्फीत गर्क असणारी फुलपाखरं, व्रत घेतल्या नुसार अनवाणी, रांगत, मुक्याने दर्शनाला आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी इथे असते. विजेच्या आडमाप खेळण्यांचे विविध प्रकार इथे आता पहायला मिळतात. सहा सात मजली उंच इमारती इतके उंच पाळणे बघूनच धडकी भरते.
बरंच काही बदललंय, तरी बरंच काही जुनंच टिकून आहे. इथे येणं आणि एका सामाजिक उत्सवाची एनर्जी घेऊन परतणं यात अजूनही आनंद वाटतो आहे.
आणि हो अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे सुस्नात होऊन आलेल्या हजारोंच्या संख्येतल्या महिला अजिबात नवरात्रातल्या देवीचा सोकॉल्ड ड्रेसकोड पाळत नाहीत बरका !
सगळ्या रंगांची, पोतांची, सुगंधांची, भाविकतेची चित्तवेधक सरमिसळ अजूनही इथे पहायला मिळते हेही नसे थोडके.
No comments:
Post a Comment