आपलं शहर, आपली माणसं...
नवरात्र सुरू झालंय.
लख्ख ऊन पडतंय.
सकाळचा दुसरा चहा आणि कच-याची घंटागाडी अगदी दारासमोर उभी. तशी ती आठवड्यातून दोन-तीन वेळा तर असतेच उभी. कचरा मागत, उचलून टाकत.
मी बरेचदा व्हरांड्यातच चहा घेत बसलेली असते. योगाक्लास चुकवला तर हमखास ही गाडी, गाडीतले माणसं भेटतातच. म्हणजे नजरभेट होते. एकमेकांना पाहून ओळखही झालेली असते. पण ते आपले पालिकेचे कामगार, मी बंगलेवाली मोबाईल मधे डोकं घालून चहा घेत बसलेली.
वर्षातून दोनचारदा चहा देते या मंडळींना.
मलाच बरं वाटतं त्यानी. आज तर मावशी पण आहेत झाडलोट करणा-या.
मंडळी चहा घ्याल का ?
एकजण गाडी चालवतो. एकजण रस्त्यांवरचे कचरा डबे उचलतो, एकजण ते डबे गाडीत ओतून घेतो.
कचरा या शब्दाचाही एक स्टिगमाच आहे.
पै पाहुण्यांना बोलावून दिलेली मेजवानी, पण त्याच जेवणाचे ताटात उरलेले अन्न अगदी नको वाटतं हातानी उचलून टाकायला. तसंच कचरा डब्ब्यातला सगळा पसारा आपणच हाताळलेला असतो तरी पण कच-याच्या डब्यात गेलेल्या जिनसांना, पसा-याला हात लाववत नाही. ओल्या कचऱ्याची तर वेगळीच किळस वाटते.
ही मंडळी तर पन्नास घरचा कचरा रिकामा करुन घेतात आणि दिवसातले चार-पाच तास तरी कच-यातच ऊभे असतात. अगदी मोलं काम असलं तरी सुध्दा त्यांच्या कामाची दाद द्यायलाच हवी.
कोणीही पटकन् हो म्हणेना.
मग मावशीच बोलल्या...घ्या किहो च्या. एवढ्या विचारु -हायल्यात तं.
गाडीतला चालकाला मुकपणे विचारतोय. चालक डबे उचलणा-याकडे हेतुपुरस्सर बघतोय. शेवटी कचरा डबे उचलणारा म्हणला मॅडम मला चालेल चहा. त्याचा होकार बघून बाकीचेही तयार झाले.
आत येऊन झटपट स्ट्राॅंग अद्रकयुक्त चहा केला.
मावशी...हा न्या चहा बाहेर. पाणी पण विचारा.
आम्ही चहात साखर वरुन टाकतो. त्यामुळे आत्ताच्या हरेक कपातली दोन-तीन चमचे साखर विरघळवताना चमच्याचे मोजून पुटपुटत भरभर फेरे घेत होते. होना घाई तर होतीच. रस्त्याच्या मध्यात कितीवेळ कचरागाडी उभी करणार ?
आता बया ! च्यमच्या फिरवितांना मंत्र म्हनु लागल्या का काय तुम्ही.😲
ताई..मला जरा मजाक कराची सवय हाय बरं. न्हाई तं म्हन्शाल मावशी काय पन बोलत्यात म्हनुन.😆
असो. चहा चांगला झाल्याची एकमुखी पावती बाहेरुन मिळाली आणि समाधान वाटलं.
No comments:
Post a Comment