Saturday, 5 October 2019

नवरात्रातली रांगोळी

शुक्कीरवारी सांगितलेली गुरवारची कथा.

सध्या नवरात्रात रोज एक धातूचा ऍंटिक दिवा जमेल तसा लावत आहे. घरात स्पेसिफिक असा देव्हारा नाही त्यामुळे मनाला पटेल अशा सुयोग्य ठिकाणी दिव्यांचा साईझ बघून दिवा ठेवत आहे. तसंच घराच्या मुख्य दारासमोर एक दोन बाय दोनचा पॉलिश्ड कडाप्पा आहे. खास रांगोळी साठी करुन घेतलाय. बरेचदा सणावारी काढते रांगोळी, पण रोज एक रांगोळी काढायचा मनसुबा कधीच कोसळलाय.
तीन-चार वर्षांपूर्वी तामिळनाडू मधल्या जगप्रसिद्ध चिदंबरम मंदिरासमोरुन दाक्षिणात्य लयदार रांगोळींच भक्कम पुस्तक विकत घेतलय. दक्षिण भारतीय रांगोळ्यांना जगात तोड नाही असं माझं मत आहे. सळसळीत नागमंडल तर काय सुरेख काढतात हो.
तर रोज एक तरी रांगोळी काढायची आणि या पध्दतींच्या रांगोळी काढण्यावर कसब मिळवायचं अशी खरी मनीची इच्छा होती आणि अजूनही आहे.
पण हा इंचभर उंच फरशीचा २*२चा तुकडा समहाऊ मला छोटा पडतो. तर रोज न रांगोळी काढायचं हेही एक कारण आहे.
परत रोज ती रांगोळी कच-यात टाकायची. लक्ष नसलं की मावशी ती रांगोळी बागेत टाकून देणार. मुख्य म्हणजे राबत्याचं घर नसल्यामुळे एकदा काढलेली रांगोळी तीन चार दिवस तरी अबाधित रहातेच रहाते. मग उगाचच आपली हौस म्हणून, कला म्हणून चांगली रांगोळी पुसायची, नवीन काढायची. परत त्या गारगोटी रांगोळीचाही कचरा. कधी माझाच कंटाळा. थोडक्यात बहुतांशपणे ही फरशी ओकीबोकीच रहाते आणि ते पुस्तकही कपाटात सुस्तावून विराजमान असतं.
पण यंदा ठरवलंच. रोज एक दिवा, रोज एक रांगोळी.

सध्या अगदी बेसिक दक्षिणी रांगोळ्या काढणं चालू आहे. दक्षिणेत रोजच्या वारांच्या, देवी देवतांच्या, सणांच्या, नक्षत्रांच्या ठराविक रांगोळ्या असतात. माझ्याकडचं पुस्तक खुपचं माहीतीपूर्ण आहे पण तामिळी भाषेत आहे. त्यामुळे अंदाजानेच जे भावतय ते काढणं चालू आहे. एकदा एखाद्या तामिळीला गाठून हे पुस्तक समजून घ्यायला पाहिजे.
तर ते असो.

तर काल या वर्तुळाकार रांगोळीचा दिवस. पेन्सिलने चित्र काढणं आणि दोन बोटातून एकसारखी रांगोळी सोडत लयदार रेषा काढणं यात जमीन अस्मानाचा इतका नाही पण बराच फरक आहे. इतकी मोठी एकसारखी तीन चार वर्तुळं जमतील का आपल्याला ?
अरे काढ ना. शिकायचंच तर आहे ना आपल्याला.
डरो मत, निकालो सर्कल.
पाव, पाव तुकडे रेखाटत ब-यापैकी परिपूर्ण वर्तुळं काढता आली. अगदीच टाकावू न रेखलेली रांगोळी बघून नाही म्हटलं तरी आत्माराम खूश झाला.

ही वर्तुळं काढताना आर्ट स्कूलमधे पहिल्या वर्गात एक सर आम्हाला ही गोष्ट सांगत असत ती आठवली.
एक पश्चिमेचा चित्रकार आणि भारतीय चित्रकार यांची घनिष्ठ मैत्री होती. एकदा दोघांनीही दोघांमध्ये कोण श्रेष्ठ चित्रकार आहे हे बघायचं ठरवलं. त्यासाठी त्या विदेशी चित्रकाराने भारतीय चित्रकाराला घरी जेवायला बोलावलं. हा भारतीय चित्रकार त्याच्या घरी गेला. मग दोघंही समोरच दिसणा-या टेबलाकडे जेवायला निघाले तोच भारतीय चित्रकाराचं डोकं ठण्णकीनी समोरच्या भिंतीवर आदळलं. विदेशी चित्रकार हसला. म्हणजे त्या विदेशी चित्रकाराने समोर दिसणारी खोली, जेवण टेबल, खुर्च्या व इतर साहित्य यथार्थ दर्शनाने इतकं हुबेहूब एका भिंतीवर रंगवलं होतं की समोर दिसते ती खोली समजून भारतीय चित्रकाराचं चालताना त्या रंगवलेल्या भिंतीवर डोकं आपटलं. भारतीय चित्रकार चपापला. यथार्थपणे रंगवलेल्या त्या भित्तीचित्राला पाहून, अनुभवून, हसतमुखाने त्या विदेशी चित्रकाराला दाद दिली आणि काही दिवसांनी त्याला स्वत:कडे जेवायला बोलावलं. स्वत:ची चित्रकला दाखवायला.
मग हा विदेशी चित्रकार सुध्दा अगदी उत्साहाने भारतीय चित्रकाराकडे आला. छानपैकी जेवण, गप्पा झाल्या. मग तो विदेशी चित्रकार म्हणाला आता दाखव तुझी चित्रकला मला. भारतीय चित्रकाराने समोरचाच कोरा कागद ओढला आणि पेन्सिलीने सरसर दहा वर्तुळं काढून दाखवली. विदेशी चित्रकार दिग्मुढ झाला. म्हणला ही काय अच्युतम चित्रकला आहे का ? तू तुझं सर्वोत्कृष्ट चित्र दाखवायला मला बोलावलंस ना ? मग ही एकसारखी वर्तुळं काय दाखवतोस ? थट्टा करतोस का माझी ?
शांतपणे भारतीय चित्रकाराने त्या विदेशी चित्रकाराच्या हातात इंचपट्टी दिली आणि म्हटला, मोजून बघ प्रत्येक वर्तुळ. सगळी एकसारखी आहेत. एका सुताचा जरी फरक आला तरी मी आजपासून तुझा शिष्य व्हायला तयार आहे. विदेशी चित्रकाराने खरंच ती सगळी वर्तुळं मोजून पाहिली. सगळी एकसारखी. तसूभरही फरक नाही. एका फटक्यात आणि सहजपणे काढलेली ती वर्तुळं इतकी बिनचूक निघाली म्हणजे त्या भारतीय चित्रकाराच्या हातावर किती कंट्रोल असेल आणि किती सराव त्याने केला असेल बरं.
आमचे सर आम्हाला स्केचिंगचं, सरावाचं महत्त्व पटवून द्यायला ही गोष्ट सांगत असतं. गोष्ट किती खरी, किती खोटी माहित नाही. पण त्यातला अर्थ मात्र नक्कीच बावनकशी खरा आहे. सरावाला पर्यायच नाही.
उस्फुर्तता आणि सराव यांचा मेळ जमला की उत्कृष्टच कलाकृती निर्माण होते.

No comments:

Post a Comment