Tuesday, 24 September 2019

अत्र..तत्र...सर्वत्र....

मार्कोसला दिवाळीसाठी म्हणून झब्बा पायजामा घ्यायला बाजारात. झब्बा म्हटलं की चुकला फकीर मशिदीत म्हटल्यासारखं माझी पावलं सराफ्यातल्या खादी भांडारकडेच वळतात. माझ्या या खादी ऑब्सेशनची बरेचदा टर उडविली जाते, पण मी बधत नाही. माझी स्वत:ची या भांडारमधनं खरेदी तर चालूच असते पण आमच्याकडच्या एक्स्चेंजच्या मुलांना मी आवर्जून इथे एकदा तरी आणतेच आणते.

आमच्या घरी आलेली आत्तापर्यंतची एक्स्चेंजमधली मुलं युरोपियन होती. साहजिकच सर्वदूर पसरलेलं ब्रिटिश साम्राज्य आणि नंतरच त्याचं एकेक देशातून ढासळणं या ऐतिहासिक गोष्टींशी परिचित असायची. तसाही युरोपियन्सचा ब्रिटिशांवरती दात असतोच. 
भारतात येताना भारताविषयी बरीच माहिती घेऊनच ही रोटरी युथ एक्स्चेंजमधली मुलं भारतात पाऊल ठेवतात. त्यामुळे महात्मा गांधीविषयी ही मुलं जुजबी माहिती तरी बाळगून असतात. त्यामुळे खादी आणि ग्रामोद्योगांच्या जडणघडणी विषयी त्यांना सांगणं जरा सुलभ असतं.

मोहनदास करमचंद गांधी ऊर्फ महात्मा गांधी माहीत नसलेला मार्कोस हा पहिला आरवायई मुलगा.
चूक त्याची नाहीये. त्याची मातृभूमी ब्राझील भारतापासून खरोखरच फार दूर आहे. आणि आपला त्या देशाशी कधीच संबंध आला नाही. इतक्या दूरवरच्या देशातल्या षोडशवर्षीय मुलाला आपले महात्मा गांधी माहीत नसले तरी ते त्याला माफ आहे.

तर भर झिमझिमीत गल्ली बोळातून गाडी चालवताना त्याला थोडक्यात भारताचा हजार वर्षांपूर्वीचा इतिहास, मोगल साम्राज्य आणि नंतरची ब्रिटिश राजवट आणि एकोणिसाव्या शतकातील स्वातंत्र्य संग्राम थोडक्यात सांगितला. गांधीजींचं साऊथ आफ्रिकेतील वास्तव्य, वैचारिक बदल, असहकार चळवळ असं बरंच काही सांगत होते. तेही माझ्या not so refined इंग्लिशमधे. ऐकणा-याचं इंग्लिश तर अजून भारी. काय समजलं असेल देव जाणे.
पण सांगताना लक्षात आलं किती सुक्ष्म आणि किती वेगवेगळ्या पातळ्यांवर गांधींचे विचार आपल्यात भिनलेत ते. काय काय म्हणून सांगू याला ?
त्यांचे आरोग्यविषयक, धर्मविषयक, सामाजिक-राजकीय विषयक कितीतरी विचार आपण अंमलात आणतो, आणायचा विचार करतो.
त्यांची खादी, ग्रामोद्योग, खेड्याकडे चला, स्वदेशी, उपवास, निसर्गोपचार, साधेपणा हे सगळं कुठल्यानकुठल्या टप्प्यावर पटतंय, भावतय. भले ते अंमलात आणणं दुरापास्त असेल पण त्यातली यथार्थता बरेचदा जाणवत रहाते. बाहेर पाऊस झरतोय आणि इकडे बोलता बोलता गांधीजी समजावून सांगताना माझेच डोळे पाझरताहेत.
वैयक्तिक स्तरावर गांधीजीच्या पटलेल्या सगळ्याच गोष्टी नाही आपण-मी राबवू शकत.(न पटलेल्या पण काही गोष्टी आहेत) त्याला फार मोठा निग्रह लागतो.

खरंतर तर या संसारी हव्यासात, व्यावसायिक यशापाठी धावताना गांधीजींचा नाही म्हटलं तरी विसरच पडतो पण तरीही अधूनमधून हा गांधीबाबा आठवतही रहातो
हे ही खरंय.

जुनं खादी भांडार. ऐसपैस दुकान.
दोन ऑक्टोबर व दिवाळीच्या निमित्ताने भरपूर माल येऊन पडलेला. सुती, पॉली, वुलन व रेशमी खादी, टॉवेल-पंचे-सतरंज्या, काही तयार कपडे, हर्बल सौंदर्य प्रसाधनं, लाकूड-धातुंच्या वस्तू, गांधी विचारांची काही पुस्तकं आणि गांधी विचार अंगी भिनवलेली साधी खादीधारी विक्रेती माणसं.
काय असेल ते असो या भांडारात आलं की आपल्या भारतभुमीचा बावनकशी मृदगंध आल्यासारखा वाटतो.
गेल्यासरशी काहीतरी घ्यावसंच वाटतं. मग भले ती खरेदी गांधी विचारानुसार ग्रीड का असेना पण इथल्या विचारांचं, प्रेरणांच सुत जीवाला पार गुंतवून टाकतं.

No comments:

Post a Comment