माणिक मोती आणि गर्भश्रीमंती.
महालक्ष्म्यांसाठी म्हणून गावी गेलेल्या घरोघरच्या ब-याच महिला, कष्टकरी महिला आता शहरात परतल्या आहेत. मराठवाड्यातला हा सगळ्यात मोठा कुळाचारी सण. एकवेळेस त्या दिवाळीला घरी नाही गेलं तरी चालतं पण महालक्ष्म्याला सगळ्या अडचणी बाजूला सारुन सगळे भाऊ, सूना येणार म्हणजे येणारंच. वैयक्तिक मतभेद, कौटुंबिक कलह तात्पुरता विसरुन घरातल्या महिला पुरुष माणसांच्या मदतीने महालक्ष्म्यांचा सगळा थाट साग्रसंगीत, रितसर करणारंच. मग महालक्ष्म्यांचा दबदबाच तसा असतो.
अशीच माझी एक संध्याकाळी कामाला येणारी बाई. बाई कशाला म्हणू ? जेमतेम पंचविशीतली दोन मुलांची आई असलेली विवाहिता. शांत, हसरी पण सौम्य.
जालना जिल्ह्यातली. शेतकरी कुटुंबातली.
घरी समृद्ध शेती. वावरात पाणी. सुखाने भरलेलं घर. तरी दुष्काळ पडला की चहुबाजूंनी घेरुन आल्यासारखं आर्थिक ताण पडतो, थोडीफार कौटुंबिक धुसफूस अग्रेसर होते. मग शहरं खुणावू लागतात. आपापलं वेगळं रहाणं सुखाचं वाटायला लागतं. मुलांच्या उत्तम शिक्षणाचा मोह पडतो.
मुख्य म्हणजे गावापासून दूर आणि मोठ्या शहरात कुठलंही काम करुन पोट भरता येतं. गणगोतांचा धाक रहात नाही. गावात नाही म्हटलं तरी जातीचा आब राखावाच लागतो. कष्ट करणारा शहरात उपाशी मरत नाही आणि बोनस म्हणून कौटुंबिक स्वातंत्र्य मिळतं ते वेगळंच.
खूप जणांना हा शहरी मोह पडतो.
त्यातलीच ही एक. एवढ्यातच चार सहा महिन्यांपूर्वी शहरात स्थलांतरीत झाली आहे.
अजूनही शहरातल्या चार सहा घरची स्वैपाक पाण्याची कामं करायला इतरांसारखी सरावलेली नाहिये. कुठल्यातरी अपार्टमेंटमध्ये आऊट हाऊसमध्ये रहातय हे कुटुंब. नव-याची ही शहरी कामांची धरसोड सुरुच आहे.
हिचं मात्र जरा बस्तान बसलय. ही कामाला लागल्यापासून मलाही अस्वस्थता येत आहे. गावाकडची मोकळी हवा, सुपीक वावर, उबदार घरटं सोडून इथे शहरात कुठे साड्यांच्या दुकानात लागायचं, कुठे स्वैपाक करायचा, लोकांच्या उरल्या-सुरल्या पोळ्या घरी न्यायच्या, कामवाल्यांची, अपार्टमेंटमधल्यांची दादागिरी सहन करायची, आणि नाहीच पटलं तर दर चारेक महिन्यांनी खोल्या, कामं बदलायची. लेकरं दहा बाय दहाच्या खोलीत घुसमटताहेत. आई-वडीलांबरोबर फरफटताहेत.
नकळतपणे मी हिच्यात गुंतत चालले आहे. आडून पाडून काय चाललंय, कसं चाललंय हे काढून घेत असते. एक हक्काचे मुठभर वावर सोडून सुखाच्यापाठी धावत शहरात आलेल्या या कुटुंबाला जाणून घेताना माझेच डोळे उघडताहेत, मन अस्वस्थ होतंय आणि अधूनमधून शहरा बद्दलचा रागही मनात धुम्मसतोय.
तर काल जरा निवांत होतो दोघीजणी.
तुमच्याकडे उभ्या महालक्ष्म्या असतात का गं ? आणि फुलोरा पण असतो का ?
हो, उभ्याच महालक्ष्म्या असतात, फुलोरा पण असतो.
पाऊस आहे का गं तिकडे ?
हो, छान पाऊस हाये तिकडे. मस्त पानी पडलं यंदा. कपाशी तर इतकी मस्त झालीया.
वावराचा मोह पडला वाटतं ? परत गावी जायचा विचार तर करत नाहीयेस ना ? मला जरा आधी सांग हं काम सोडताना, नसता माझी फजिती होईल.
हं..लगेच नाई जानार, पन उन्हाळ्यात परत जाऊ. पोरांची शाळा झाली की. तिकडं वावरात पन कामं करायला कुनी मिळत नाई. कापूस येचायचे येक बाई पाचशे रुपे घेते. परत येनार अकराला, जानार पाचला. त्यापरता आपनच कष्ट केलेलं पुरतय आपल्याला. यंदा तं लगी पन्नास क्विंटल कापूस झालाय. किती पैसा बाहिर जाईल. त्यापेक्षा आपनच कपाशी येचायची. आपल्याला काये कुठं तरी कामंच करायचं.
माजी लेकरं पन गावीच खूश असत्येत.
कपाशी तं अशी मस्त डोलायली, सगळं हिरवगार झालयं, येवडुले, येवडुले फुलं, मागं डोंगर..आमचं वावर फारच छाने. लगी निघूच वाटत नाही तिथनं.
चला...महालक्ष्म्या पावल्या.
मग आता परत एकत्रच रहाणार का ? सासूने बोलावलं का ?
तसं तोंडावर न्हाई बोलल्या, पन नातलगांना म्हनत व्हत्या त्यांना आता यायला सांगा म्हनून. आन आता येकत्र न्हाई आपापलं यगळं रहायचं आन् आपापल्या वाट्याचं वावर सांबाळायचं.
घरातली एक लक्ष्मी सहा महिने काय बाहेर पडली आणि कौटुंबिक कलहाचा निर्णायक तसप्या झाला वाटतं.
स्वतंत्र घर-वावर, गावी परत जायच्या कल्पनेनीच मंडळी हरखली आहेत.
अथांग निळाई खालच्या ओल्या-सुक्या काळ्या आईची हाक, हक्काच मुठभर तृप्ततेने डोलणारं हसरं वावर, रक्ताच्या नात्याची ओढ एका लक्ष्मीला परत बोलावते आहे.
एका घुसमटवून टाकणा-या जीवनचक्रातून कुणीतरी सुटतय म्हणून मीच खुश झाले.
.....बरं मला सांग तुम्ही महालक्ष्म्या कशा उभ्या करता गं ?
काई नाई. कोथुळे असतात. त्यात गहू-ज्वारी भरायची. म्हणजे आपन हळदीकुंकू देतो तेव्हा त्या पडत न्हाईता. मंग मुखवटे, हातं बसवायचे. साड्या नेसवायच्या, डागिने घालायचे. कापसाचे वस्त्र घालायचे. त्यांच्या हातात इडे ठेवायचे, पैशे पन ठेवायचे.
महालक्षुम्या इडे(पानाचा विडा) तं इतके छान पकडत्यात. फारच छान दिसत्यात. फुलोरा असतो. चकली, लाडू, सांजो-याचा. मंग महालक्षुम्यांना कणकेच्या येन्या (वेणी) बोगवे (करंडे. बोगवे हा शब्द मी जवळपास पंचेचाळीस वर्षांनंतर ऐकला. माझी आजी कुंकवाच्या-मेणाच्या करंड्याला बोगवा म्हणायची. हा शब्द ऐकला आणि अंगावर सरसरुन काटा आला), फनी, जोडले(जोडवे) करायचे. प्रत्येकीला कणकेचे सोळा-सोळा दिवे करायचे, मुटके करायचे. केळीच्या पानांवरचे सोळा दिवे तं लगी इतके खास दिसतेत. नजर हटत न्हाई त्या दिव्यांवरनं.
लक्षुम्या येतात त्या दिवशी घरातल्या भिंतीवर हळदकुंकाचे छापे मांडायचे. पन त्या आधी जिथं लक्षुम्या बसतात ती जागा धुवून घ्यायची, शेनानं सारवून घ्यायचं. मंग लक्षुम्या आल्या की ते छापे मांडायचे. मंग त्या पान्यातचं दो-याला सात-नऊ गाठी मारुन दोरे भिजवून ठेवायचे.
महालक्ष्म्या समोर सात-नऊ अशे टोपले ठेवायचे त्यात घरातलंच धान्यांच्या राशी ठेवायच्या.
.....कोण कोणती धान्य गं ?
गहु, ज्वारी, तांदूळ,हरभरा डाळ, मूग, मोहरी, धने, जवस आणि शेवाळ्या (शेवया). मंग लक्षुमीच्या लेकरांसमोर फळं ठेवायची. शेप, पपई, केळी, डाळिंब, संत्री, टरबूज, काकडी, मक्का, लाल भोपळा ठेवायचा.
मंग दुसऱ्या दिवशी लक्षुम्या ज्येवतात. जेवनात अंबाडीची भाजी येगळी करतात आन्
मग आपल्या वावरातल्या किंवा खेड्यानी भेटतील तशा सोळा-यकवीस भाज्यांची यक्कच भाजी करतात.
.....इतक्या कुठल्या भाज्या असतात तरी ?
हं... पालेभाज्या मधे पालक, मेथी, चुका, श्येपू असतो, फळभाज्यांमधे गवार, भेंडी, चवळी, लाल भोपळा, दुधी भोपळा, (चकली) चक्री, बटाटा, टमाटे, शिमला, कोबी, फुलावर, घेवडा, बीन्नीस, मुळा, कारलं असतं. गोड म्हनुन पुरणपोळी आसती, आमटी, कढी, गुळाणी, भजे, वडे, पापड्या, पापड, कुरुड्या आन् साधा भात असतो.
.....गुळाणी म्हणजे ?
गुळाचं-साकरेचं पानी. काई जनांना पुरनपोळीवर दूध-तुप चालत नाई ना.
.....इतक्या भाज्यात सुरण, पडवळ राहिलंच की.
आणि आपल्या तुरीच्या शेंगा ?
आपल्याकडं कुटं होतात या भाज्या ? आन् तुर या दिवसात असती का ? तुर तं हिवाळ्यात निघती. या सनाला आपल्या वावरात, भागात जे पिकतया तेच वापरतेत.
मंग सवाशिण ज्येवली की घरातले सगळे जेवतेत.......
तिसऱ्या दिवशी महालक्षुम्या जातेत ना. मंग त्या दिवशी कानोले आन् शेवयांचा भात (शिरा) करतेत. प्रसाद म्हनुन. नंतर त्या भिजू घातलेल्या गाठी द्यायच्या.
.....गाठी द्यायच्या ? कुणाला ?
महालक्षुम्यांबरोबर पाच गाठी जातेत. दोन देवींना, दोन त्यांच्या पिलवंडांना, यक गनपतीची. मंग येक गाठीदोरा घरच्या दाराजवळ, यक भाकरीच्या दुरडीला, यक धान्याच्या मापट्याला, यक पैका-अडका ठेवत्येत त्या तिजोरीला, यक झाडूला, यक बैलांच्या खुटाला आन यक शेतातल्या सरकीच्या झाडाला बांधायची. लगी धा-पंदरा गाठी लागतेत.
मंग सगळं आवरुन ठेवायचं. कोथुळ्यातलं धान्य वावरात पेरायचं न्हाय तर घरीच खाऊन संपवायचं. पन उगा इकडं तिकडं द्यायचं न्हाई.
एकेक गोष्ट विचारत गेले आणि थक्क होत गेले.
भारतासारखा कृषिप्रधान, समृद्ध व प्राचीन देश. सगळं जगणं त्या पावसावर, पाण्यावर अवलंबून. आधुनिकीकरण व ग्लोबल वार्मिंगचे दणके न बसल्यामुळे ब-यापैकी शिस्तीत आणि वेळेत पडणारा पाऊस. वावरातली उन्हाळी आणि पावसाळी कामं उरकायला अथकपणे मदत करणारा बैल. मग त्याचा सन्मान करणारा बैलपोळा, मग पाऊसपाण्यावर उन्मलून आलेलं वावरातलं धनधान्य, भाजीपाला.
एका तत्कालीक सुखाचीच नांदी. निसर्गाच्या या भरभरुन देण्याचं कवतिक.
मग गणपती-महालक्ष्म्या.
घराला घरपण देणारी, वंशवेल समृद्ध करणारी, प्रकृतीला पुरक ठरणारी आदीशक्ती म्हणून, देव या कल्पनेचं स्त्री रुप म्हणून या महालक्ष्म्या लेकरांसह पाहुण्या म्हणून सन्मानाने आलेल्या. त्याचं कोण कौतुक.
घराची साफसफाई, जे छान, जे उत्तम ते त्यांच्या चरणी. काळ्याआईने भरभरुन दिलेलं, कष्टाने मिळवलेलं हिरवं सोनं तेही यांच्या चरणी अर्पण.
महालक्ष्म्ये असाच वरदहस्त ठेव आमच्यावर. आमच्या वावरावर, आमच्या घरादारावर, आमच्या कुटुंबावर.
तुझी कृपा असली की आम्ही निश्चिंत.
छोट्या छोट्या गोष्टीतही किती गहन अर्थ सापडतोय. घरातल्या उंबरठ्याला, भाकरीच्या दुरडीला, बैलांच्या खुंटाला, सरकीच्या झाडाला बांधलेल्या गाठी काळ्या आईच्या नात्याशी, मानवी जीवन साखळीशी असलेली एक नाळ परत परत जीवीत करताहेत.
कुठल्याही रितरिवाजांच्या मुळाशी गेलं की असं जिवंत, धगधगतं काही तरी सापडतं.
एका कृषीप्रधान देशातल्या मातीत, संस्कृतीच्या तळाशी, हे असे अनेक माणिक मोती असतील नाही ?
आपण शहरी मंडळी वरवरच्या वाहत्या पाण्याच्या बुडबुड्यांचे सप्तरंग निरखण्यातच गर्क असतो, गाफिल रहातो.
उमासोबतचा तासाभराचा संवाद मला श्रीमंत करुन गेला आणि ती माझ्यापेक्षा किती जास्त समाधानी आहे हे ही दाखवून गेला.
ही खरी गर्भश्रीमंती.
No comments:
Post a Comment