आनंद, समाधान आणि प्रसन्नता.
नेहमीप्रमाणे यंदाही आमच्या हिरण्यजवळच्या मौसाळा या गावी महालक्ष्म्यांसाठी गेले. यंदा इथे पोहंचायलाच उशीर म्हणजे संध्याकाळ झालेली. त्यामुळे कुणा एकाकडे न जेवता फक्त दर्शन असच नियोजन होतं.
व्हाया हिरण्य गेले तर पावसाची रिमझिम लागलेली. गेल्या दोन महिन्यांपासून लागलेल्या झिमझिमीमुळे मोठी झाडं सुस्नात झालेली तर तण अक्षरशः प्रचंड वाढलेलं. एखादा नवखा ही चहुकडची तुडुंब हिरवळ बघून फसायचाच. ही हिरवळ औट घटकेची आहे. यंदाच्या पाऊसरुपी ठिबक सिंचनावर वाढलेली. आमचा तलाव अजूनही घोट्यापर्यंतच भरलेला आहे. त्यामुळे आम्ही या हिरवळीला न भुलता चिंताग्रस्त होत आहोत.
तर असो.
मौसाळ्याला गेले. अंधारुन आलेलं. एकेका मिणमिण बल्बवर उजळलेल्या घरातल्या लखलख महालक्ष्म्या दिपवून टाकत होत्या. झगझगीत आणि तुफान सजवलेल्या ऊभ्या महालक्ष्म्या, त्यांच्यापुढे त्यांची लोभसं लेकरं. समोरच तुडुंब फराळ, फळं मांडलेली. त्यापुढे आरती, पुजेचं साहित्य, आणि सगळ्यात पुढे गहू-तांदूळ-धान्याच्या राशी. घरातल्याच दोन-तीन साड्यांच्या मंडपाखालचा हा देखावा वा मांडणी. अंधा-या-कोंदट अशा सोई-सोईने बांधलेल्या जेमतेम तीन खोल्या. त्यात हा सरंजाम. घर देखील पै पाहुण्यांनी भरलेलं. सख्खं-दुरचं काही भेदभाव नाही. ज्या सासुरवाशीणीकडे, माहेरवाशिणीकडे महालक्ष्म्या नसतात ती हक्काने काकू, मामी, आत्या अशा जवळ रहाणा-या कुठल्याही नातलगाकडे येणारं. कुणाची कोण महत्त्वाचे नाही. महालक्ष्म्यांच दर्शन व प्रसाद महत्त्वाचा. आलेली प्रत्येक महिला नातलग पटंपटं काम करणार, पाहुण्यांना जेवायला वाढणार. ख-या अर्थाने नातलग, सोय-यांना जवळ आणणा-या कुलदेवता महालक्ष्म्या. दारी आलेला प्रत्येकजण जेवूनच जातो. त्यामुळे बेअंदाजी पाच पन्नास जणांचा स्वैपाक घरोघरी शिजतो. काहीही कमी पडत नाही. गेल्या सात-आठ दिवसांपासून राबणारी घरधनीण कामं कर करुन थकलेली, उपाशी असली तरी आलेल्या पाहुण्यांच्या अगत्याने येण्यानेच तृप्त होते. दिवसभर स्वैपाकात गुंतलेल्या गृहलक्ष्मीला तर बाहेरच्या बाहेर कितीकं दर्शनाला येऊन गेले, जेवून गेले पत्ताही नसतो.
दर्शनासाठी आलेला प्रत्येकजण घरुन काही तरी धान्य घेऊनच येतो. आणि महालक्ष्म्यांच्यासमोर असलेल्या राशींमधे ते धान्य ओततो. बघता बघता साताठ किलो तांदूळ-गहू, डाळींच्या राशी तयार होतात. बहुदा ज्याच्या शेतात जे प्रामुख्याने पिकतं त्यातला किलो दोन किलोंचा वाटा महालक्ष्म्यांच्या निमित्ताने यजमान कुटुंबियांना दिला जातो. महालक्ष्म्या उठल्या की हेच धान्य सांड लवंड न करता त्या कुटुंबानीच संपवायचं असतं. कीती छान प्रथा आहे. म्हणजे कुळाचारी सण साजरा करताना यजमान कुटुंबावर आर्थिक ताण तर येतंच असणार. त्यामुळे दर्शनासाठी आलेली मंडळी फुल न फुलाची पाकळी म्हणत आपल्याच वावरातलं धनधान्य या महालक्ष्म्यांच्या चरणी अर्पण करुन यजमान कुटुंबियांना मदत करत असावेत.
ग्रामीण भागात अशा एकोप्याच्या छान प्रथा आहेत. त्यावरही एकदा अभ्यासुन लिहीन. लग्नातले आहेर करायच्या मागची भुमिका खरतर अशीच आहे. पण त्याप्रथेने आता बिभत्स रुप घेतलंय.
तर ते असो.
एकेकाळचं मुठभर असलेलं गाव आता कात टाकतय.
घरोघर मोटरसायकल्स, गल्ल्यांमधन दोन-तीन टैक्सीज-ट्रक्स ऊभे दिसतात. बदाबदा सिमेंट वापरुन मजले उभे रहाताहेत.
घरातल्या अंतर्गत सजावटीही बदललेल्या आहेत.
गेले विसवर्ष झाली इथल्या महिला आमच्या हिरण्यवर कामाला येताहेत. तेव्हांच्या पन्नाशीतल्या सासवा आता आमचं काम सोडून नातवंड सांभाळत घरीच बसल्या आहेत. नव्या दमाच्या सुनांना आमच्याकडे बिनघोरपणे कामाला पाठवत आहेत.
बरं झालं म्याडम तुमी आलात. लगी लयी छान वाटलं.
बसा, दर्शन घ्या, जेवायला बसा.
नको ? मंग कढी तरी प्या, पुरणपोळी खा, भज्जे तरी घ्यानं म्याडम. दर्शनाला आलात आन काही प्रसाद न घेता कशे जाता ? ऐ..सरला आन गं भज्जे आणि लाडू म्याडमसाटी.
म्याडम..यकदानी नवी क्येली का ?
लई नाद्दर दिसु -हायली. आन कानातल्या बाळ्यापन छानैता. शेहरातल्या बायांना आता पुन्ना सगळं जुनंच आवडू लागलंय नाई म्याडम ?
म्याडम आता येकदा अशी काळ्या मन्यांची पोत करा. लयी छान दिसती. ही बगा अश्शी. आट मनी काळे, चार मनी सोन्याचे. काई फार सोनं लागत न्हाई म्याडम. कराच तुमी. लयी खाश दिसताल.
मला असे कौतुकभरले नितळ सल्ले देणा-यांच्या अविवाहित आणि अकरावी-बारावीत शिकणाऱ्या टिन एजर मुली, पुतण्या, नाती मात्र झाडून सगळ्या पॅन्ट-टिशर्टमधे. लवलवून पापड-कुरडया वाढत होत्या.
वेड्यावाकड्या गल्ल्या. दुतर्फा तुळशी वृंदावन राखून मजले चढवलेली घरं. बहुदा नुकतेच हे अरुंद रस्ते सिमेंट थोपवून पक्के केलेले आहेत. ओल्या सिमेंटवर गाई-म्हशी चालल्यामुळे पर्मनंटली ठसे उमटलेले गोपद्म-खुरांचे ठसे खुप काही गहन सांगून जातात. प्रत्येक दारासमोर रांगोळी, दाराला तोरण.
आणि घरं म्हणाल तर महालक्ष्म्यांच्या साक्षीने ओतप्रोत समाधाने, आनंदाने भरलेली, प्रसन्नतेने उजळलेली.
इथे येऊन चित्त प्रसन्न झालं.
एकीने तर वावरातला ताजा भाजीपालाच संगत बांधून दिला.
तरी पण खेड्यांप्रमाणे, घरांप्रमाणे काही कुटुंबही कात टाकताहेत. भाऊ-भाऊ वेगळे होताहेत. अटीतटीने दोघंही वेगवेगळ्या महालक्ष्म्या बसवून आईला कानकोंड करताहेत.
काळ प्रवाही आहे.
काही गोष्टी झपाट्याने बदलतात तर काही कासवाच्या गतीने बदलतात.
पण बदल हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
आहे त्या परिस्थितीत आनंदी-समाधानी रहाणं हेच आपल्या हातात आहे.
No comments:
Post a Comment