विघ्नहर्ता !
गेले दोन-तीन दिवस झाले माझ्यामागे तडतड सुरु आहे. आता म्हणाल तडतड सुरु आहे म्हणतीये बाई आणि फेसबुकवर तर पोस्टींचा रतीब पडतोय. तर आवडीचं काम कितीही असलं की हलकंच वाटतं आणि बिन आवडीचं चिमुटभर काम सुध्दा तडतड वाटू शकतं.
तर ते असो.
No sansari kirkir today !
गेले चारपाच वर्ष झाली रोटरी युथ एक्स्चेंजमधल्या मुलांना घेऊन दौलताबाद जवळच्या माळीवाड्याला ग्रामीण भागातील बैलपोळा दाखवायला न्यायचं, तिथून नंतर हिरण्यला जेवण करायचं आणि घरी परतायचं असा माझा फिक्स कार्यक्रम असतो. यावेळेस नेमके पोळ्यालाच पाहुणे घरी जेवायला बोलावलेले. त्यामुळे या वर्षीच्या दोन्ही ब्राझिलियन मुलांना घेऊन मी घर सोडणं अशक्य होतं. मार्कोस शिवाय जी दुसरी ब्राझिलियन मुलगी आली आहे तिचं भारतीय कुटुंब औरंगाबादजवळच्या खेड्यातील आहे. शेती वाडी, गुरं-ढोरं असलेलं सधन आणि एकदम मराठमोळं कुटुंब.
या घरात राहील्यामुळे लेटिशिया एकदम होक्का..बरं...अस्सं का..हो...येते की...असं हेलकाढू पण फर्मास मराठी बोलायला शिकली आहे.
मला बैलपोळ्याची जाग येईपर्यंत ती कन्या ऑलरेडी त्या खेड्यात बैलपोळ्यासाठी पोहोचली होती. तिच्या आईला म्हटलं अहो आता तुम्ही जाणार असाल गावी तर मार्कोसला नक्की न विसरता घेऊन जा.
भारतासारख्या शेतीप्रधान देशातला बैलपोळा हा सुप्रसिद्ध व देखणा सण मार्कोसच्या नजरेतून सुटतोय म्हटल्यावर माझा जीव फार चुटपुटला.
परत थोड्यावेळाने त्या बाईंना फोन केला.
अहो..कुणीही सोबत असेल तरी चालेल पण मार्कोसला तुमच्या गावी न्याच. त्याही हो म्हणाल्या. पण त्यांच्यासाठी दरवर्षीचाच हा सण. त्या ब्राझिलियन कन्येबरोबर घरातली उत्साही मंडळी त्यांनी कधीच पाठवून दिली होती.
....काय हो ? मला कळवायचं नाही का ? मार्कोसलाही मी मुक्कामी पाठवलं असतं. छान खेड्यात राहून त्याला जवळून पोळा बघता आला असता. मी जरा चुटपुटतच बोलले.
अहो आधी बोलला असतात तर लिटिशीयाबरोबरच यालाही पाठवून दिलं असतं. लिटिशीया देखील काही बोलली नाही.
....होना, तिलाच कळायला पाहिजे होतं. दोन-तीन दिवस राहून मार्कोसलाही ग्रामीण जीवन कळलं असतं, ग्रामीण सणवार बघता आले असते.
या सगळ्या चुटपुटत्या संवादापासून अनभिज्ञ असलेला निवांत लोळणारा मार्कोस बघून माझीच बैचेनी वाढली. संध्याकाळ होत आलेली.
पोळा संपायला एखाद दोन तासच राहीले असतील. परत त्यांना फोन, परत नन्नाचा पाढा.
आपण काय मिस करतोय याची मार्कोसला जाणीव नव्हती त्यामुळे तो शांत होता. पण माझी चुटपुट, धडपड त्याला आता जाणवायला लागली होती.
मनातल्या मनात चुकचुकतच दारापुढे रांगोळी काढायला बसले आणि घरातलाच ड्रायव्हर समोर आला. लगेच डोक्यात चक्र फिरलं. छावणीत पोळा कुठे साजरा करतात याचा मागोवा घेतला आणि मार्कोसला ड्रायव्हर बरोबर स्कुटरवरच छावणीत पिटाळलं. पाच सहा बैलजोड्या आणि उत्साही मंडळी आणि त्यांचे फोटो-व्हिडिओज मिळाल्यामुळे मार्कोस खुश झाला आणि मार्कोसचा पोळा बघणं चुकलं नाही म्हणून माझाही जीव भांड्यात पडला.
मीन टाईम मार्कोसला आपल्याबरोबर खेड्यात न नेल्यामुळे मी लेटिशीयावर रागावली आहे असा लेटिशीयाचा समज झाला. अर्थात ही सगळी भाषा समजणं, न समजण्याची, अर्धवट समण्याची गंमत आहे.
तर आज परत हरतालिका पूजन. आमच्या इथे शुकशुकाट. ती ब्राझिलियन कन्या अजून त्या खेडेगावीच. ग्राम्य जीवनातले सणवार बघत, गोडधोड खात.
उद्या गणपती. परत आमच्याकडे शांतता.
आता काय करावं बाई ? कुठे न्यावं या पोराला ? गणपतींच्या मुर्तींनी, सणावारांच्या सजावटींच्या साहित्याने बाजारपेठ सजलेली, सगळीकडे उत्साहाला उधाण आलेलं.
ढोल-ताशे, आगमनाची मिरवणूक, मुर्ती स्थापना, आरती, पूजा...माझ्या लहानपणीचा धडाकेबाज गणेशोत्सव माझ्या नजरेसमोरून हलेना.
आता याला कुठे नेऊ आणि कशी नेऊ ?
बरं या गदारोळात आता मला रमणं शक्य नाही.
असेच इकडेतिकडे फिरवणारे कुणीतरी उत्साही कार्यकर्ते मिळाले पाहिजेत.
परत त्या बाईंना फोन. अहो आजतरी तुम्ही जाणार आहात का गावी ?
नाही हो. पण तुम्ही एक काम करा. त्याला द्या आमच्या घरी पाठवून. माझ्या मुलीच्या हरतालकेच्या पुजेच्या तयारीत मदत करेल, गणपती आणायलाही जाईल घरच्यांबरोबर आणि संध्याकाळी मी गावी जाणार आहे तेव्हा त्याला घेऊन जाईल. द्या पाठवून.
हुश्य !
अख्खा महाराष्ट्र गणपती गौरींसाठी सजलाय आणि आमच्याकडे वारंही नाही.
अख्ख्या जगतात दुमदुमणा-या आपल्या या महाराष्ट्रीयन सणाच्या पारंपरिक साजरीकरणापासून, रंगबिरंगी उत्साहापासून मार्कोसने वंचित राहू नये ही माझी मनोमन इच्छा.
झटपट तयार होऊन, कॅमेरा घेऊन मार्कोस निघाला पण.
Ok, Marcos enjoy your day and festival also. Observe everything, shoot whatever interests you and if you have any questions ask Leticia's mom.
Ok, but Aai it's very difficult to ask Leticia's mom anything. Because she understands and speaks only Marathi.
Ok, no problem. You can ask me once you are back.
Now go and enjoy !!
चला तात्पुरती का होईना, पण सुटले एकदाची त्या होस्ट मॉमच्या आणि सजग भारतीय नागरिकाच्या जबाबदारीतून !
गणपती बाप्पा मोरया !!
🌺🌸🏵️🌺🏵️
No comments:
Post a Comment