जेष्ठा - कनिष्ठा.
कामानिमित्त शहरातल्या एकेकाळच्या गजबजलेल्या बाजारात भर दुपारी चक्कर. माझ्यासारख्याच गर्दी नको म्हणून बाहेर पडलेल्या महिलांची ही गर्दी.
गणपती - गौरी अगदी तोंडावर आलेले. भांडी बाजार भलताच झळझळून उठलेला. साहजिकच आहे. गणपती आणि गौरी-महालक्ष्म्यांसारखे दणकेबाज आणि कडकडीत कुळाचारी सण जे येऊ घातलेत.
लहानपणापासून बघतेय गणपती म्हणजे चिल्लर पार्टीची धावपळ आणि महालक्ष्म्या म्हणजे महिलांची लगबग.
घरं आवरणे, शिलकीतली पण कुळाचाराला लागणारी भांडीकुंडी, कापड-चोपड धुणे. महालक्ष्म्यांचे सांगाडे माळ्यावरनं काढणे, डेकोरेशनच्या साहित्याची जमवाजमव करणे. लक्ष्म्यांना नेसवायच्या (घरातल्याच)साड्यांची निवड करणे, त्या साड्या ठाकठीक करणे, महालक्ष्म्यांच्या कापूस भरलेल्या हातापायांची डागडुजी करणे, मुखवट्यांवर गरजेप्रमाणे रंगांचा हात फिरवून घेणे, प्लास्टिकच्या हार तु-यांचीही सोय लावणे, किराणा भरणे अशी ब-याच कामांची जंत्री असायची. त्याकाळी या सणासाठी, डेकोरेशनसाठी लागणा-या गोष्टी दरवर्षी नवीन घेण्याचा थाट कधीच नसायचा.
उलट महालक्ष्म्यांची एखादी गोष्ट जरी बदलायची म्हटली तरी कौटुंबिक महिलावर्गात सल्लामसलत होऊन निर्णय घेतला जायचा. मुखवटे बदलणं तर फार मोठी गहन गोष्ट असायची. त्यामुळे अक्षरशः विस-पंचवीस वर्षसुध्दा कुणी मुखवटे बदलायचं नावं काढत नसतं.
पण महालक्ष्म्यांच्या साड्या, गळ्यातले हार, आसपासचं डेकोरेशन अशा कमी महत्त्वाच्या गोष्टी बदलायचं स्वातंत्र्य यजमानिणीला नक्कीच असायचं. त्यामुळे घरातल्याच पण ठेवणीतल्या जरतारी साड्या महालक्ष्म्यांना नेसवल्या जात. साधारण किमतीच्या, तेल-तुप, हळद-कुंकवात निभणा-या पण झगझगीत साड्यांची आणि सुवर्णरंगी पण खोट्याच दागिन्यांची वैविध्यपूर्ण रेलचेल यजमाणीनींच्या मर्जीने या महालक्ष्म्यांच्या राशीला असायची. अर्थात कुळाचारात आणि सोवळ्या ओवळ्यात मात्र कुठेही कमतरता नसायची वा बदल करायचं धाडस कुणी दाखवायचं नाही. महालक्ष्म्यांचा दबदबाच तसा आहे.
पण हल्ली बराच बदल या महालक्ष्म्यांच्या साजरीकरणात झालेला दिसतो. म्हणजे कुळाचारी मुळं घट्टमुट्टच आहेतच अजून पण महालक्ष्म्यांच्या त्या साड्या, दागिने, हळदीकुंकू, डेकोरेशन या प्रकाराने अक्षरशः कात टाकली आहे. निदान शहरी उच्चवर्गात तरी. बाजारात फिरलं की हा फरक लगेच जाणवतो.
खास महालक्ष्म्यांसाठी म्हणून जेष्ठा-कनिष्ठांच्या जोडीच्या एकसारख्या साड्यांनी बाजारपेठ भरली जाते. त्यातही ट्रेंडीनेस असतो. मध्यंतरी तर बेळगाव सिल्क आणि सेमी, पुर्ण पैठण्यांचा धुमाकुळ होता. बघू त्या सुखवस्तु महालक्ष्म्या पैठण्यात असायच्या.
त्यातही परत आता एक नवीनच सेन्सिटिव्हिटी उदयाला आली आहे. यजमानिण महिला (जावा-जावा) स्वत:ला आवडणा-या किमती साड्या महालक्ष्म्यांसाठी म्हणून घेतात. मग महालक्ष्म्यांच्या अंगावरच त्या साड्यांची रितसर घडी मोडली जाते. आणि नंतर शकुनाच्या म्हणून त्या साड्या घरातल्या कारभारणी नेसू लागतात. म्हणजे थोडंसं धाडसाने सांगायचं तर नाव महालक्ष्म्यांच आणि गाव यजमानिणींच होतं.
आता यजमानिणच साडी नेसणार आहे म्हटल्यावर माफक किमतीचा टॅग कधीच उडतो आणि या निमित्ताने एक से एक पारंपरिक साड्या घ्यायला महिलावर्ग गर्दी करतो. बाजारपेठा तर असतातच दबा धरुन गि-हाईकं हेरायला.
आता जिथे एकच सून असेल तिथे काय होतं असेल बरे ? तिथेही उपाय आहेच.
घरातलीच एखादी भाविक नातलग वा सुनबाईंची जवळची मैत्रीण स्वतःच्या पैशाने जेष्ठा-कनिष्ठा पैकी एकीला साडी घेते. महालक्ष्मीला ती साडी भक्तीभावाने नेसवते नंतर सण संपला की शकुनाची साडी म्हणून स्वत: वापरायला लागते. मग कधीतरी हळूहळू कुण्या एका ठिकाणच्या महालक्ष्म्या पावतात म्हणूनही एक विचार रुजतो. मग अजूनच हिरीरीने या साड्या नेसवायची अहमिका इतर स्नेहींमधे लागते. प्रत्येकाच्याच संसारी रामरगाड्यात कुठेतरी उणीव वा किरकिर असतेच. मग कुणीतरी विश्वासानी त्या महालक्ष्मीला साडी नेसवतो, यथावकाश संकटही पार पडतं. आणि मग भाविकाचं एक पक्क श्रध्दास्थान बनतात या महालक्ष्म्या.
खरंतर हा सगळा श्रध्देचा, विश्वासाचा भाग, अंतर्यामीचा प्रवास ऐकायला फार सोलफुल आणि ह्रद्य वाटतो. पण आपण जेव्हा बाजारात फिरतो तेव्हा त्याचं बिभत्स व्यावसायिक रुप जाणवतं. आणि आपण आता किती आपल्या सोयीने कुळाचारी सणवार सुध्दा वळवून घेत आहोत हेही जाणवतं.
काही उच्चभ्रू घरांमधनं तर महालक्ष्म्यांसाठी दरवर्षी सोन्याचा नवीन दागिना वा ट्रेंडी मंगळसूत्र बनवायचा घाटही घातला जात असेल बुवा. आपली तिथपर्यंत पोहंच नाहीये.
आणि अशा बडेजावी घरांमधले हळदीकुंकू म्हणाल तर बापरे !
भलताच थाट असतो हो हल्ली. पुर्वीच्या काळी या कुळाचारी महालक्ष्म्या उरकता उरकताच महिला इतक्या अर्धमेल्या होतं की कसाबसा रिवाजी हळदीकुंकवाचा कार्यक्रम सर्वसाधारणपणे त्यांच्याकडून साजरा होत असे.
हल्ली तर हळदीकुंकू म्हणजे एक इव्हेंटच असतो.
घरं झकपक करणं, तुफान डेकोरेशन करणं, केटरर्सच जेवण ठेवणं. अख्ख्या नौकरवर्गाला वेठीला धरुन घरादारातली, बागेतली जय्यत तयारी केली जाते.
चांदीच तबक-करंडे-अत्तरदाणी-गुलाबदाणी अशा झळझळीत सरंजामासह हळदीकुंकू नोकरांकरवी दिलं जातं. घरातली सुवासिनी झकपक पण पारंपरिकपणेच तयार होऊन आल्यागेल्यांशी हास्यविनोद करत महालक्ष्मी महात्म्य सांगत असते.
घरातल्या आंग्लाळलेल्या मुली ट्रेंडी परकर-पोलक्यात मम्मीच्या मागेपुढे करतात.
आणि ग्लोबलायझेशनचा परिणाम म्हणून, सोशल मिडिया मुळे झालेल्या अतुट मैत्रीचा आविष्कार म्हणून असेल पण यजमान कुटुंबियांचे तमाम इतर
धर्मिय - जातीय मैत्रीणी या महालक्ष्म्यांच्या दर्शनाला तोडीसतोडपणे प्रासंगिक वैविध्यानिशी नटूनथटून येतात. खास कुळाचारी जेवणाचा (व्हाया केटरर) आस्वाद घेतात. दुस-या दिवशी एकेकीची फेसबुक वॉल इथल्याच उत्साही फोटोंनी ओसंडून जात असते.
म्हणजे महालक्ष्म्यांच्या दर्शना पेक्षा महालक्ष्म्या आणि इतर सरंजाम बघणं-दाखवणं असा हा प्रवास होतं आहे.
यातलं धर्म - जात विसरुन कर्मठ धार्मिक वेळीसुद्धा एकमेकांकडे जाणं, खेळीमेळीने रहाणं खुपच स्पृहणीय आहे.
अशाच पध्दतीने ईद, लोहाडी, नवरात्र पण साजरे होतात. पण दुर्दैवाने ही मानसिकता फक्त सोईच्या आणि गुडीगुडी सेलेब्रेशनपुरतीच असते.
धर्म की रोटी और अपनेही बेटी की बात आई तो सब अपने अपने जाती-धर्म के झेंडे लेके खडे हो जाते हैं.
विंडो शॉपिंग सारखं हे वरवरचं सेलिब्रेशन असतं. घटकाभराची करमणूक आणि आठवडाभराचे फोटो, यापलीकडे ही सहिष्णुता वा सामंजस्य जात नाही.
माझं हे लिखाण कदाचित कुणाला खटकेल.
पण जेव्हा जेव्हा तरुण अविवाहित मुलांच्या पालकांना वा मैत्रिणींना मी भेटते तेव्हा मुलामुलींच्या विवाहा विषयी बोलण्याचा रोख जरा वेगळाच असतो.
आम्ही आमच्या मुलांना जोडीदार निवडीचे पुर्ण स्वातंत्र्य दिलयं. जो अच्छा लगता है, भाता है उससे शादी करो बेटा-बेटी. सिर्फ वो दो या तिन जातीया छोडके.
घरोघर असे मार्गदर्शकपर सल्ले स्वातंत्र्यप्रिय मुलांना दिले जातात.
वर्षभर इतरेजनांकडून घरादारातली सगळी कामं इमानेइतबारे करुन घेणारे नेमक्या या कट्टर कुळाचारी दिवसांत त्या कामगारांना सुट्टी देतात.
व्यक्ती तितके विचार हे जरी खरं असलं तरी, सकारात्मकतेचं एक पाऊल पुढे टाकताना दोन-चार चुकीच्या चालीरीती आपण रुजवत नाहियेत ना हे पहाणं आणि एखाद्या विचारपूर्वक स्विकारलेल्या विचारांचं शिवधनुष्य पेलत रहाणं देखील गरजेचं आहेच की !
No comments:
Post a Comment