Wednesday, 28 August 2019

खुशीयां ही खुशीयां....

खुशीयां ही खुशीयां....

मपली बरीचशी कामं अजूनही जुन्याच औरंगाबादेत बिनबोभाट होतात बुवा.
एका साडीला गोंडे करायला टाकायचे होते. एक गोंडेवाला आहे. म्हणजे दहा वर्षांपूर्वी मीच गोंडे करता का म्हणून विचारायला गेले आणि त्याने हो म्हणून सांगितलं. आणि चक्क साठ रुपयात एका निजामबादी झगमगीत सिल्क साडीला मस्त गोंडे करुन दिले होते.

अस्मादिकांना अशा कुठल्याही अडनिड्या प्रांतातून भटकत काही शेलक्या वस्तू, कपडा वा साड्या आणायची भलती हौस आहे.
नांदेड-हैदराबाद वाटेवरचं निझामाबाद हे तेलगू वस्तीचं गाव. तिथे दर आषाढ महिन्यात आषाढम नावाचा कपड्यांचा, साड्यांचा मोठा सेल लागतो. नांदेडच्या लोकांना पुण्या-मुंबई पेक्षा हैदराबाद आपलं वाटतं आणि जवळही आहे. त्यामुळे नांदेडच्या हौशी महिला एक दिवसात निजामबादला जाऊन या सेलमधून गठ्ठ्याने साड्यांची खरेदी करतात.
मला जरा साऊथ इंडियन कॉटन व सिल्क साड्याच जास्त आवडतात. सख्ख्या बहिणीकडे लग्न होतं. मी आणि नांदेडस्थित एक बहिण ठरवून निझामबादला गेलो.
मी पहाटेसच औरंगाबादहून रेल्वेने निघाले. त्याच रेल्वेत ती नांदेडहून बसली. अकरा वाजता निजामबाद. तिथे दिवसभर बाजारपेठ पालथी घातली. कसलं साऊथ इंडियन सिल्क आणि कसलं कॉटन. सगळा चमचम, झगझग सिंथेटिक माल. उपाडा सिल्कची रेलचेल नसता घाऊक रेटमधे रोजच्या वापरायच्या सिंथेटिक साड्या. नाही म्हटलं तरी एवढी उठाठेव केलेली काही मनासारखं, हवं ते मिळेना. अगदी निघायच्या आधी एका दुकानात जरा काही बरं दिसलं. एक सेल्समन पण मराठी बोलणारा समजणारा निघाला. त्याने झटपट दहा-बारा साऊथ इंडियन टच असणा-या साड्या समोर टाकल्या. परतीच्या रेल्वेच वेळापत्रक सांभाळत त्यातल्या मनपसंत दोन तीन साड्या उचलल्या आणि परतलो.
साऊथकडच्या साड्यांच सिल्क खूप दणकट असतं. साड्यांची लांबी रुंदीही खूप असते. ब्लाऊज पिस देखील अख्ख्या मिटरचा असतो. बुट्टे सुध्दा इतके भरगच्च आणि जवळ जवळ असतात ना की चटपटीत रंगातली सौम्य झगमग साडी अगदी नजरेतच भरते.
तर अशा या सुरेख साडीला मला गोंडे करुन हवे होते. औरंगाबादला बरीच शोधाशोध केल्यानंतर एका प्रसिद्ध फॉल पिको करुन देणा-या दुकानात हा गोंडे करुन देणारा भेटला. तेव्हाही त्याने छानच गोंडे छान करुन दिले होते.  या गोंड्यांच्या प्रेमापायी नंतरही मी जवळपास सगळ्याच सिल्क साड्यांना आवर्जून गोंडे करुन घेतले. काहीही म्हणा गोंड्यांशिवायची साडी अपुर्णच दिसते.
अर्थात काही अपवाद वगळता.

तर आज परत त्याच दुकानात. तोच गोंडेवाला समोर. कामाचं बोलणं झाल्यावर दुकानातल्याच शेजारच्या माणसाला तो गोंडेवाला म्हणतो..मालूम है क्या ये मॅडम के वजहसेही मैं गोंडे करने लगा. बोले तो पैसे लेके गोंडे करने लगा. वैसे अपने शौक के लिये करता था. लेकीन इनके कारण पैसे लेके गोंडे करना जो शुरु हो गया है वो आज तक चालू है.
मॅडम अब तो बडी धुम से चालू है गोंडे बनाना. एकेक साडी को सातसो-आठसो के गोंडे मैं बनाता हुं मॅडम. दुकानात पाहिलं तर खरंच गोंड्यांचे त-हेत-हेचे नमुने बनावटींच्या किमतींसह ठिकठिकाणी लावून ठेवले होते. एकुणच जाहिरात बघता गोंडे करायचा कार्यक्रम जोरातच सुरु दिसतोय. त्या दुकानदाराचही कौतुक वाटलं. इतक्या वर्षांनंतरही त्याची ती प्रांजळ कबुली ऐकून नाही म्हणलं तरी अस्मादिकांचा जीव सुखावला.

चारशे वर्षांचा इतिहास असणा-या, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असणा-या औरंगाबाद शहरात एकविसाव्या शतकात गोंडे बनवायची परंपरा आपण रुजवली. समजून, उमजून दिल सहीमें खुशीसे भर गया.
या दुकानाचा मालक अजुनही मला पाध्येबाईंची मुलगी म्हणूनच ओळखतो. हा गोंडेवाला इथला कारागीर आहे.

खुशीतच समोरच्या गायत्री चाटभांडारच्या पाय-या चढले आणि कचोरीचा स्वाद घेता घेता स्वत:च्याच गोंडे करवून घेण्याच्या खटाटोपावर निस्सीम फिदा झाले.

‌****चटपटीत रंगाच्या साड्या आणि गोंड्यांचा फोटो सुप्रसिद्ध चित्रकार शशीकांत धोत्रे यांच्या एका पेंटिंगचा काही भाग आहे.

No comments:

Post a Comment