हल्ली कुठलीही गोष्ट करायला जा, विकत घ्यायला जा वा खायला जा, त्याविषयीची इतकी मतांतरे ऐकायला येतात की अक्षरशः काय करावे, घ्यावे वा खावे हे कळेनासे होते.
दुरुन आपण ऐकूनच असतो की अन्नपदार्थात सर्रास भेसळ होते म्हणून. पण जोपर्यंत आपल्या दारात, घरात काही नजरेस येत नाही तोपर्यंत त्याची आच आपल्याला जाणवत नसते.
असंच परवा एका व्यक्तीने सांगितलं अहो त्या बाजारातल्या साजुक तुपात काही दम नसतो बघा. सगळी भेसळ असते. खरं तुप म्हणजे गावरान तुप. माझ्यासारखीला हे थोडंसं पटण्यासारखंच आहे.
कारण बघा विचार करा.
अख्ख्या भारतभरची अगणित किराणा दुकानं या टॉप व सेमी टॉप ब्रॅन्डेड साजूक तुपाच्या मालानी खच्चून भरलीयेत. साजूक तुपातल्या मिठायांनी हलवायांची दुकानं सजलेली आहेत. लग्नसमारंभ, भंडारे वा जेवणावळी साजुक तुपानेच संस्कारीत होताहेत. आणि बडेजावी घरात सुध्दा साजुक तुपाशिवाय पान हलत नाहिये. नामांकित तुपांशिवाय परत खेडोपाडी घरगुती तुप बनवणा-या गवळ्यांच्या छोट्या-मोठ्या वसाहती आहेतच. म्हणजे भारतातले एकदिवसाचं साजुक तुपाचं कंझप्शन जरी काढलं तरी कितीतरी मोठा आकडा समोर येईल. खरंच येवढ्या मोठ्या स्केलवर साजुक तुपाचं उत्पादन करायची आपली कपॅसिटी आहे का ? आणि मग खरोखरच ते तुप साजुक असतं का ? का त्यात भेसळ केली जाते ?
नॉनब्रॅन्डेड तुपांच जाऊ द्या, पण ब्रॅन्डेड मालाला तरी नियमांचा धाक असतोच ना ?
बरं किराणावाल्याला विचारलं तर तो आपलं नरो वा कुंजरोवा करत सगळेच ब्रॅन्डस् चांगलेच आहेत हे सांगत रहातो. आणि शेवटी त्याला ज्यावर कमिशन जास्त आहे तो माल पुढे करतो. अनभिज्ञ वा पोरसवदा गि-हाईक असेल तर चक्क जुना माल गळ्यात बांधतो. कालच एका दुकानात गेले होते. मॅडम ते गावरान वगैरे काही नसतं. लोकांना बनवायचे धंदे आहेत ते. अहो आमच्या कडनं १५-१५ किलो तुपाचे डबे नेतात, लुज पॅकिंग करतात आणि गावरान तुप म्हणून विकतात. एॅगमार्कवालं तुप घ्या. ब्येष्ट असतं.
सगळा शिक्षितपणा, अनुभवाने आलेली अक्कल पणाला लावली तरी खरोखर काय चांगलं आणि काय वाईट कळेनासं होतं.
परवाच ते गाई म्हशींना बेदम जास्त दुध येण्यासाठी हार्मोन्सची इंजेक्शन्स देण्याविषयीच्या क्लिप्स पाहिल्या.
बघून, वाचून थक्क झाले. अक्षरशः दुध आणि दुग्धजन्य पदार्थांवरची विश्वासरुपी वासनाच उडाली. एक प्रकारच स्लो पॉयझनच आपण भक्तीभावाने शरीरात रिचवत आहोत या भावनेने झोप उडाली. मग या मेडिसिन इंड्युस्ड दुधाचीच पुढची पायरी म्हणजे तुप. घरपोच दुध पोहंचवणा-या गवळ्यावर विश्वास ठेवावा का दारोदार मिळणाऱ्या पिशव्यांवर भरोसा ठेवावा कळत नाही.
असाच प्रश्न मला मांसाहारी लोकांबद्दल आणि त्यासाठी उपलब्ध होणा-या, असणा-या प्राण्यांबद्दल पडतो.
गेल्या आठ वर्षांतील एक्स्चेंज स्टुडंस् मुळे मांसाहाराविषयीचं आमचं ज्ञान घरबसल्या बरंच वाढलंय.
जे जे जिवंत आहे ते सगळं खायचं हा कमी जास्त प्रमाणात जगभरचा खाक्या. झटपट वाढणारे छोटे प्राणी ठिक आहेत. पण घोडे, ऊंट, गाई-म्हशी, मगरी-सुसरी, मोठी कासवं-व्हेलमासे हे प्राणी पुर्णपणे वाढायलाच चार सहा वर्ष लागतात. परत भौगोलिक स्थितीमुळे जगातल्या काही ठरावीक प्रदेशातच हे प्राणी वाढतात. म्हणजे या प्राण्यांची संख्या कंपॅरेटिव्हली सिमितच असणार. मग यांची तासाला शंभर-दोनशे-तिनशे प्राणी अशी कत्तल करणारे कंप्लिटली ऑटोमेटेड कारखाने कसे चालतात ? इतकं झंझावाती उत्पादन करायला रॉ मटेरियलचा पुरवठा तर पाहिजे ना ? नियमितपणे होणा-या हजारों घोड्यांच्या-ऊंटांच्या कत्तली तर इमॅजिन करणही कठिण जातंय मला.
औरंगाबाद शहरातलं आमचं घर ते सोळा किलोमिटरवरच्या आमच्या हिरण्यवर जाताना दर रविवारी निदान दोन डझन शेळ्या-बोकडं उघड्यावरच्या खाटकांकडे टांगलेली दिसतात. हे फक्त एका रस्त्यावरचं मी सांगतेय. म्हणजे शहराच्या पन्नास किलोमिटरच्या परिघात निदान ५०० बोकडांची हत्या दर रविवारी अशा उठवळ दुकानांमधून होत असावी. दर रविवारी एवढ्या मोठ्या संख्येने बोकडं-शेळ्या येतात कुठून हा मला सततच पडणारा प्रश्न आहे.
एक ना एक दिवस कंझपशन आणि पुरवठा यातल्या तफावतीमुळे तमाम पृथ्वीवासी मांसाहार सोडून घाऊकपणे व झटपट वाढणा-या घासफुसीकडेच वळतील असं मला उगाचच वाटतंय. कदाचित या मांसाहाराच्या व्यवसायाची मला पुर्णपणे कल्पना नसावी. पण उगाचच आपला बसल्या बसल्या डोक्याला काहीतरी खुराक.
No comments:
Post a Comment