Thursday, 15 August 2019

या चिमण्यांनो...

या चिमण्यांनो.....

बालपणातली म्हणजे नांदेडची नागपंचमी घरात साजरी केलेली आठवत नाही पण दुरड्यांमधे नाग घेऊन येणारे गारुडी मात्र पुसटसे आठवतात. दारी आलेल्या नागांची शेजार पाजा-यांकडनं पूजा केली जायची, दुध पाजलं जायचं, लाह्या दिल्या जायच्या आणि गारुड्यालाही काही पैसे दिले जायचे. फक्त एवढच आठवतं. बाकी काही नाही.
पण जेव्हा आम्ही औरंगाबादच्या कोटला कॉलनीत रहायला आलो तेव्हापासूनची काही वर्षांची तरी नागपंचमी स्पष्टपणे आठवत आहे. मध्यभागी चौक आणि चार बाजूंनी दुमजली, एका इमारतीत सहा घरं असलेल्या चार इमारती, आणि अशा ३५ इमारतींची साधारणतः गोलाकार साखळी अशी कॉलनीची रचना होती. आणि या मधल्या गोलात भव्य मैदान, सांस्कृतिक स्टेज, पिठाची गिरणी आणि जूनी-पुराणी चिंचेची दोन थोरली झाडं होती. एक झाड उजव्या हाताला, जरा इमारतींच्या अगदी जवळच अशा अडचणीच्या जागी होतं तर डाव्या हाताचं मैदानातल्या मोकळ्या जागेत ऐसपैस विस्तारलं होतं. आम्ही उजव्या बाजूला रहायचो, साहजिकच डावीकडचं झाड परकच वाटायचं आणि डाव्या बाजूला रहाणारी मंडळीही आमचं झाड म्हणून जरा जास्तीचाच हक्क सांगायचे.

साधारण ३५ इमारतीत २१० च्या आसपास घरं, कुटूंब तिथे नांदायची. ब-यापैकी आनंदाने तरी देखील डावं-उजवं असायचंच. कॉलनीला तिन गेटस होती(फाटकां विरहीतची) उजवं-मधलं-डावं.
आम्ही रहायचो त्या चार इमारतींच्या चौकात रेशनचं दुकान होतं. रॉकेल-पाणी टंचाईच्या काळात आमच्याच चौकात सगळ्यांचा झाडून राबता असायचा. रॉकेल-पाण्याचे टॅन्कर्स सतत आमच्या चौकात यायचे त्यामुळे कायम वर्दळ असायची. एकूणच लोकांचा येण्या-जाण्याचा राबता असल्यामुळे सणवार भरपूरच गाजावाजा होत साजरे व्हायचे. अशीच ती नागपंचमी पण साजरी व्हायची. घरोघर निदान तीन मुलं तरी असायची. तेव्हा मुलींची संख्याही खूप असायची. विविध गावांचे लोकं असायचे. खूप काही गमतीशीर समजूती असायच्या. त्यातलीच एक म्हणजे मेंदी भिजवताना त्यात चिमणीचा गु(शी) कालवला की मेंदी छान रंगते हा होता. तेव्हा आसपास मेंदीची झाडं पण असायची. मग ती ताजी पानं कुटून मुठीत धरुन, मुठी रुमालांनी बांधून हात रंगवले जात. विशेषतः लहान मुलींचे. आम्ही तर मेंदी खलबत्त्यात देखील कुटल्याचे आठवत आहे. आत्तासारखी तेव्हा मेंदी पावडर सर्रास मिळत नसे. पंचमीच्या आसपासच मेंदी बाजारात येई. तर आईच्या मार्गदर्शनाखाली ती पावडर पंचमीच्या आदल्या सकाळी भिजवून ठेवायची आणि शाळेतून आलं की मेंदीचा बाजार मांडून बसायचं. आई जरा दटावूनच रात्री मेंदी लावू असं सांगायची. कारण एकदा मेंदीत हात घातले की ते रंगून जात. मग आईने कीतीही छान डिझाईनची मेंदी काढली तरी आधीच रंगलेल्या हातांमुळे तिची मजा निघून जात असे. मग आई आणि इतरांच्या आया सायंकाळचं जेवण-खाणं भराभर आटोपून आम्हा मुलींच्या हातावर मेंदी काढायला बसत. त्यात माझ्या आईचं ड्रॉईंग छान त्यामुळे तिला काम पुरायचं आणि इतरांच्याच हातावर मेंदी काढून-काढून तिचे हात इतके अस्ताव्यस्त रंगत की नक्षीदार मेंदी काढायला जागाच रहात नसे. मला कुठल्याही निमित्ताने काढलेल्या नक्षीदार मेंदीचे आईचे हात आठवतच नाहीत. लहान मुलींच्या हातावर आधी मेंदी काढली जाई. पुर्वीची मेंदी अशी झटपट वाळणारी पण नसायची. मेंदीचे डाग पडतात म्हणून जूने फ्रॉक्स घालावे लागायचे, फाटक्या चादरींवर झोपावं लागायचं. भर श्रावणातल्या पावसाळी हवेत कितीही हुडहुडी भरली तरी झोपायच्या आधी टेबल फॅनसमोर उभं राहून मेंदी माफकपणे वाळवली जायची. शेजार पाजार धरुन दहा-पंधरा जणांची मेंदी काढली जायची. तेव्हा आत्ताच्या सारखे नोकदार कोन्स नसायचे. मेंदीचा वाडगा, काड्यापेटीच्या काड्या किंवा खराट्याच्या काड्यांनी नजाकती रेघा रेखल्या जायच्या. बोटांची पेरं आणि नखं तर पुर्णतः मेंदीने भरवली जात. तेव्हाची डिझाईन्स देखील तशी ढोबळ असायची. पुर्णतः नैसर्गिक मेंदी असायची त्यामुळे मेंदी देखील माफकपणेच पण लाल-नारिंगी रंगायची.
हं..तर काय सांगत होते मी ?
तर आम्हा समवयस्क मुलींची मेंदी काढून झाली की आम्ही शाळकरी मुली चौकातले रॉकेलचे रिकामे ड्रम्स आडवे पाडत असू आणि त्यावर दोन्हीकडे पाय टाकून घोड्यावर बसल्यासारखे बसून गाणी, कविता म्हणत मेंदी वाळवत असू. सगळी धडपड ती ओली मेंदी विस्कटू नये याची आणि जास्त गहरी रंगावी याची असे. सगळ्यांच मेंदी लेपन आवरेपर्यंत ११ वाजून जात. मग रंगल्या हातांची स्वप्न बघत आम्ही चादरी, सतरंजीवर निद्राधीन होत असू.
सकाळी डोळे उघडले की पहले हात बघायचे. अबाधीत लालचुटुक रंग दिसला की अशी कळी खुलत असे की बस्स. मग त्यावेळच्या समजा प्रमाणे उरलेली वाळकी मेंदी खरवडून काढायची. शक्यतो पाण्यात हात घालायचेच नाहीत. आंघोळीला फाटा द्यायचा. जो पर्यंत तुझी मेंदी, माझी मेंदी अशी रंगीन चर्चा मैत्रीणींबरोबर होत नसे तोपर्यंत जीवातजीव येत नसे. एकदा का सुंदर डिझाईन आणि पक्क्या रंगलेपणाची पावती सगळ्यांकडनं मिळाली की मेंदीच्या खटाटोपाचं सार्थक होत असे. त्यात नजाकती मेंदी रेखाटणारी आपलीच आई असेल तर विचारायलाच नको.

हं..तर मेंदीचा सगळ्यात क्रुशियल खटाटोप म्हणजे चिमण्यांचा गु जमवणे हा. आम्ही रहायला आलो तेव्हा कोटला कॉलनीच्या वरच्या आणि तळमजल्याच्या खिडक्यांना फक्त गज होते. पण आम्ही रहायला आलो आणि सुरक्षिततेच्या कारणांसाठी तळमजल्याच्या खिडक्यांना बारीक जाळ्या ठोकल्या गेल्या.
झालं.
आता कशाला चिमण्या आमच्या खिडकीत येताहेत आणि विधी उरकताहेत ? लगेच वरच्या मजल्यावरच्या मुलींना जोर आला. सगळा चिमण गु त्यांच्या घरातल्या गजांवर. आम्ही तसेच हिरमुसलेले. मग आम्ही स्वामीत्व हक्कानी आमच्या घराच्या वरच्या मजल्यावरच्या घरातला गु हक्काने गोळा करायची टूम काढली. परत दुसऱ्या इमारतीतल्या पण जरा जवळच्या कुटुंबामधल्या गजांवर पण आमचा हक्क राखून ठेवला. म्हणजे श्रावण लागला की पंचमी पर्यंत शाळेतून आलं की घरोघर हिंडून खिडक्यांचे गज साफ करणे हाच आमचा कार्यक्रम असायचा. यासाठी काड्यापेटीचा वापर केला जायचा. ज्यांच्या घरात फक्त मुलंच किंवा मोठी मुलं असायची अशा कुटुंबात आमचं फार कौतुकाने स्वागत केलं जायचं. घरोघर भर दुपारी कड्या वाजवून काकू...खिडकी... म्हणत आम्ही प्रवेश घेत असू. आमचं हे वेड बघून तमाम काकवाही फार हसायच्या. कदाचित त्यानांही त्यांचं बालपण आठवत असावं.
मेंदीच्या नक्षीची आणि रंगलेपणाची रंगीन चर्चा शाळेतही फार व्हायची.

तर खुद्द पंचमीच्या दिवशी त्या दुरच्या डावीकडच्या झाडावर कोण झोका बांधत असे माहित नाही. पण दुपारनंतर तिथे तमाम लहानथोर महिला वर्ग जमा व्हायचा आणि झोके खेळायचा. अवाढव्य चिंचेवरचाच झोका तो. झोक्यावर चढणं देखील मुश्कील व्हायचं खेळणं तर दूरच. पण तरुण कॉलेजकुमारीका फार चढाओढीने हा झोका चढवायच्या. दोन दोन मुली उभं राहून बिनधास्तपणे झोका उंचच उंच न्यायच्या. त्याचं ते दिलखुलासपणे हसत खेळत झोका चढवणं तर मला अजूनही आठवतय. त्यातल्या एकदोन मुली अजूनही स्मरणात आहेत. मुलं सुध्दा झोका खेळायची. एकूणच खेळीमेळीच्या वातावरणात पंचमी संपायची.
या काळात आम्ही जरा लहानच होतो. त्यामुळे नागपंचमी म्हणजे मेंदी एवढीच आठवण मला प्रकर्षाने आहे. श्रावणरात्रीचा हवेतला गारवा, हातावरची गारीगार हिरवट मेंदी आणि उद्याच्या रंगलेल्या मेंदीसाठी स्वप्नाळलेल्या आम्ही.
गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी.
पुन्हा म्हणून अशी मेंदी हाताला लागली नाही.

No comments:

Post a Comment