रोटरी युथ एक्स्चेंजमधे आलेल्या ब्राझिलियन मुलाला येऊन तीन आठवडे होऊन गेले. सर्वप्रकारचं नॉनव्हेज ब-यापैकी नियमितपणे खाणारा हा मुलगा. आमच्याकडे तसं नॉनव्हेज होत नाही. म्हणजे अगदी शिव..शिव नाही पण कुणालाच फारशी घरी नॉनव्हेज खाण्याची उर्मी नसते आणि नाही पण.
हा मुलगा आल्यापासून हा झिमझिम पाऊस लागलेला. माझ्या भाच्याची ब्राझिलला जायची शेवटच्या टप्प्यातली तयारी. मुलीची दोन महिन्यांच्या ट्रिपवर जायची तयारी. माझा शिंगावर घेतलेला मॉन्सून शो. त्यामुळे नाही म्हटलं तरी त्याच्या पचनी पडणारं फार वेगळं जेवण करणं जमतंच नव्हत. तरी बटाटा-भेंडी भाजी, पराठे, शिकरण पोळी, इडली, खिरी, वरणभात आणि सौम्य पुलाव आणि तिखटाचा, मसाल्यांचा हात राखून केलेला आपला रोजचा स्वैपाक या गोष्टींशी त्याच टिपण जमलं. नसता फळं, ब्रेड आणि अंडी होतीच हाताशी.
तीन दिवसांपूर्वी पुण्याला गेलो. तिथे गेल्यावर तर समारंभ, नातलगांकडे जरा चरबरच खाणं झालं. गप्पांच्या ओघात म्हणाला आल्यापासून माझं पाच किलो वजन कमी झालंय. खरंतर इतकं वजन नसेल कमी झालं पण दोनेक किलो होऊ शकतं. आईच्या भुमिकेतून काळजीच वाटली. आणि मग मनाने ठरवलं की आता पुढचा महिना आधी याचं खाणं रुळावर आणायचं.
तर आज पुण्याहून परतताना गोदावरीकिनारी मासे विक्रेते दिसले. म्हटलं मासे घ्यायचे का ? तर एकदम त्याचे डोळे चमकले. लगेच उतरलो. मासे खाण्यापेक्षा मासे खरेदी करायची, शिजवायची खुमखुमीच मला जास्त आहे. खरंतर येत काही नाही.
ड्रायव्हर काका म्हटले बाम मासा घ्या मॅडम. चांगलाही असतो आणि काटाही फार नसतो.
फुटकळ दुकानापाशी मासेमार उभाच होता पोतं घेऊन. अक्षरशः काही मासे जिवंत होते. चिवळी का चिवल नावाचे मासे साफसूफ, तुकडे करुन घेतले. माशांची ही असली कटाई-छटाई बघणं सुध्दा धाडसाचं असतं हो.
खरंतर सोवळा श्रावण अगदी बहरात आलाय. आणि इकडे आम्ही मासे खरेदी करतोय. मला स्वत:ला श्रावणाचं नैमित्तिक सोवळं नसलं तरी घरात येणाऱ्या कामगार महिला, कहरी ब्राह्मणी शेजारपाजार, हाकेवर जागृत मंदिर आणि घरात हे वास मारु मासे. तरी म्हटलं संस्कृती की करवट बदलो, चल उद्या आपण मासे करु. कारण शहरात पोहंचल्या पोहंचल्या मार्कोसला मंगळागौरीला जायचं होतं. रोटरीच्या एका कुटुंबात हा कार्यक्रम होता. मुलगा असला तरी हा रोटरीचा प्रोग्राम कल्चरल एक्स्चेंजचा आहे ना त्यामुळे मार्कोसला आग्रहाचे आमंत्रण होते मंगळागौरीचे. आणि गंमत म्हणजे मला या मंगळागौरीला बोलावलंच नाही.
तर ते असो. संस्कृतीने और एक करवट बदली.
घरी आल्या आल्या मासे धुतले. मी खिचडी टाकत त्याला म्हटलं करायचे का मासे तर लगेच त्याचा चेहरा खुलला. या गोजिरवाण्या पोराकडे बघत प्रवासाचा थकवा बिकवा, सार्वजनिक श्रावणी सोवळं बाजूला सारत मासे करायला घेतले.
म्हटलं चार तुकडे तुझ्या पध्दतीने कर, चार तुकडे आमच्या(?) पध्दतीने करते.
झंझावाती पुणे दौरा करुन आल्यानंतर लगेचच रात्री मासे करायला घेणे माझ्यासाठी भलतंच साहस होतं. पण म्हटलं पीछे हटने का नही. मार्कोसने आपले माश्यांचे काप अजून पातळ करुन घेतले, लिंबू लावलं आणि तेलावर मंदपणे तळले.
माझी आपली गडबड. कुठलं भांड घेऊ, कुठलं फडकं पुसायला घेऊ ? त्यात ते मासे साफ करणं, धुणं. सिंकमधली बुळबुळ घाण, माशांचा दर्प. राम..राम...राम....तेवढ्यात वास घेत मांजरी टपकल्या. आजपर्यंत नॉनव्हेजची चवही न चाखलेल्या यजमानांनी नाकं मुरडत खिचडी खाल्ली आणि बेडरुमचा रस्ता पकडला.
अक्षरशः कुठून हा घाट घातला असं झालं.
तरीपण जसं आठवत होतं तसं तेल, हळद, मीठ, लिंबू झटपट माशांना चोपडलं. दणदण लसूण अद्रक वाटून घेतलं आणि तेही माशांना लावलं. मग बारीक रव्यात मीठ, लिंबू व तिखट मिक्स केलं आणि त्यात ते मासे तुकडे रोल करुन घेत शॅलोफ्राय केले. झाकण ठेवायचं का नाही, लिंबू टाकायचं का नाही, आलं लसुण रव्यात कालवायचं का तसंच चोपडायचं काही फारसं आठवत नव्हतं. सुचेल तसं करत गेले. एकूणच मासे प्रकरणाचा रागरंग बघता माझी मी चुपचाप खिचडी खायला बसले. मार्कोसही त्याने केलेले मासे खायला बसला. त्याला त्या माशांची चव फारशी आवडली नाही. एकतर नवीन जातीचा भारतातल्या नदीतला मासा आणि कदाचित त्यालाही रेसिपी फारशी येत नसावी. मी तर तो मासा चाखून बघायच्याही फंदात पडले नाही. एकतर मासे तुकडे हाताळून आणि पुनः पुन्हा हात-भांडी धुवून मी बेजार झाले होते. त्यात तो वास. जाऊद्या.
मग म्हटलं आता मी केलेला मासा घे त्या तव्यावरचा. वरचं आवरण जरा स्पाईसी वाटलं त्याला. मग अंदाजाने का होईना पण रव्याच्या आवरणाखाली तो निटस शिजलेला मासा मात्र त्याला तुफानच आवडला.
गुद.. इट्स वेरी गुड. रियली गुड.
टुमॉरो यु टिच मी हाऊ टू मेक फिश लाईक धीस.
सो आय वोन्ट फरगेट. इट्स वेरी टेस्टी.
बेटर दॅन माय फिश. चार पैकी दोन तुकडे चवीने फस्त करत नाईस आई..यु मेक लव्हली फिश...हे वाक्य ऐकलं आणि संस्कृती चक्क घोरायला लागली हो.
#RYEanecdotes
No comments:
Post a Comment