दिवाळीच्या निमित्ताने घरात पणत्या पेटवाव्यात.
सुबकशी पणती.
त्यात माफकच तेल.
चार दिवस आधीपासूनच तेलात सचैल न्हायलेली कापूसवात.
पणतीच्या चोचीतून बाहेर काढलेलं वातीचं नेटकं टोक. फडफडत का होईना पण सर्रकन वात पेटायला वेळ लागत नाही.
बाकीच्या पणत्या पेटवून होत नाही तो पहिल्या ज्योतीने जीव पकडलेला असतो. अग्नी, कापूस, तेल आणि बैठक याचं गणित जमलेलं असतं. सुरवातीला थरथरत धांदरटपणा करणारी ज्योत आता स्थिरावलेली असते. ज्योतीलाही तिचा सूर सापडलेला असतो.
एका शांत अशा मर्यादाशील संयत ज्योतीला बघत आपलंही मन शांत होतं.
हातासरशी सगळ्या पणत्या पेटवून आपण घर बाह्यांगाने उजळवून टाकायला अंगणात, पायरीवर, कंपाऊंडवर एकेक अशा अष्टदिशांना पणत्या ठेवत जातो.
घराच्या उबदार आणि निश्चिंत वातावरणातून बाहेर पडलेली ज्योत परत एकदा थरथरते, घाबरते. विझू..विझू होते.
अक्षरशः परत एकदा ज्योतीच्या जगण्या मरण्याचा प्रश्न उपस्थित होतो. परंतू एव्हाना अंतरंगातून उजळलेली, प्रकाशमान झालेली ज्योत या वा-याशी, अंधाराशी आणि गारठ्याशी देखील जीवानिशी झुंजते.
बराच वेळ एक तेजोमय तांडव आपल्याला पहायला मिळतं. ज्योतीच्या भवितव्या विषयी आपलंही मन जरासं साशंक होतं. पण या चिमुकल्या ज्योतीने वा-यालाही नमवलेलं असतं.
चहुबाजूंनी दाटलेल्या अंधाराला, कोंडीत पकडणा-या गारठ्याला आणि चाल करुन येणा-या वा-यावर मात करुन एक सडसडीत आणि चपळ ज्योत विजयाचा कुठलाही अभिनिवेश न दाखवता संयतपणे प्रकाशित होत रहाते.
या ललितम् नृत्य करणाऱ्या ज्योतीकडे बघत आपलंही अंतर्मन कधी प्रकाशीत होतं कळतही नाही.
No comments:
Post a Comment