Wednesday, 30 October 2019

आत्मविश्वासू ऍटिट्युड...

टकाटक दिसणं, झकपक रहाणं खनपटीला मारुन, झगमगीत, रंगारंग आणि टाळ्या घेऊ दणदणीत समारंभ आयोजित करुन आपण एका सुप्रभाती, घराच्या ओढीने पावसाळी हिरव्यागार डोंगरदऱ्यातल्या वळणदार नॅशनल हायवे नामक हमरस्त्याला लागावं आणि भर रस्त्यात मध्यभागी एका म्हशीने धरणं धरलेलं असावं.
गुळगुळीत डांबरी रस्त्यावर गचकिनी गाडी थांबते. 
बाई ढिम्म. 

कॅमलच्या टु बी पेन्सिलीसारखा काळा रंग, निब्बर कातडं, त्यावरचे भुर्रट टचटचीत केस, त्याहुन भुरी शेपटी, भरीसभर वाळलेल्या शेणाचा अंगभर वास, लाल रंगाचे खपल्या उडून बेरुपी, बेरुखी झालेले वळणदार व डोईजड शिंग, लडदू पोटाला कसेबसे पेलू शकणारे फताडे पिवळंट्ट पांढरे पाय, फेंदारलेल्या ओलसर गुहारुपी नाकपुड्या, ओंगळवाणी जिवणी, राकट भिवया-पापण्या आणि थंडगार गारगोटी सारखे निश्चल आणि भावरहीत डोळे...
महामाया भर रस्त्यात पाय रोवून घट्ट उभी.
बापो, अख्खा रस्ता स्वत:च्या बापासारखा असल्यासारखी निगरगट्ट दादागिरी.
थंड नजरेनं गाडीला जोखत एक निश्चल म्हैस खडका सारखी शांतपणे उभी.
न मागून येणाऱ्यांची भिती न समोरच्याची चाड.
उलट माझ्याकडे बघून कोनच्या गावची गं तू सारखे जबरी झटकू भाव याने एॅटिट्युड.

खरंय देवा ! 
जबरदस्त आत्मविश्वास असला की दुनिया आणि रंगरुप गया भाड में च्या एॅटिट्युडने जगता येतं की राव.
आपण उगा दिसणं-रहाणं यातच भिरभिरत राहतो की !

No comments:

Post a Comment