Wednesday, 30 October 2019

रावण दहन...

Spectacular and vibrant !!

औरंगाबाद शहरातील उत्तरप्रदेशीय लोक समितीचा रावण दहनाचा कार्यक्रम. गेले बत्तीस वर्ष झाली 
विजयादशमीच्या निमित्ताने रावण दहनाचा कार्यक्रम साजरा होत आहे तरी या ब्राझिलियन मुलांच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच या कार्यक्रमाला आज हजेरी लावली.
दुपार सरता सरता तुफान पावसाची बरसात झाली तरी जनतेच्या उत्साहात तसूभर कमतरता नव्हती आणि आमचाही उत्साह दांडगाच होता.

ज्या मैदानावर हा कार्यक्रम होणार होता तिथे भरपूरच चिखल झालेला. तरी पण एका स्टेजवर पोरकट वाटेल असं तद्दन ड्रेसी असं हिंदीतलं रामायण सुरु होतं. पब्लिक खुश होती. 
रामायण म्हटलं की विचारायलाच नको. कथेच्या कुठल्याही वळणावर कुणाही हिंदूला कनेक्ट होताच येतं. बाजूच्या कोपऱ्यात रावणाचा कागदी पुतळा उभा केलेला. थोडीफार फोटोग्राफी करत नाही तोच सन्मानित राजकारणी आले. लगेच रावणाला बाजूला सारुन, रामायण थांबवून सत्कारसोहळा उरकण्यात आला. नंतर रावणाच्या पुतळ्याची पूजा करुन नेत्यांच्या हस्ते बाण सोडून रावण पेटवण्यात आला. 
कागदी वा बेगडीच का असेना पण कधीचा खुणावणारा दशाननी रंगबिरंगी रावण बघता बघता पेटला. इकडे फटाफट फटाक्यांची आतिषबाजी सुरु झाली. पब्लिक जोरात आरोळ्या ठोकू लागली. 
तमाम भारतीयांच्या श्वासात मुरलेल्या रामायणातील एक नाट्यमय प्रसंग रावण वधाचा. खरी वाटतील अशी सोंगं घेतलेलं मघाशीचं नाटक बेगडी वाटत होतं तर हा टेकू देऊन उभा केलेला भव्य पण बेगडी रावण जाळताना, जळताना मनात कालवाकालव होत होती. 
कैलास लेण्यात रावणाची शंकरभक्तीची किती सुंदर शिल्प आहेत. शंकराला आपलं शिर कापून अर्पण करणारा रावण, धनुर्विद्येत पारंगत असणारा, रावण हथ्थासारखं वाद्य लिलया वाजविणारा आणि मुख्य म्हणजे पळवून आणल्या नंतर सुध्दा सीतेच्या होकारा शिवाय तिला स्पर्शही न करणारा महान योध्दा रावण असा उन्मादी आरोळ्यात दहन होताना बघणं खरोखर क्लेशकारक आहे.
पण बहुतांश भारतात विजयादशमीचे रावण दहनं अशाच पध्दतीने साजरं होतात. 

मनाला पटो न पटो, पण हे रावण दहन होतं मात्र नेत्रदीपक. अवाढव्यपणे बनवलेला कागदी रावण, त्याचे ती दहा तोंड, विस डोळे, हातात हत्यारं, कानात बाळ्या, मुख्य चेह-यावर कृध्द भाव... एकुणातच या अंधारात झळाळून उठणा-या जायंट रावणावरुन नजर हटत नाही. 
इकडे धडधड पेटलेला रावण आणि बाजुलाच आकाशात जाऊन चमचमाट करणा-या फटाक्यांची आतिषबाजी. आणि हे सगळं देहभान विसरुन पहाणारी उन्मादीत रंगबिरंगी जनता. 
It's the most spectacular celebration. 
इतकं चांगलं साजरेपण पण शहरी औरंगाबादकर या कार्यक्रमापासून दूरच असतात असं दिसतंय. 
मी सुध्दा इतके दिवस अनभिज्ञ होतेच की.
पण औरंगाबाद शहरातलं एक टुरिस्ट एॅट्रॅक्शन व्हायचं पोटेन्शियल नक्कीच या रावण दहनाच्या कार्यक्रमात आहे.

No comments:

Post a Comment