सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दरवर्षीच येते दिवाळी. बराचसा आनंद आणि जोश घेऊन तर जराशी हळहळ आणि हुरहुर घेऊन.
म्हटलं तर दिवाळी पुर्वीसारखीच साजरी केली जातीये.
पसाभर संपन्नता वाढलेली आहे त्यामुळे जरासं रुपडं बदललंय तरी दिवाळी म्हटलं की कुटुंबिय, मित्रमंडळी, फराळ, मेजवान्या, घराच्या सजावटी, कापड-चोपड, फटाके, रांगोळ्या...कश्शयात म्हणून खोट रहात नाही. उन्नीस बीस फरकाने सगळं साजरं होतं, तेही आनंदानेच. तरीपण काळाप्रमाणे घराघरातली दिवाळीही बदललली. तिनेही कात टाकली.
घरोघरची कुटुंब मर्यादीत होत ग्लोबल झाली. मुलाबाळां विना घरं सुनी झाली. आई वडील भर दिवाळीत मुलांच्या आठवणीने मायदेशी हुरहुरतात. किलो किलोंचे रेडीमेड फराळ मुलांसाठी कुरियर करतात. आपल्या रांगोळीचं आपणच कौतुक करतात, पाणावलेल्या डोळ्यांनी दिव्यांची ज्योत जपतात आणि वा-यावर हिंदकळणा-या आकाश कंदीलाकडे बघत दिवाळीचे येते जाते दिवस मोजतात.
जे तरुण देशातच आहेत त्यांनाही आता फार दिवाळीचं अप्रुप राहिलेलं नाही. कापडाचोपडांच्या खरेदीसाठी आणि चांगलं चुंगलं खाण्यासाठी दिवाळीची वाट बघायचे दिवस कधीच सरलेत.
जो तो स्वकेंद्रीत, स्वमग्न झालाय. कुणालाही नातलगांना भेटीची म्हणावी तशी आस राहिलेली नाही. मुळात कुटुंब-परिवाराच्या व्याख्येतच बराच बदल झालाय. आणि फक्त दिवाळीतच भेटलं पाहिजे,वा भेटता येतं हा नियमही मोडीत निघाला आहे.
एकुणातच सामाजिक स्थितीत इतकं परिवर्तन झालंय की अपवाद वगळता आठवणीतल्या दिवाळीची कुठलीही ओळख आता राहिली नाहीये.
आणि या सोशल मिडिया मुळे माहिती पुरतीची कनेक्टिव्हिटी इतकी वाढली आहे की एकमेकांना भेटण्यातली ओढच संपुष्टात आली आहे. अर्थात सोशलमिडियाच्या परे असणारीही ओढ शिल्लक असतेच पण त्याचीही परिभाषा व्यक्तिपरत्वे पार बदलली आहे.
चालायचंच. कालय तस्मै नमः
भरा-या मारत अवकाश कवेत घेताना भुतलावरच्या काही गोष्टी नजरेआड, हद्दपार होणारच.
हे सगळं लिखाण मला आमच्या व्हरांड्यात बसल्यावर सुचलयं.
दूरवरुन बेसन भाजल्याचा सुवास येतोय. समोरच्या घरात ऑफिसमधील नोकरवर्ग लायटिंगच्या माळा चढवतोय, रेडिमेड आकाशकंदील बांधताहेत. मोलकरणी रांगोळ्या रेखताहेत.
समोरच्या अपार्टमेंटमधल्या वॉचमनची मुलं चक्क टिकल्या उडवताहेत.
पुर्वीच्या काळी घरोघर किलो-दोन किलोंनी होणारे दिवाळीचे समग्र फराळ आता जेमतेम अर्धाकिलोंनी होताहेत. सोशल मिडिया वर जरी चकल्या, शंकरपाळे, अनारसे आणि करंज्या अशा पारंपरिक पदार्थांना बरे दिवस आलेले दिसत असले तरी एका ठरावीक वर्गात आता इतक्या गोड आणि नजाकती पदार्थांना जराशी घरघरच लागलीये.
मुलांनाही कशाचही फारसं कौतुक राहिलेलं नाहीये.
घरातलं कुणीही ना लवकर उठताहेत का अभ्यंग करताहेत. रोजच्या सारख्याच या सकाळी.
म्हणजे खरं सांगायचं तर घरातली चार सहा डोकी या दोन तीन दिवसांसाठी नाश्ता, लंच व डिनर साठी एकत्र आणताना गृहिणींना नाकी नऊ येताहेत.
तोरणं करणं-लावणं, रांगोळ्या काढणं, आकाश कंदील-दिवे लावणं तर फारच दूर राहिलं.
कितीही नाही म्हणा हल्लीच्या दिवाळ्या विचार केला तर असा छुपा मनस्तापच देऊन जातात.
(अर्थात असा विचार जो करतो त्यालाच तो त्रास होतो)
त्यामुळे कुणाही कडून फारशी अपेक्षा न करता आपल्याला जमेल, रुचेल तेवढं साजरेपण जुन्या दिवाळ्या आठवत करायचं आणि आपला आत्माराम शांत आणि प्रसन्नचित्त ठेवायचा.
*।। शुभ दिपावली ।।*
No comments:
Post a Comment