Thursday, 8 August 2019

तहानलेला मराठवाडा.

तहानलेला मराठवाडा.

गेले आठ दहा दिवस झाले आमच्या मराठवाड्यात पावसाची सातत्याने झड लागली आहे. खणखणीत सुर्य दर्शन तर नाहीच. सतत आपला रिप रिप पाऊस. हवेत गारवा आलेला. बागा, झाडंझुडं तरारलेली. भिजपाऊस असल्यामुळे शेतकरीही खुश. वरुन झिमझिम. पण या झिमझिमीत शेतीची कामही करता येताहेत. एकुणातच पुर्ण भारतभर पावसाचा कमी-जास्त प्रमाणात समाधानकारक वर्षाव सुरु आहे.
पुणे-मुंबई-नाशिक-सांगली-कोल्हापूरात तर या पावसाने हाहाकार उडवला आहे. पुराच्या पाण्याबरोबर रेल्वे वाहून जाण्याच्या शक्यते बरोबर पावसाच्या पाण्याबरोबर मगरी शहरात वाहून येण्याचा चमत्कार देखील या वर्षी घडत आहे.
छोटीमोठी वाहनं, आडबाजूची माणसं, जनावरं वाहुन जाण्याचं भय वा कौतुक तर कधीच संपलय. नद्या-तलाव-धरणं उदंड वहाताहेत. एकुणच वरुणराजाची कृपा म्हणा अवकृपा म्हणा बहुतांश प्रांतावर पाऊस अक्षरशः अष्टदिशांनी बरसत आहे.

पण दुष्काळाची ललाट रेषा भाळी असलेल्या आमच्या मराठवाड्याची कथा जरा वेगळी आहे. असं म्हणतात पुर्वीच्या काळी औरंगाबाद शहराच्या परिसरात ७३५ तलाव होते. येनकेन प्रकरणे बरेचसे बुजले-बुजवले गेले असतील असं गृहीत धरु. तर सध्या लहान-मोठे निदान ७० तलाव तरी अस्तित्वात असतील ना ?
औरंगाबाद शहरातले दोन सुप्रसिद्ध मोठे तलाव म्हणजे शहरा लगतचा हर्सुलचा तलाव आणि दौलताबाद जवळच्या आमच्या रिसॉर्टला खेटून असलेला आठशे वर्षांपूर्वीचा आप पाश दर्रा हा तलाव. गेल्या सलग दोन वर्षाच्या दुष्काळामुळे भर उन्हाळ्यात कोरडे पडत जाणा-या या तलावातून सुज्ञपणे गाळ उपसा मोहिम हाती घेतली जाते. तिनचार महिने अहोरात्र जेसिबीज चालतात आणि शेकड्यांच्या संख्येने ट्रॅक्टर्स ती माती वाहून नेतात. म्हणजे भर उन्हाळ्यात हाच खडखडाट सुरु असतो. अहोरात्र वाहनं चालतात म्हणून रस्त्यांची वाट लागते. रस्ते खड्डेयुक्तपणे खडखडीत होतात म्हणून रस्ताभर हा गाळ पडत जातो, धुळ उडत जाते. म्हणजे या महिन्यात तर या रस्त्यांच्या आसपासची झाडं झुडपं अक्षरशः नखशिखांत धुळीने माखली जातात. आणि रस्ते म्हणजे तर फाईन सॅन्ड ड्युन्ससारखेच होऊन जातात.

नाशिकमधला गोदावरीचा पूर म्हणजे आमची चांदी. नाशिककर उपकृत होत बदाबदा पाणी आमच्या कडे सोडतात. आमच्या जायकवाडीचा जलाशय असा नाशिककरांच्या कृपेने भरतो. आणि मग आमच्या प्यायच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. सुटतो म्हणजे जे दर चार दिवसांनी एक दिड तास पाणी मिळतं ते तसंच बिनबोभाट मिळत रहातं. जर हा जलाशय देखील भरला नाही तर मात्र दर पाच-सात-
नऊ दिवसांनी पाणी असं काहीही होऊ शकतं. नसता पैसे देऊन टॅंकर्स आहेतच.
मराठवाडी जनता एक जाज्वल्य टॅंकर संस्कृती जगवते आहे असं म्हटलं तर चुक नाही. या टॅंकर्सच्या व्यवसायावर पोटभरणा-या हजार-दोन हजार लोकांचे आशिर्वाद आमच्या पाठी आहेत म्हटलं.

तर मुद्दा यंदाच्या पावसाचा.
फक्त रिमझिम, झिमझिम पाऊस. बदाबदा कोसळून, चहाचं पाणी रस्तोरस्ती, नदी-नाले वाहवणारा पाऊस अजून आमच्याकडे झालाच नाहिये. या रिपरिप पावसाने  पावसाळी माहौल छान झालाय. झाडं तरारली आहेत, शेतं डुलताहेत. चहा भज्यांचे बेत जमताहेत. सुट्ट्या बघून घाटरस्ते स्थानिक पर्यटकांनी भरताहेत. अगदी चहुबाजूंनी मनमुराद पावसाळा जाणवतोय. पण या रिपरिपीची दुसरी बाजू सांगते.
सगळीकडे नुसता चिखलंच चिखल. या चिखलापाई भाजीबाजार गचाळलेत. बाजारपेठा थंडावल्या आहेत. हॉकर्सच तर धाबं दणाणलं आहे. घरं, अंगणं, गाड्या घाण होताहेत. डास, चिलटं आणि माश्यांनी हैदोस घालायला सुरुवात केली आहे. धो धो पाऊसच नाही त्यामुळे कुठलाही बरावाईट कचरा तसुभर सुध्दा जागचा हालत नाहिये. जागच्याजागी सगळं सडतंय. चिखलाने कपडे बरबटताहेत. सतत कपडे धुवायचे म्हटलं तर पाणी नाही. आणि धुतले तरी झिमझिमीमुळे वाळत घालायला जागा पुरत नाही. कपडे बाहेर वाळत घालायची सोय राहिली नाहिये. आणि घरातही वाळत नाहियेत. छत्रीची गरज वाटत नाही. आणि भिजलं डोकं सुधरु देत नाहीये.
बरं हे ही त्या दुष्काळ निर्मुलनाकडे बघत दुर्लक्ष करायलाच पाहिजे. पण दुर्दैवाने सगळ्या कोकण किनारपट्टीला बुडवायला निघालेल्या पावसाने आमची तळी थोडीफार सुध्दा भरली नाहीयेत.
आमच्या हिरण्यच्या तलावातले तर जेसिबीने उकरलेले ओरखडे जेमतेम भरलेत. समपातळीवर पाणी दिसणं तर दूर राहिलं. तीच गत हर्सुल तलावाची. अर्धा पावसाळा गेला आता आमची तळी कधी भरणार, कधी विहिरींच्या, जमिनीखालच्या पाण्याची पातळी वाढणार ?
मुख्य म्हणजे हा रोमांचकारी पावसाळा संपल्यावर येणारा कहरी उन्हाळा कसा झेलणार आम्ही ? आणि ही गत फक्त औरंगाबादची नाही तर संपूर्ण मराठवाड्याची आहे. जिथे तिथे वर सांगितल्याप्रमाणे सुरेख पावसाळी हवा आहे.  झिमझिम पाऊस आहे. पण झाडून सगळ्या तळी-विहिरी कोरड्याठाक.
विश्वास बसणार नाही पण शहरात, मी रहाते त्या भागात अजूनही पाण्याचे टँकर्स भर पावसात धडधडताहेत, अजूनही चार दिवसा आड एकच तास तेही कमी प्रेशरने पाणी येत आहे. पाण्याचा दिवस मिस करा आणि पाणी विकत आणायची शिक्षा भोगा हे आम्ही अजूनही अनुभवत आहोत. त्यामुळे प्यायच्या पाण्यासाठीची घरातली तडतड, मोटर चालूबंदच्या भानगडी, आत-बाहेर-गच्चीवर पळत जाऊन कॉक्स चालूबंद करणे आम्ही पावसाळी छत्र्या घेऊन निभवत आहोत.
खरोखर या विरोधाभासाला हसावं की रडावं ते कळत नाहिये.
हा निसर्गाचा कोप म्हणावा का द्रष्टेपण नसलेल्या राजकारण्यांची कृपा म्हणावी ?
त्यामुळे मराठवाडा सोडून अख्ख्या महाराष्ट्राच्या नाकातोंडात पाणी जाईपर्यंत बरसण-या पावसाच्या नावाने आम्ही अजूनही कोरडी खापरं फोडत आहोत.

*** Landscape by Harshad Shivaji Khandre

No comments:

Post a Comment