हल्ली कुठल्याही मॉलमध्ये जा. आपलंच गाव आपल्याला परकं आणि ति-हाईतासारखं वाटायला लागतं. उपरेपणाचा एक कॉम्प्लेक्सच येतो इथे आलं की. एक तर बहुरंगी-बहुढंगी आपल्याच तालातली भन्नाट गर्दी असते. विक्रेतेही आपल्याच व्यवहारी धुंदीत असतात. काही विचारल्याशिवाय कोणी बोलतही नाहीत. त्यामुळे आपली लिस्ट काढायची आणि वस्तुंचे रॅक्स शोधत फिरायचं. कुणी या म्हणत नाही, काय हवं विचारत नाही. अरेवा, फार दिवसांनी आलात मॅडम असलं आपुलकीचं स्वागत तर जवळजवळ नाहीच. बरं आलेल्या गर्दीतही आपल्या ओळखीचं कुणी दिसेल तर शप्पथ. आपल्या संसारातल्या या टप्प्यावरची खरेदी तशीही आता समंजस गरजेतून होत असते. तिही एकाकीपणे. त्यामुळे अख्खा कुटुंब काबीला घेऊन खरेदीला आलेली खानदानं पाहिली की गंमतच वाटते. अख्ख्या कुटुंबाला कुठुन एवढा उत्साह येतो कळत नाही. असो असतात एखाद्याच्या कुंडल्या भारी.
तर सांगायचा मुद्दा म्हणजे आपण समजत असतो, एवढे हजारोंनी लोकं आहेत. चारदोन तरी आपल्या ओळखीचे दिसतील. पण नाही. Nobody knows you and that really disconnects you.
एकूणच या मॉलमधल्या व्यवहारात फारच तुटकपणा जाणवतो आणि मग या उदंड गर्दीत आपणही फारच हरवल्यासारखे परके होतो बुवा.
गेले पंधरा दिवस झालेत इस्त्री बिघडली आहे. घरात तशी नेमाने इस्त्री वापरणारी, आणि इस्त्रीवाचून अडू शकणारी मीच. पण हल्ली मी पण धकवून न्यायला शिकले आहे. (उम्र का तगाजा और क्या !)
So एवढं तातडीने अडलं नाही. यथावकाश इस्त्री दुरुस्तीला गेली. कुठला तरी पॉईंट खराब झालाय आणि तो मिळणं वा मिळवणं अवघड आहे. त्यापेक्षा दुसरी इस्त्री घेणं परवडेल असा फतवा निघाला.
आमच्याकडे ब्राझीलचा दत्तक मुलगा कालच आलाय.
चाळीस तासांच्या प्रवासानंतर आल्या आल्या आंघोळ करुन त्या भल्या मुलाने आपले कपडे हातानेच धुतले, वाळतही घातले. कालपासून नेमका पाऊस. तर आज वाळलेले कपडे उचलताना मला म्हणाला इस्त्री आहे का ?
I need to iron my clothes.
आजपर्यंत आमच्याकडे रोटरी एक्स्चेंजमधे चार मुलं गेल्या साताठ वर्षात राहून गेली आहेत. आवर्जून इस्त्री मागणारा, करणारा आणि तेही आल्याच्या पहिल्या चोवीस तासांतच तिची चौकशी करणारा हा पहिला गडी.
मला टेक्निकल गोष्टीत माझं डोकं खपवायला अजिबात आवडत नाही. आणि आता तर वाढत्या वयानुसार मी अशा गोष्टीत डोकं न घालण्यासाठीच इरेला पेटते.
छान पावसाळी हवा, बाहेर पडायचा मुड.
संसाराच दुसरं चाक सोफ्यात सुखाने पहुडलेलं दिसलं.
नवरा मोबाईल हाताळत निवांत घरात बसलेला दिसला की याला कसं संसारी कामाला लावता येईल याची आपल्या डोक्यात फार चक्री चालते. पाऊस येतोय. तरी म्हटलं उठाच आता. आपल्याला इस्त्री आणायची आहे. नव-यांना तावात आलेली बायको आणि त्या अनुषंगाने येणारी संभाव्य संकटं बरोबर कळतात.
गुमाने निघालो. निघून निघून कुठे तर हाकेच्या अंतरावरील डीमार्ट मधे. या मार्टमधे यायची माझी तिसरी वेळ, यजमानांची तर पहिलीच.
पाऊस थोडासा उघडलेला. ही गर्दी त्या मार्टमधे. इतकी डोकी बघूनच हबकले. रेटारेटीत पर्स लॉक करुन घेण्यातच इतकं खच्चीकरण झालं की कुठून इथे आलो असं झालं. पण यजमान ताब्यात होते आणि इस्त्रीचा बेत निभवायचाच होता. त्यामुळे शिरलोच आतमध्ये.
पाहू तिथे माणसंच माणसं. आणि अडखळू तिथे सामानच सामान. अगदी दोन महिन्यांच्या बाळापासून ते व्हिलचेयरवरच्या वयस्कांपर्यंत सगळीकडे तुडुंब माणसं. झाडून सगळे उत्साहात. लेकरं पळताहेत, पोरी मुरकताहेत. बायका नव-यांना घोळात टाकताहेत. पोरंटोरं उगा इकडेतिकडे फिरताहेत.
किराणा, कपडे, फर्निशिंग, क्रॉकरी, इलेक्ट्रॉनिक्स् सगळीकडे उलथापालथ चालू आहे.
शेवटी झटपट एक इस्त्री घेतली आणि निघालो. बिलिंग काऊंटरला विचारलं काय हो, एवढी गर्दी का बरं ? शनिवार म्हणून का ?
हे तर काहीच नाही मॅडम. अक्षरशः पाय ठेवायला जागा नसते शनिवारी इथे. आज पावसामुळे कमी गर्दी आहे.
बापरे, डोकं फिरायचंच काम आहे.
डोकं फिरायचं ? वेड लागतं इथे एखादं दिवशी.
🙄
No comments:
Post a Comment