हल्ली सुप्रभातीच्या मुहुर्तांच्या लग्नाला जायचे प्रसंग नातलगांच्या घरची लग्न असल्या शिवाय येतच नाहीत.
मुक्कामी असल्यामुळे साहजिकच मुहुर्त गाठायची धावपळ कमी होते आणि परिचितांकडची तर शक्यतो रिसेप्शन्संच अटेंड केली जातात.
सोईने या सोईने जा.😁
आणि आलंच एखादं परिचितांच्या सकाळच्या लग्नाचं आमंत्रण तरी यजमानांनी व्यवहारीपणे मुहूर्त सकाळच्या अकराच्या पुढचाच ठेवलेला असतो. घरगृहस्थी आवरुन धावतपळत अगदी वेळेवर पोहोचलं आणि शेवटच्या अक्षता टाकल्या, जेमतेम पंधरा मिनिटं ओळखीच्यांशी बोललं, स्टेजवर जाऊन नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या की बुफे जेवणाकडे वळायचं. गर्दी-लाईन कमी असलेले दोन-तीन पदार्थ वाढून घ्यायचे, उभ्या उभ्याच जेवायचं की पाणीही न पिता परतायचं. अक्षरशः पाऊण तासात या लग्न कार्यातला कार्यक्रम आटोपतो. 🤗
माझ्या लहानपणीची मराठवाड्यातली लग्न मला आठवताहेत.
अक्षरशः सकाळच्या सात-आठवाजताचे मुहूर्त असायचे. झोपेतून उठल्याबरोबर घरातले बुजुर्ग स्त्री पुरुष झटपट तयार होऊन आशिर्वादाच्या अक्षदा टाकायला मंदिर कम् लग्न कार्यालयाकडे चालत जायचे. अक्षता टाकल्या की परत घरी येऊन घरचा रामरगाडा, कामकाज उरकून दुपारी परत लेकराबाळांसह मंदिरात जेवायला जायचे.
हा पंगतीप्रपंच मात्र निवांत असायचा. एखाद्या प्रस्थापिताकडचं लग्न असेल तर गावातल्या एका ठरावीक स्तरातल्या तमाम घरातून चुल पेटत नसे. इतकं ते सहकुटुंब सहपरिवारासहचं विवाह भोजन होत असे.
पण हल्ली व्यक्तीस्वातंत्र्यांमुळे एका घरातले असुनही प्रत्येकाची वेगवेगळी आमंत्रण असतात. त्यात कुणाला कार्यबाहुल्यामुळे वेळ नसतो, मुलांच तर वेगळंच अगम्य समाजकारण असतं. थोडक्यात आपण जरी विवाह समारंभाला गेलो-जेवलो तरी आपल्या मागचं घरातल्या रसोईच शुक्लकाष्ठ चुकत नाही.🙄
मागच्या आठवड्यात जवळच्या परिचितांकडचं लग्न. फार वर्षांनी ब-यापैकी सकाळचा मुहूर्त.
न्हाऊनमाखून, साडी नेसून मुहूर्त गाठता गाठता अक्षरशः नाकीनऊ आले. आणि मुहुर्ताला न जाता फक्त पुख्खा झोडायला जाण्या इतकी अजून आपली तरी भीड चेपली नाही बुवा.😔
तयार होताना घाई घाईत न्हायलेल्या केसांच इरलं विंचरायचच राहिलं. 🤦
ठीक आहे गं, गाडीतून उतरल्यावर विंचर...नवरा म्हणला.
हल्ली अशा समारंभी ठिकाणी गाडी नेणं म्हणजे पार्किंगच्या भस्मासुराशी दोन हात करण्यासारखंच आहे. आणि योगायोग म्हणजे अशी सभारंभी कार्यालयं कायम शत्रुरुपी दुकानांनी घेरलेली असतात. आणि शेजा-यांशी सौहार्दाचे सख्य ठेवेल तो भारत-भारतीय कुठला ? अगदी पीठाच्या गिरणीवाल्यापासून ते पंक्चर काढणा-यांपासून सगळे खुन्नसवर रुबाब दाखवतात आणि दुकानासमोर गाडी लावू देत नाहीत. बाई बघत नाहीत का बुवा बघत नाहीत. ओ बाई, ओ मॅडम करुन गाडी काढायलाच लावतात.
लग्नकार्यांवर इतकी खुन्नस ठेवायला हे दुकानदार आंबट द्राक्षी प्रौढ अविवाहित असतात की काय बेटे कळत नाही.🧐
तर असो.
थोडक्यात गाडी पार्क करायच्या चकमकीत डोक्यावरचं इरलं तसंच राहिलं. शेवटची दोन-तीन मंगलाष्टकं चालू होती. सभामंडपात ही गर्दी. नाही म्हटलं तरी या न्हायल्या नंतरच्या न विंचरलेल्या केसांचा भलताच कॉम्प्लेक्स आला हो. तरी बरं वळुन वळुन कुणी सातत्याने पहायला लागलं नाही म्हणजे जे डोक्यावर होतं ते आपली फ्याशन वा स्टाईल म्हणून सहजपणे खपलेलं दिसतंय.😉
तरी न राहवून स्टेजवरच्या वरमाईला बोलूनच दाखवलं. अहो..किती हा सकाळचा मुहूर्त ? घाई घाईत मी केस विंचरायची विसरलेना. जाऊ दे गं..तु कशीही छानच दिसतेस.😊
आलीस, छान वाटलं.
तर ते असो.
घाईतच घरी आलो तर घर हे आळसावून पडलेलं. मुलगी नुकतीच झोपेतून उठलेली. आल्या आल्या मुलीला गडबडीत झालेली केसांची भानगड सांगितली.
ओह, आई..छान दिसताहेत केस, कुणाच्या लक्षातही आलं नसेल. And now you are back home, so don't ponder over it. JUST CHILL !!
हल्ली पोटच्या पोरी पण डांबरट झाल्या आहेत. कधी ही विचारा, बरं दिसतंय ना गं ? की या होच म्हणणार. उगा मतभेद असलेले सल्ले देऊन स्वत:साठीच्या भानगडी वाढवत नाहीत व स्वतःचा वेळही वाया घालवत नाहीत. Daughters know exactly how to tackle certain issues of their mothers.
तर असो. पोटची पोर, घाला पांघरुण.😏
ओट्यापाशी मावशी भांडी घासत ऊभ्या. ओटा हा व्यायलेला. म्हणजे आपण नाश्तापाणी करुन, आवरुन, नटुनथटून गावाला वळसा घालून आलो तरी घर अजून मुलांसकट सुस्तावलेलंच.
नाही म्हटलं तरी वैतागलेच आणि ती साडी, ते नटलेपण, ते इरलं यांचा विसर पाडत, कपाळावर आठ्या पाडत भराभर भांडी रिकामी करणं, टेबल, ओटा आवरणं चालू केलं तर भांडीवाल्या मावशी वळून वळून मला बघत होत्या.
काय झालं हो ? काय बघताय ?
(सकाळपासूनच्या या धांदलीने आपलं आवाजाचही ट्युनिंग आता बिनसलेलं)
काई नाई. तुम्ही फार छान दिसतायत आज ताई.
हं..साडी नेसली, टिकली लावली. नेहमी पेक्षा वेगळे कपडे घातले की माणूस छानंच दिसतं. मी तुकडा मोडल्यासारखं बोलले.😌
(रोज पारोशा अवतारात बघतात नं या महिला. कधीतरीच अशा टकाटक साडीत पहायचा प्रसंग येतो. परत तेच लवकरचा लग्न मुहूर्त आणि त्याचे अनेक परिणाम-दुष्परिणाम.)
परत आपलं वळून बघत..माज्याकडं नेमकं आज मोबाईल न्हाईये ताई.. नाय तर फोटू तरी काढला अस्ता तुमचा. लयीच छान दिसु -हायल्यात आज तुमी.
अहो, काहीतरीचं काय ? आणि माझा फोटो काढून कुणाला दाखवणार ? तुमचं आपलं काहीही.
नंतरच्या दोन दिवसांनी अचानक तब्येत बिघडली. अक्षरशः झोपून होते. तर काल जरा बरं वाटून आवराआवरी करत होते तर याच मावशी परत..
बरं वाटतंय का ताई आता ?
हं..बरंच बरंय. म्हणजे पुर्ण बरं वाटतं नाहीये अजून पण निदान खाली तरी उतरु शकले आज.
न्हाय तं ताई म्हटलं तुम्ची दृष्ट काढू का? मीठ-मोहरीची ?
का बरं ?
न्हाय म्हन्लं माझीच नजर लागली आसलं तुमाला. त्यादिवशी लगी छान दिसतं व्हत्या तुमी. मी बोल्ले आन तुमी लगेच आजारी पडल्यात. म्हटलं माजीच दृष्ट लागली आसलं.
हा..हा..तुमची दृष्ट लागली म्हणता. छे..हो.. दृष्ट ब्रिष्ट काही नाही. पावसाळी दिवस. आलं असेल काही तरी चरबर खाण्यात.🥺
तुमाला चालत असेल तं काढते की दृष्ट. येवडी भांडी व्हऊ द्या.
नको हो, काही तरीच तुमचं.
एकुणच सगळ्या घटनांची गंमत वाटली.
दिसण्याबद्दलच्या आपल्या कल्पना, भ्रम याच्या अनेक लडी अलगद उलगडल्या गेल्या. दिसण्या बद्दलच्या एकेकाच्या समजुतीचे पदर हलकेच मोकळे झाले.
लग्न समारंभातलं व्यवहार्य स्थित्यंतर आणि त्याचे परिणाम याचाही एक परिपाठ झाला.
एकूणच बेगानी शादी में मोहतरमा दिवानीवाली सुप्रभात भलतीच इनलायटंड ठरली.
तो फिर एक सो कॉल्ड खुबसुरत सेल्फी तो बन्ताच है ना ?👩🦱
No comments:
Post a Comment