Sunday, 23 June 2019

RYE...2019

आमच्याकडे रोटरी युथ एक्स्चेंजमधे एक ब्राझीलीयन मुलगा रहायला येतोय. तर या बदल्यात माझ्या भावाचा दहावी पास मुलगा ब्राझीलला जातोय. भावाच्या मुलाला पाठवायचा हट्ट माझा आणि माझ्या कुटुंबियांचा. बाकीच्यांचा विरोध पत्करुन त्याला पाठवलं जातयं. आपलं मुल पाठवणं वेगळं आणि भावाचं का असेना पण विरोध बाजूला करुन त्याला ब्राझीलला तेही दहा महिन्यांसाठी पाठवणं जरा हिमतीचंच काम आहे. दहावीतला सुकुमार मुलगा. दहा महिने इतक्या दुरस्थ, त्रयस्थ ठिकाणी रहाणार.
निट राहिल ना ? व्यवस्थित परत येईल ना ?
आल्यावर परत अभ्यासाला लागेल ना ?
एक ना अनेक प्रश्नांच नाही म्हटलं तरी माझ्यावर दडपण आणि निर्णयाची पालकीय जबाबदारी देखील आहे.
भरीस भर या भाच्याने दहावीला खणखणीत 93% टक्के घेतले. परत एकदा आपल्या शिक्षणपद्धतीची दडपशाही जाणवली. अकरावी-बारावीची गाजरं डोळ्यासमोर नाचू लागली. पण ठरलं ते ठरलं.
या शिक्षणाबरोबर जीवनाचं शिक्षणही अतीव महत्वाचेच आहे. त्यामुळे फारसा उहापोह न होऊ देता पासपोर्ट-व्हिजा अशी कंटाळवाणी कामं उरकत राहिलो.
भाचा पण माझ्या बरोबरीने खंबीर आणि उत्साहात आहे.

गेले तीन महिने झाले जायची तयारी सुरु आहे.
ब्राझीलमधे देखील इकडे येणाऱ्या मुलाची अशीच तयारी सुरु असेल. मुला मुलांच व्हॉट्सॲपवर चॅटिंग सुरु झालेलं आहे. मीच जरा तिथल्या लोकांच्या आत्ता संपर्कात येत आहे. येणा-या मार्कोसशी चॅटिंग केलं, फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. आता त्यांची भाषा स्पॅनिश किंवा पोर्तुगीज आणि जुजबी इंग्लिश.
असा किती संवाद सध्यातरी साधणार ? पण येणा-या मुलाला कंफर्टेबल वाटेल इतका संवाद होत आहे.
मला तर माझ्या भाच्याची डबल काळजी आहे.

मार्कोसला फ्रेंडलिस्ट मधे एॅड केलं तर लगेच मार्कोसच्या वडिलांचीही फ्रेंड रिक्वेस्ट आली. कौतुकाचा मेसेज आला. ओळख झाल्याचा त्यांना आनंद वाटला.

अरेच्या ! आपण फक्त आपल्या भाच्याचाच आणि आपलाच विचार करतोय. तिकडे ब्राझील सारख्या दुरदेशात देखील एक आईबाप मनातून नाही म्हटलं तरी थोडेसे धास्तावलेलेच असतील नाही ?
भारतासारखा दुरचा देश, एकदम भिन्न संस्कृती-भाषा-राहणीमान.
कसा राहिल आणि निभेल तिथे आपला सुकुमार बेटा ? कुणाच्या घरी रहाणार आहे ? कसे आहेत ते लोकं ?
आपल्या लेकराला नक्की या रोटरी युथ कल्चरल एक्स्चेंजचा फायदाच होईल ना ?
पालक म्हणून किती अनेक प्रश्न छळू शकतात याची मला कल्पना आहे

त्यामुळे मार्कोसच्या वडिलांच्या माझ्याशी तातडीने संपर्क साधण्याच्या कृतीने मी रिलॅक्स झाले. भाच्यासाठी घेतलेल्या निर्णयाचं दडपणही जरा कमी झालं. आणि जगाच्या पाठीवर कुठेही जा समंजस पालक इथुन तिथुन सारखेच हे पाहून तर मनोमन सुखावलेच.💞

Eshaan Padhye Marcos Vinicios Cavalheiro Shailesh Padhye Anupama Padhye

No comments:

Post a Comment