आसुरानंद...
या सोशल मिडियावरच्या ब-याच जणांच्या देणं न घेणं, फुकटचं कंदिल लावून जाणं या वृत्तीचा हल्ली जरा कडेलोट होतोय. कुठलीही चांगली, पॉझिटिव्ह गोष्ट घडू द्या, त्या गोष्टींचा उदोउदो करणा-या आणि उणीवा, कमतरता दाखवणा-या गोष्टींचा अगदी पाऊस पडतो.
म्हणजे काहीजण तर मला वाटतं फक्त हे सकारात्मकतेचे झेंडे रोवायचे आणि पाडायचे काम करायलाच सोशल मिडिया वर असतात असं वाटतं.
अगदी कुठलाही सामाजिक, राजकीय, धार्मिक विषय घ्या, कुठल्याही एखाद्या एॅक्टिव्हिटीला घ्या, एखाद्या नामांकित खेळाडू, अभिनेता, लेखक वा डॉक्टर घ्या.
त्यांच्या विषयीच्या चांगल्या पोस्टस् आल्या रे आल्या की त्या पोस्टसमधली हवा काढायचं काम ही काही मंडळी अगदी इमानेइतबारे करतात.
मग ते नाना पाटेकर प्रकरण असो वा भारत-पाक क्रिकेट मॅच असो वा तावडे प्रकरण असो वा रामदेव बाबा असो. कुणाही विषयी चार बरे शब्द आले की लगेच कुणीतरी त्या व्यक्तीची खाजगी माहिती चव्हाट्यावर आणणार आणि चिखलफेक करणार.
एखाद्या घटनेकडे बघताना त्या संबंधित व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याची चिरफाड केलीच पाहिजे का ?
बाहेर चांगला वागणारा घरात कसा टेरर आहे, बाहेर सहिष्णुता दाखवणारा वैयक्तिक कसा जातियवादी आहे, निसंगपणे योगा शिकवणारा कारखाने काढून कसे खो-याने पैसे मिळवतोय...वगैरे.. वगैरे..वगैरे...
खरोखर ही लिस्ट एंडलेस आहे.
झाली एखादी सकारात्मक बातमीची पोस्ट फ्लोट की तासाभरातच त्या बातमीतल्या कंटेंटचं, त्यातल्या व्यक्तींची, त्यांच्या २४*७ च्या कॅरेक्टरची चिरफाड सुरुच झाली समजा. हे इतकं सातत्याने सोशल मिडियावर बिनघोर होतंय की समाजातल्या छुप्या आसुरी आनंदाचं एक बिभत्स दर्शनच सुर्योदय-सुर्यास्तासारखं राजेरोस होतंय म्हटलं तरी चालेल.
जसा तो अमिताभचा एॅंग्री यंग मॅन लोकांच्या छुप्या पण धुमसत्या भावना व्यक्त करु शकला म्हणून लोकप्रिय झाला तसाच हा सोशल मिडियावरच्या चारित्र्य हननाचा प्रकार आहे का ?
कुणाही विषयी बोला, कुठल्याही विषयावर बोला, काहीही बोला काही अटकाव नाही.
आणि ज्यांच्या विषयी बोललं जातं ते काही तुमच्यापर्यंत पोहंचू शकत नाहीत वा त्यांची ती प्रायोरिटी नसते.
पण म्हणून ताळतंत्र सोडून काहीही पोस्टायचं का ?
इकडून-तिकडून माहिती मिळते, शहानिशा करायची गरज वाटत नसते, आलं मनात की फेक चिखल गोळे. बरं ही चिखलफेक करणारे काही अभ्यासू वगैरे मुळीच नसतात. प्रवाहाबरोबर वाहणारे आणि एखाद्याची निंदानालस्ती करण्यात आनंद शोधणारेच फार असतात.
त्या अमिताभ सारखाच व्हेंट आऊट या सोशल मिडियाने तमाम पब्लिकला दिलाय. जो उठतोय तो काहीतरी उरफाटंच पोस्ट करायला बघतोय.
म्हणजे इथे प्रामुख्याने दोन तट आहे.
एक अफाट स्तुतीगान करणारे आणि दुसरे येता जाता नालस्ती करणारे. तारतम्याने गोष्टी वाचाव्यात, नेमकं ते घ्यावं बाकीचं दुर्लक्ष करावं. इतकाही माफक बॅलन्स रहात नसेल का ? तेही इतक्या ओपन बुक टाईप मिडियावर. ?
हा सोशल मिडिया नसता तर आपण सावरकर, तावडे, रामदेवबाबा, गिरीश कर्नाड, नाना पाटेकर वा अशा अनेक लोकांच्या कॉन्ट्राव्हस्टीवर इतकं ठामेठोकपणे बोललो असतो का ?
पण हा फुकटचा मिडिया हातात आहे घ्या चार शब्द लिहून.
न कोई पुछनेवाला है न कोई रोकनेवाला है.
पण या चिखलफेकीमुळे इथलं वातावरण फार गढूळ झालंय. त्याही पेक्षा ही बेजबाबदार भडास काढायची वृत्ती, निंदेमधून आसुरी आनंद घ्यायची वृत्ती फार सहजपणे जोपासली जातीये हे फार धोकादायक आहे.
यामुळे नुसता हा सोशल मिडियाच नाही तर अशा बेजबाबदारपणे नालस्ती करणारेही नजरेतून उतरत आहेत. एकमेकांमधली सगळी नैसर्गिक विश्वासाहर्ता संपुष्टात येत आहे.
हे सगळं मन विषण्ण करणारं आहे.
No comments:
Post a Comment