हाऊस ऑफ सद्दामच्या निमित्ताने...
रेंगाळलेला उन्हाळा, उंबरठ्यातच खोळंबलेला पावसाळा.
House of Saddam चे तीन इपिसोड्स बघून झालेत.
खणखणत्या उन्हात एसीरुममधे सहजच सवयीचा छंद म्हणून इराक स्टोरी विकिपीडियावर वाचत बसते आहे हल्ली.
बापरे. काय थैमान आहे या मिडल इस्टमधल्या राज्यकर्त्यांच.
Unbelievable !
सद्दाम त्याची दोन मुलं उदय( हा तर भुतलावर अवतरलेला हैवानच होता) आणि क्वासय, दोन बायका, मुली, जावाई, नातवंड आणि अनेक विश्वासू (?) साथीदार.
पॉवर, पैसा, सेक्स आणि जनतेवरची जबरदस्त जरब ही या राजवटीची चतुसुत्री. कितीही वाचलं तरी माहिती संपेना. त्या राजपुत्र उदयने तर इराकी जनतेला (मुली-महिला-खेळाडू-बापाचे विश्वासू नोकर) यांना अक्षरशः त्राही भगवान करुन सोडलेलं. विकृतीचा, हिंसेचा, धार्मिक कट्टरतेचा, छळाचा कळस गाठलेला.
I think he is the most written of character of Saddams horrifying regime.
(of course mainly by westerners)
विकिपीडिया म्हणजे एक भुलभुलैयाच असतो.
वाचता वाचता पोहोचले लिबियाच्या गडाफीपर्येंत.
तो तर अजून यांचाही बाप निघाला. चाळीसवर्ष लिबियन जनतेला शासनकर्ता(?) म्हणून वेठीला धरलेलं.
परत तिच चतुसुत्री.
पैसा, पॉवर, सेक्स आणि जनतेला दाखवलेली मरणाची-छळाची भिती, दडपशाही.
आणि हे सगळं धर्माच्या पांघरुणाखाली.
धर्माचं बरं एक खेळणं सगळ्यांना वापरायला मिळतंय. काहीही हैदोस घाला. पाच पंचवीस वर्षं बिनघोर जातात.
तिथून पोहोचले युगांडात. इदी अमीनच्या राष्ट्रात. तो तर अजूनच खवीस. निर्दयपणे माणसं मारणारा, खाणारा, मानवी देहाचे तुकडे-शिर फ्रिजमधे स्टोअर करणारा बेबंद कर्दनकाळ.
या वाचनाच्या निमित्ताने लक्षात आलं की अरब देश आणि प्रामुख्याने नॉर्थ अफ्रिकेच्या राज्यातच या अशा घृणास्पद बेबंद राजवटी आढळतात.
या राज्यकर्त्यांची जरब जनतेला वेठीला धरते. म्हणजे या बेडर लिडरसाठी लढणारे पण छळाच्या-मरणाच्या छायेत असतात आणि सामान्य जनता सुध्दा छळाच्या-मरणाच्या छायेतच असतात. आणि सर्वसामान्यांना वाटणारी ही भितीच या राज्यकर्त्यांची शक्ती बनते.
किती हाव असावी माणसाला त्या पैशाची, पॉवरची, सेक्सची ?
या बेधुंद राज्यकर्त्यांचे डोळे दिपवणारे राजवाडे, कुटुंबियांच राहणीमान, टॉर्चर रुम्स, छळ छावण्या, सेक्सडेन्स, देशाला-जगाला वेठीला धरायची मुजोर कुवत-हिंमत पाहिली की थक्क होतो आपण.
हिटलर विषयी ऐकलं आहे, वाचलं आहे. हिरोशिमा पण आठवणीत आहेच. तरीपण ज्या सिंदबादच्या गोष्टीवाचत जादूच्या गालिच्यावर बसल्यासारखं आपलं बालपण सुरम्यपणे संपलं त्या भुमीत अगदी आत्तापर्यंत हा असला छळवाद चालू होता हे बघीतलं की मती सुन्न होते. दुर्दैवाने कुठलाही जिन हात जोडून या जनतेच्या मदतीला आला नाही.
What makes men to become so wicked and sadistic ?
तरी अजून खोमेनी, सौदी विषयी वाचायचंय. हेच वाचून भयंकर अस्वस्थ झाले. त्या उद्दाम उदय सद्दाम विषयी वाचल्यानंतर तर रात्रभर झोप नाही लागली.
मी दहावर्षांपुर्वी औरंगाबादच्या युनिव्हर्सिटीत मास्टर ऑफ फाईन आर्ट केलं. दोन वर्षांचं शिक्षण होतं. तर त्यावेळी माझ्याबरोबर एक इराकी महिलेने आणि तिच्या अविवाहित तरुण भाच्यानेपण फाईन आर्टसाठीच एॅडमिशन घेतली. या बाई, त्यांची पाच मुलं, नवरा आणि भाचा असे आठ जणं एकत्रितपणे भारतात-औरंगाबादेत आलेले. इराकी अराजकतेला पार कंटाळलेले.
या बाईंची आणि माझी छान मैत्री झाली. रोज एकत्र चहा घेणं, डबा खाणं, अधूनमधून घरी जाणं येणं. इराकी-भारतीय संस्कृतीची आदानप्रदान, शहरातले बाजार, दवाखाने, शाळा. एकूणच एकाच वयाच्या गृहिणी आणि एकाच डिपार्टमेंटला असल्यामुळे तिचं माझं छान जमलं.
मला आता एग्झाक्टली आठवत नाही पण कधीतरी डिपार्टमेंटमध्येच विषय निघाला सद्दामचा. आम्ही दोघींचं बोलत होतो. बोलता बोलता तिला इतकं ढसढसून रडू आलं कि विचारता सोय नाही. खरंतर सद्दाम विषयी त्यांची मतं फार चांगली नव्हतीच तरीपण सद्दामला ति-हाईताकडून ज्या पध्दतीने पकडलं गेलं, मारलं गेलं याचं तिला फार दु:ख होतं. सद्दामने छळलं हे मान्यच होतं पण तरीही तो आम्हाला वडीलांच्या(father figure) जागी होता असं तिचं म्हणणं होतं.
मला वाटतं स्वदेशातली अराजकता, सद्दामचा आधार जाणं आणि नंतरच्या अशांततेला कंटाळून जिवाच्या भितीने अख्ख्या कुटुंबासह परदेशात उठवळासारखं रहावं लागणं या सगळ्याचा परिपाक त्या अश्रूत होता.
तुम्ही कुठल्या जेंडरने जन्म घेता, कुठल्या घरात, जातीत, धर्मात आणि देशात जन्माला येता
यावरही तुमचं बरचसं आयुष्य अवलंबून असतं नाही.
No comments:
Post a Comment