Saturday, 29 June 2019

येरे..येरे...पावसा, तुला देते पैसा...

पाऊस म्हणजे उत्साहाला उधाण. जसं पहिलं मुलं पहिल्यांदाच शाळेत जायला लागलं की मातेला जसं काय तयारी करु आणि काय नाही असं होतं ना तस्सच अगदी हे आभाळ चहुबाजूंनी भरुन आलं की होतं.

कौतुकाचा पहिला दमदार सलग वर्षाव अपेक्षित असतो. रागरंगही तसाच दिसतो. भरीस भर शनिवार रविवार लागून आलेला असावा. मग तर विचारुच नका.
धुंवाधार पाऊस एन्जॉय करायच्या दृष्टीने आपण तयारीला लागतो.
भरभर भाजी-पाला, मका-भुईमुगाच्या शेंगा स्टॉक करुन ठेवायला जवळचा भाजीबाजार गाठतो.
जाता जाताचे आंबेही जरा खाऊन घ्यावेत हा आपलाही विचार असतोच म्हणा.

भाजीबाजार जरा यथातथाच असतो. तोही दुपटीने महागलेला. काल परवा पर्यंत ऐंशी रुपये किलोंनी मिळणारे केशर आंबे आज सव्वाशेला पोहचलेले असतात. तेही सगळे अशा तशा नकोशा रुपातले.
पण असतात काही हौशी खवय्यै लोकं.
ते या पावसाळी हवेत देखील भिजट आंबे खरेदी करत असतात.

शेजारीच एक टोपलंभर टचटचीत जांभळं विकणारी बसलीये. सगळ्यांनाच आज पावसाचा धाक आहे. जांभूळ म्हणजे जसं जसं पिकत जाईल तसं तसं हाताळायला अतिशय नाजूक होत जाणारं फळ. विक्रीसाठी जेमतेम दिड दोन दिवसांचीच साथ देणारं. त्यात पाऊस म्हणजे तर विचारायलाच नको. नाही माल खपला आणि निटसंपणे सांभाळला तर सगळा जांभळा चिखल व्हायचंच काम.

बाईंना या नभ उतरु आलेल्या हवेत जांभळं झटपट विकून घरी जायची घाई आहे.
शेजारची आंब्यांसाठीची गर्दी बघून बिझनेस एथिक्स सोडून त्या गि-हाईकांना दमदार हाकारे देताहेत.
पाऊस आला..पाऊस आला...नका आंबे खाऊ आन् पोटं बिघडवू...
जांभळं खा जांभळं...ताजी ताजी जांभळं...
केशर नको..हापूस नको का गावरान नको...
नका..नका..आंबे खाऊ आन् तबेती बिघडवू...
कशाला हो पाऊस-पाण्यात आंबे खाऊ..खाऊ..
डाक्टरांची, दवाखान्यांची धन करता ?
पाऊस-पाण्यात आळ्या पडत्येत आंब्यात.
जांभळं खा जांभळं...ताजी..ताजी..जांभळं...
या..ताई..मावशी..काका...दादा...घ्या जांभळं घ्या जांभळं...

शेजारचा फळवाला...
मावशे...कशाला आरडायलीस गं कवाची ?
खाऊ देकी आंबे त्यानला. जातील दवाखान्यात मंग. दवाखाने बी कशे चालावेत मंग?
डाक्टर म्हंजी काय द्येव असतो व्हयं ?
त्याला बी पोट हाय, लेकरं बाळं असतेत.
आपन बिमार पडलो न्हाई तं त्यांच कसं व्हईल बरं ?
ज्याला जे पायजे त्ये खाऊ द्ये.

आणि हा सगळा संवाद करणा-यांच्या पाठीशी टोलेजंग हॉस्पिटल असतं आणि चारदोन डॉक्टर गि-हाईकं आसपास भाजी घेत फिरत असतात.😬

No comments:

Post a Comment