माझ्या स्वैपाककरणारी सोडून दोन्ही बायकांनी कामं सोडली या उन्हाळ्यात. एकीला माझ्याकडच्याच वेळात दामदुपटीचं काम मिळालं आणि एकीला कावीळ झाल्यामुळे माहेरी जावं लागलं. तर आता दोन नवीन महिला काम करताहेत. नव्या दोघीजणी तशा छान आहेत. पण जुन्यांशी भावनिक गुंतवणूक होती. भावनिक म्हणजे त्यांच्या घरातले भांडण-तंटे, नव-यांचे जाच, त्यांचा संघर्ष सगळंच परिचित होतं. त्यांच्या निमित्ताने मी लिखाणही बरंच करायची. असो. तर या नवीन दोघीजणीं पैकी एक एकदम शांत आहे. तिचं घरचं वातावरण पण एकदम सुरळीत आहे. दुसरीचं पण मला तसंच वाटलं होतं पण तसं दिसतं नाहीये.
गेला महिना कहरी उन्हाळा, पाणी टंचाई आणि दवाखाना यामुळे अतिशय कंटाळवाणा आणि परिक्षा पाहणारा गेला. लंबे चौडे भयानक उष्णतेचे दिवस सरता सरेनात. मग बसल्या बसल्या जुने सलवार कमीज शिस्तीत फाडले आणि ते तुकडे गोधड्यांसाठी म्हणून धुवून ठेवले. घरगुती गोधड्या करताना मी चौकोनी-आयताकार तुकडे मशिनवर जोडून घेते. नविन शुभ्र कापड अस्तर म्हणून वापरुन चारी बाजूंनी रुंद पायपिन लावते आणि मग मधल्या भागात हौस म्हणून, आवड म्हणून नजाकतीने दोरे भरुन घेते. पण गेले कैक महिने शिवणाच्या मशिनला हातच लावला नाहिये. वाटलं आसपासच्या कष्टकऱ्यांच्या वसाहतीत कुणी नजरेखाली शिवून देणारं असेल तर बघावं. म्हणून या नवीन बाईंना विचारलं. त्या एकेकाळी याच भागात तेही मुस्लिम वस्तीत रहात होत्या. ताई..चला मी तुम्हाला घेऊन जाते. पण तुम्हाला अशा लोकांकडे यायला आवडेल ना ?
अजून तिचा माझा काही आठवड्यांचाच परिचय आहे. नसता तिने हा प्रश्न विचारला नसता.
मला अशा भागातून फिरायला फार आवडतं. छोटी छोटी कोंदट घरं, तिही भरपूर माणसांनी, लेकरांनी आणि सामानांनी भरलेली. भरीस भर चारदोन बक-या, तुटकी फुटकी वाहनं, पाण्याचे पिंप, डबे-डुबे, गाद्या-गिरद्या, भांडी-कुंडी, कोप-यातली स्वैपाकस्थानं, अडचणीतले न्हाणीघरं, वाळत घातलेले रंगारंग कपडे...
जबरदस्तच व्हिज्वुली अपिलिंग आणि धगधगती घरं असतात ही. मला तरी इथे कंटाळा येणं अशक्य आहे.
तर या मुस्लिम गल्लीत गेलो तर तमाम खालांनी वैनी आये क्या, यहां से गये तो हमे भुलही गये असं ह्रद्य स्वागत या महिलेचं केलं. नुकतीच ईद झालेली. टिचभर खोल्या पाहुण्यांनी तुडुंब भरलेल्या होत्या. चकाचक कपडे, चमचम दागिने, गर्द मेंदी हातभर, लाल चुटूक नेलपेंट. कुठल्या तरी दर्ग्याला कौटुंबिक ट्रिप जात होती. त्यामुळे मंडळी घाईत होती. जुजबी बोलणी केली. फोन नंबरची देवाण घेवाण करावी तर रंगारंग कपड्यांवर बुरखे चढवण्यात गर्क असलेल्या तमाम खाला बावचळल्या. घरातल्या पुरुषाला न विचारता आपला फोन नंबर (तोही असल्यास)
एका परक्या, पर धर्मिय महिलेला देणं, अशक्य आहे. मग त्यातल्याच एका पुढारलेल्या महिलेने पोराटोरांकडून घरातल्या पुरषांचे नंबर दिले. माझा नंबर घेतला. एवढ्या अडचणीतल्या घरातही त्यांनी मोठा पोपटाचा पिंजरा ठेवला होता. तो पोपटही भलताच खादाड आणि अग्रेसिव्ह होता.
दोन-तीन दिवसांत भेटायचे वायदे करुन निघालो.
ही माझी कामवाली चांभार जातीची आहे. आणि आमच्या परिसरातच तिच्या बहिणीचा नवरा चपला शिवायचा व्यवसाय करतो. जातानाही ती जरा त्याची नजर चुकवून, वाट बदलूनच माझ्या बरोबर आली. येताना मात्र सरळंच माझ्याबरोबरच आली. नेमकं त्या गृहस्थाने म्हणजे मेहुण्याने पैसे कधी देणार हे सौजन्य सोडून तिला विचारलं. चालणं न थांबवता तिने हो, देईन की सवडीने असं सांगितलं आणि मग मला सगळी कथा सांगायला लागली.
चारेक वर्षांपूर्वी ती याच भागात रहायची. वयात आलेली मुलगी आणि दोन लहान मुलं. नवरा दारुडा. कुटुंबाला मदत शुन्य. तर या शाळकरी मुलीला एक मुलगा रोज त्रास द्यायचा, मागे लागायचा, छेडायचा. बरंच समजावलं पण हा प्रेमी ऐकेचना. शेवटी वैतागून यांनी घर सोडलं, दूर रहायला गेले. झटपट मुलीचं लग्नही करुन दिलं. ती आता दोन पोरांची आई आहे. या नवथर तारुण्यातल्या प्रेम, पाठलाग आणि छेडाछेडीमुळेच या वर्गातल्या बहुसंख्य आठवी-नववीतल्या मुलींची लग्न उरकली जातात.
तर या लग्नासाठी तिने या मेव्हण्याकडून दहा हजार उसने घेतले होते. त्यातले सहा हजार हिनेच स्व कष्टाने फेडले. पण जेव्हा हिच्या नव-याला या मेहुण्याने तुझ्या बायकोने थोडे पैसे परस्पर परत दिले हे सांगितलं तेव्हा हिचा नवरा हिच्याशी भांडला, अद्वातव्दा शिव्या दिल्या. माझ्या न कळत तुझ्याकडे इतके पैसे आलेच कसे म्हणून. नाही नाही ते आरोप केले बायकोवर.
नवरा काय मेहुणा काय दोघंही एका माळेचे मणी.
उसने पैसे बहिणीतर्फे मेहुण्याला दिले तर बहिण म्हणते मला नको मधे घालू. माझ्याकडून तुझे पैसे घेताना माझा नवरा मला म्हणतो हे पैसे तुझ्या बहिणीनी दिले कशावरुन ? तुचं तुझ्याकडचे पैसे देत असशील आणि बहिणीने दिले असं म्हणत असशील. मग माझ्याकडे एवढे पैसे कसे आले म्हणून माझाही नवरा माझ्याहीकडे संशयाने बघतो.
तेंव्हा तुझं तू बघ.
एकतर तिची ही कथा समजून घ्यायलाच मला वेळ लागला. समजली तेंव्हा कळलं किती अतर्क्य, संशयी आणि पुरुषी विचारांची चिरेबंद ठेवण आहे ही.
अक्षरशः बायकांचे कर्दनकाळ म्हणजे यांचे नवरेच असतात. मुलं जन्माला घालण्या पलिकडे कुठलीही कौटुंबिक जबाबदारी घ्यायची नाही. पैसा कमवायचा नाही. कमावला तरी जास्तीत जास्त स्वत:वर, दारुवरच खर्च करायचा. स्वत:चे सगळे छंद जोपासायचे. मग या महिलांना घरकामं करण्याशिवाय पर्याय रहात नाही. मग त्यांच्या कामांवर संशय, पैशावर डोळा, त्याचे जाब, शहानिशा.
येता जाता संशय, भांडण आणि मारहाण.
अरे त्या दोन-तीन लेकरांच्या आईने करायचं काय ? कसा संसार रेटायचा ?
मग त्याही शहाण्या होतात. सहा घरची कामं करतात आणि चारचं कामं करतात असं सांगतात. सात हजार कमवत असतील तर घरच्या पुरुषाला पाच हजारच सांगतात. एकुणच मग अशीही बनवाबनवी सुरु होते आणि संशयाला खतपाणी मिळत जातं.
दैनंदिन जगण्यात या महिलांना खरोखर फार संघर्ष करावा लागतो, तडजोडी कराव्या लागतात. रोजचं जगणं म्हणजे अक्षरशः सुळावरची पोळी आहे असं म्हटलं तरी चालेल.
घरी पोहोचेपर्यंत त्या चिंचोळ्या, दमघुट्या गल्ल्या, कोंदट घरं, झगमग कपड्यांवर बिनबोभाट काळे बुरखे चढवणा-या महिला आणि कळकट पिंज-यातला तगमग करणारा हिरवा पोपट हे सगळंच हिच्या कथेला भलतंच समर्पकपणे इलस्ट्रेट करणारं वाटलं मला.
का हे सगळं सहन केलं जातं ? आणि नुसतंच सहन नाहीतर येत्या वडपौर्णिमेला याच महिला नटून थटून वडाला दोरे बांधून पतीला दिर्घायुष्य मागतील. जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून कडकडीत उपास देखील करतील.
भुगर्भात अगदी खोलवर गेलेल्या मुळ्यांसारख्या या समजूती आपल्या समाज जिवनात अगदी खोलवर रुजलेल्या आहेत.
कर्दनकाळी नव-याबरोबर संसार निभावून नेणा-या महिलेला सन्मान व थोडीफार सुरक्षितता आहे पण स्वकष्टाने, स्वत:च्या हिमतीवर नव-याशिवाय जगणा-या कणखर महिलेला समाजमान्यता नाही, सुरक्षितता नाही.
महिलांना जोखडबंद करणारी केवढी डबल स्टॅन्डर्स आहेत या पुरुषप्रधान संस्कृतीची.
No comments:
Post a Comment