साधारण १७-१८ वर्षांपूर्वी साऊथ राजस्थानला बाय रोड गेलो होतो. उदयपूर, कुंभलगड, चितोडगड, बुंदी, रणथंबोर असा साधारण प्रवास होता. तेंव्हा जुन्या वस्तूंची आस आणि ओढही नव्हती. पण बुंदी शहरात एका हवेली कम होमस्टे सदृश्य हॉटेलमधे राहिलो होतो. बुंदी गाव फार छान आणि आटोपशीर आहे. डोंगरातला किल्ला, राजवाडा, रंगशाळा. लोकांमधे राजस्थानी ग्रामीण बाज. अत्यंत अरुंद गल्ल्या, एकसे एक रंगवलेल्या छज्जेदार हवेल्या. रंगबिरंगी ओढणीतल्या घागरेवाल्या ललना...अगदी पाहताक्षणीच प्रेमात पडावं असं गाव आहे हे. इथल्या चिंचोळ्या गल्लांमधे ठिकठिकाणी राजस्थानी मिनियेचर आर्ट सारखी चित्र भरपूर पहायला, विकत घ्यायला मिळतात. तशीच ती भांग पण. चक्क पाट्या लावलेल्या असतात इथे भांग मिळते म्हणून.
तर आम्ही ज्या हवेली-हॉटेलमधे रहात होतो ती एक राजस्थानी कुटुंबीयच चालवत होतं. मागच्या दोन तीन खोल्या खाजगी होत्या, स्वैपाकघर सामुहिकच होतं. घरातल्या विवाहित, अविवाहित महिला घागरा घुंगटवाल्याच होत्या पण वास्तव्याला असलेल्या पर्यटकांशी अगदी मोकळं बोलत होत्या, वागत होत्या.
तर या कुटुंबियांकडे खुप जुनी भांडी होती. एक से एक ग्रामीण बनावटीची. चौकशी केली तर कळलं इथेच मिळतात अशी भांडी. खरेदीची उत्सुकता दाखवली तर त्या कुटुंबातील तरुण म्हणला आंटी मेरे साथ चलो, मेरे दोस्त काही दुकान है. पडत्या फळाची आज्ञा घेऊन लगेच गल्ली बोळातल्या भांडी बाजारात त्याच्याच बरोबर गेले. बरीच भांडी बघीतली. फारसा अनुभव नसल्यामुळे फारसं काही चोखंदळपणे घेतलं नाही. तरी ही पितळेची बसकट डेकची, दोन ठोकेदार पितळी वाट्या, गुलबट रंगाचं तांब पितळ मिक्चरचा ओतीव भरत्या आणि ऐटबाज अशा कात-चुन्याच्या पितळी डब्या. (म्हणजे तसा एक चांदीचा मोडीतला नेकलेस पण घेतला म्हणा)
आता कुणालाही वाटेल चारवस्तुंसाठी किती लांबण लावलयं म्हणून. पण जुन्या वस्तूंच्या खरेदीचा सल्ला मी आता देणार आहे.
गेले आठवडाभरातल्या या पेजवरच्या शेकडो पोस्टी आणि हजारो वस्तू बघून अनेकांना मोह झाला असेल अशा वस्तू जमवायचा. पण वस्तूंच जूनेपण ओळखणं, वाजवी किंमत देणं, त्यांची आपल्या दैनंदिन जगण्यात उपयुक्तता असणं हे जमणं, माहित असणं पण गरजेचं आहे.
साधारण छोट्या गावातनंच जुन्या वस्तू विकत घ्याव्यात. छोट्या गावात किलोंनी व्यवहार होतो. तिनशे रु किलोनी विकत घेतलेल्या मोडीला चारशे रुपये जरी भाव मिळाला तरी हे छोटे दुकानदार खुश असतात. वस्तू हलते, पैसा मोकळा होतो. त्यामुळे सुरवातीला तर छोट्या गावांपासूनच सुरवात करावी.
शहरात फार दामदुपटीने वस्तू विनाकारण विकतात. कारण एॅंटिकचे दलाल इथपर्यंत पोहोचलेले असतात त्यामुळे हौशी, काटकसरी गि-हाईकांची या दुकानदारांना किंमत नसते. वस्तू नगाने त्याही भरपूर नफा ठेवून हे शहरी दुकानदार विकतात.
So to start with and as a thumb rule go to small places, small shops. मोडीच्या किमतीपेक्षा प्रति किलो शे -दिडशे जास्त दिले तरी खूप झाले.(२५-३०वर्ष जुन्या वस्तू साठी)
डबल किंमत पन्नासवर्षांहून जास्त जूनी वस्तू असेल तर. शंभरी पार केलेली सुस्थितीतील वस्तू असेल तर हजार रुपये किलो. आणि अति दुर्मिळ असेल तर लाखांच्या पुढेच.(व्यवसाय करायचा नसेल तर या लाखोंच्या फंदात न पडलेलं बरं)
साधारण एक वर्षभर महिन्याचे हजार-पंधराशे रुपये यासाठीच बाजूला ठेवायचे. बघा किती छान वस्तू मिळतील, किती माहिती मिळेल, किती दर्दी माणसं जोडली जातील. एक मनस्वी छंदच आहे हा. बरं हा छंद कधीही न बुडवणारा आहे. दहा-बारा वर्षांनी वस्तू विका, चढाच भाव मिळेल.
So don't hesitate to shop or to invest.
मस्त हिंडा, फिरा. छान खरेदी करा.
हाताने बनलेल्या या वस्तू हाताळायला मिळणं, जतन करायला मिळणं भलतचं तहहयात सौख्य देणारं आहे.
बघा, नाही तुमच्या मुलांनी दहावीस वर्षांनी तुम्हाला या संग्रहासाठी धन्यवाद दिले तर !
***जुने लोटे, तांबे मी चमचे, पेन-पेन्सिल ठेवायला, पाण्यासाठी वापरते. वाट्या, ग्लास, मापटी कणिक-डाळ-तांदुळात मापासाठी वापरते. मोठे हंडे, कळशा घरात डेकोरेशनसाठी वापरते. लहान-मोठे डबे चहा-साखर, दागिने डबा म्हणून वापरते. थोडक्यात शक्य तितक्या वस्तू वापरायच्या, हाताळायच्या. मगच त्या आत्मियतेने आपल्या होतात, वाटतात.
काय सांगावं अजून पंचवीस वर्षांनी आपल्याच नाती आमच्या आजीची आठवण म्हणून आपल्या या तांब-पितळी हक्काने उचलून नेतील आणि असंच कुणाला तरी अपुर्वाईने दाखवतील. 😊
No comments:
Post a Comment