Wednesday, 5 June 2019

कोप्पेरा, घंघाळं....(AP)

वडिलोपार्जित जुन्या तांब्या-पितळीच्या वस्तु मिळण्याचं, सांभाळण्याचं भाग्य सगळ्यांनाच असतं असं नाही.
खुप जणांनी तरुणपणी घासायला-पुसायला-हाताळायला त्रासदायक म्हणून बरीच जुनी भांडी मोडीत काढलेली असतात. पण त्यातल्या काही जणांना उत्तर आयुष्यात जुन्या वस्तुंचा मागोवा घ्यायचा, त्या जमा करायचा, त्या धातुंचा, वस्तुंच्या आकाराचा शास्त्रीय अभ्यास करायची गोडी लागते. आणि मग सुरु होते भांडी बाजारातली पायपीट.
माझंही असंच झालं. आईच्या संसारातले जुने पितळी डबे, कुकर, ताटाळी, चमचे तिने आम्ही मिळून मोडीत टाकले. आणि आता मी तशा वस्तु जमाकरत फिरत आहे.

या दुकानांमधून फिरतानाही एक साक्षात्कारच होतो. भांडी दुकानदार म्हणजे एकिकडून वस्तु आणायच्या, भरपूर मार्जिन ठेवत विकायच्या. काही विशिष्ट जातीचे लोकच या व्यवसायात असतात. वर्षानुवर्षे पेढ्या चालतात. आजोबा गल्ला बघतात, त्यांचा मुलगा बाकीची धावपळ करतो आणि आठवी-नववीतला नातू कुणी नसेल तेव्हा दुकान बघत, सांभाळतच मोठा होतो, शिकतो पण. त्यामुळे मला नेहमी वाटायचं या दुकानदारांना फक्त आर्थिक नफा कळतो. आज पितळ विकतील तर उद्या लोखंड पण विकतील. नफा महत्वाचा. पण तसं नसतं. वर्षानुवर्षे दिवसरात्र या भांड्यांमधे राहून या लोकांची नजर इतकी तयार झालेली असते की बघताक्षणी ते भांड जोखू शकतात. त्याच्या पुरातनतेचा अंदाज लावू शकतात. कुठल्या प्रांतात बनलं आहे हे सांगु शकतात. थोडक्यात त्या भांड्यांची एक आटोपशीर कुंडलीचा ते मांडू शकतात. 
मग त्यातला एखादा निपजतो जुन्या वस्तु जमवायचा छंद असणारा. मग हळुहळू मोड टाकणारे, जुन्या वस्तु विकणारे बरोबर या आसामीला गाठतात आणि वस्तु विकतात. मग दुस-या  मोठ्या शहरातले एॅंटिक विक्रेते बरोबर या व्यक्तीपर्यंत पोहंचतात आणि खरेदी करतात. थोडक्यात खरेदी-विक्रीची एक छान सायकलच निर्माण होते. पण मधल्यामधे स्थानिक दुकानदार चाणाक्षपणे या बाबतीत ज्ञानी-जाणकार होत जातो. म्हणजे रोजची दुकानदारी सांभाळताना एक जिवाला वेड लावणारी जिज्ञासू वृत्तीच तयार होते या व्यक्तीमधे. मग नुसती तांबं पितळीची भांडीच नाहीतर जुनी चांदी-सोन्याची नाणी, काचेच्या वस्तू, जुनं टेक्सटाईल, जुनी चित्र-फोटो, लाकडी वस्तू...अगदी म्हणाल त्या वस्तूंची माहिती आपल्याला मिळू शकते. गावोगावचे पत्ते मिळतात.
म्हणजे नित्याच्या दुकानदारी बरोबरच हा छंदही मनसोक्तपणे जोपासल्या जातो.

जुन्या वस्तुंसाठी कुठलाही नवीन पत्ता मिळाला की अनेक वस्तू हमखास आवडतातच. पण पहिल्या भेटीत शास्त्रापुरती निदान एक तरी वस्तु मी विकत घेतेच. त्याशिवाय दुकानदार तुम्हाला दुस-यांदा वस्तु दाखवत नाहीत. नंतर नंतर तर वस्तुंची खरेदी जरी केली नाही तरी वेळात वेळ काढून स्वत:कडच्या नव्याने जमा केलेल्या जुन्या वस्तु हा दर्दी दुकानदार फार अपुर्वाईने दाखवायला लागतो. आपली पण एक छान वेव्हलेंग्थ जमते या लोकांशी. वस्तुंशिवायच्या अनेक रोचक कथा ऐकायला मिळतात. ज्ञानात भर पडते. एकुणच जाणकार भांडी विक्रेत्यांशी बोलणं फार समृद्ध करणारं असतं.
खरेदी-विक्रीच्या पलिकडे जाऊन हे मैत्र दृढ आणि विश्वासार्ह होत जातं.

म्हटलं ना जुन्या गोष्टी भरपूर देतात म्हणून.

*** जे पितळी उभंट हंडा आहे तो तेलंगणात घरोघरी(झोपड्यांमध्ये) पाणी तापवायला वापरतात. त्याला तेलगू भाषेत कोप्पेरा म्हणतात. बघता क्षणी प्रेमात पडावं असा आकार, रंग, चमक आणि ठोके आहेत याचे. मी त्याच भागातल्या निर्मल या गावातून हा कोप्पेरा घेतला आहे.

उकडीच्या मोदकाचं तांब्याच पात्र चक्क औरंगाबादला मिळालं. असंच कोकणातून माणसांबरोबर स्थलांतर करुन आलं असावं. एका दुकानातली दूरदृष्टी ठेवून केलेली पहिली खरेदी.

महाराष्ट्रातील घंगाळं. आंघोळीसाठी वापरलं जातं.
हे मुख्यत्वे तांब्याचंच असतं. याचा पत्रा फार जाड असतो. जुनी घंगाळी भरपूर किंमत देऊन सोनार विकत घेतात. घडाईच्या दागिन्यांमध्ये याचं प्युवर तांब्याचा वापर सोनार करतात. मला खरंतर घंगाळं माझ्या आईच्या माहेरच्या गावातूनच विकत घ्यायचं होतं. पण नाही मिळालं. माझ्या आयुष्यातलं पहिलं घंगाळं मी आजोळच्याच चिरेबंदी मिट्ट अंधारवाल्या न्हाणीघरात पाहिलं होतं.
हे जुनं, जाड पत्री घंगाळं मी तापीच्या किना-यावरच्या आडबाजूच्या फैजपूर या गावी घेतलेलं आहे. इतकी वेगळ्या घडणीची तांब्या-पितळ-स्टिलची भांडी होती तिथे.
तिही ब-यापैकी स्वस्त.
बडेजावी, ब्रॅंडेड दुकानांच्या नादी लागून आपण आपलंच फार सर्वार्थाने नुकसान करुन घेत असतो.

No comments:

Post a Comment