Monday, 3 June 2019

साखरेची पितळी बरणी. (AP)

मला जरा निमित्ताने गावोगावी फिरताना भांडी बाजारात फिरायचा छंद लागलाय. बाजारात फिरायचं, मोडीतलं काही छान वेगळं मिळालं तर निदान एखादी वस्तू तरी आणायची असं साधारण वागणं असतं. छानशी वस्तुही मिळते आणि परप्रांतातली जुन्या पितळी-तांबीच्या वस्तुंच्या संदर्भातली मौलिक माहितीही मिळते. एकुणच असे अनुभव छान असतात.

दोनेक वर्षांपूर्वी खानदेशात गेले होते. आमचे परिचित एकेकाळचं तिथले धनाढ्य आणि नामांकित खानदान. भरपूर मोठा दोन-चार भावांचा पसारा, भलं थोरलं कुटुंब. कालांतराने चाराचे आठ झाले, आठाचे दहा झाले. कुटुंब विभागली गेली. थोरला वाडा जाऊन एकेकाच्या सिमेंटच्या इमारती झाल्या. काही मंडळी गाव सोडून गेले, काही गावातच राहिले. संसार चिमणी एवढे झाले. सुना नौकरीवाल्या आल्या. साहजिकच वाटे होऊन वाडा मोडला, सोनं-चांदी गुडुप्प झालं तर तांब-पितळी माळ्यावर गेली.
तर त्या घरातल्या एका वयस्क परिचितांबरोबर मी तिथल्या भांडी बाजारात फिरत होते. झाडून सगळे दुकानदार यांना ओळखणारे. एकाने माझी आवड बघून शोधून दोन-चार वस्तु समोर ठेवल्या. त्यातली ही तुपाची पितळी बरणी खूप आवडली. तसाच एक जाळीदार दागिन्यांचा डबा देखील आवडला. दोन्ही गोष्टी घेतल्या आणि दुस-या दुकानात गेलो. तिथेही स्वागतपर काही गोष्टी समोर ठेवल्या गेल्या. जुन्या मोडीतल्या वस्तुंवर बरेचदा नावं असतात. या वस्तुंवरची नावं पाहिली तर या काकूंच्या चुलत घराण्यातल्याच व्यक्तींच नावं.
काकू हे बघून जरा थबकल्याच.
...अरेच्या लताकाकूच्या सुनेने घरातली मोड काढली वाटतं म्हणत माझ्या या काकूने विषयांतर केले. पण कालचक्राच्या या गतीने त्याही जरा भांबावल्याच. म्हणजे अजूनही त्या काकूंच्या मनात बालपणीचा जुना वाडा नांदतोय, दहा-बारा भावंडं वाडाभर लपंडाव खेळताहेत, औरसचौरस पंगती जेवताना दिसताहेत, गोठ्यातल्या डझनभर गाईम्हशी हंबरताहेत, अख्ख्या गावाला खेचून घेणा-या लखलख महालक्ष्म्या नजरे समोर उभ्या दिसत असताना घरातल्या देवाजवळच्या समया, दिवल्या बाजारात बघून त्या स्तंभितच झाल्या. मलाही जरा ते कानकोंड झालं. वस्तु नको, नको म्हणत दुकानातून निघालो.
पण रस्ताभर मला आजच्या आणि मी आजपर्यंत जमाकरत आलेल्या मोडीच्या भांड्यांचा एक वेगळाच अर्थबोध होऊ लागला. न जाणो पंधरा वीस वर्षांनी माझीही भांडी अशीच बाजारात पडतील, कुणाला तरी ओळख देतील.
Who knows ?
काळाची गती अथांग आहे.

*** मुंबई मेकच्या या पितळी, दणकट बरणीत मी साखर ठेवते. यावरही कुणा एकाचं नाव आहेच. पण ही तुपाचीच बरणी असावी.

No comments:

Post a Comment