Monday, 3 June 2019

पितळी चमचे आणि इतर (AP)

जाऊ तिथल्या भांडी बाजारात डोकवायचा छंद मी फार हिरिरीने जपते. अगदी एक दिड दिवसांसाठी लग्नानिमित्त जरी कुठेही गेले तरी तासभर एक चक्कर या बाजारात मारतेच. आता बरेचदा त्या गावातल्यांना असे छंद नसतात त्यामुळे माहितीही नसते. आळंबळं सौजन्य दाखवत ते आपल्याबरोबर पाय ओढत फिरतात. मग जसे जसे आपण त्यांच्याच वतनी गावाचे अंतर्गत गल्लीबोळ पालथे घालतो, फटिचर दुकानच्या मालकाशी मस्त गप्पा मारायला लागतो तेव्हा ते घी देखा लेकीन बडगा नहीं देखासारखे जाम वैतागतात.
अहो, माझ्या लग्नाला विस वर्ष झालीयेत पण या भागात मी कधीच आली नाहिये असे डायलॉग्ज झाले कि समजायचं यजमानांच सौजन्य धोक्यात आलंय म्हणून. आपण मग वेळीच सावध होऊन आणि परतीला लागण्यातच शहाणपणा असतो.

मध्ये अशीच एका गावातल्या भांडी बाजारात फकिरासारखं फिरण्याची गोडी नसणा-या एका बाईंबरोबर फिरले.
परक्या गावात कुणीच तुम्हाला पहिल्या झटक्यात जुन्या वस्तु दाखवत नाहीत. त्यांची दोन-तीन कारणं आहेत. एकतर जुना अडगळीतला पसारा काढायला, दाखवायला आणि ठेवायला खूप वेळ लागतो. अनोळखी ग्राहकाच्या खरेदीचा अंदाज नसतो. नुसतंच बघुन पूढे जाणा-यासाठी कुठल्याच दुकानदाराला वेळ नसतो. दुसरं म्हणजे एकेका इलाख्यातलं एखादं गाव जुन्या वस्तुंसाठी प्रसिध्द असतं. त्यामुळे मुंबई, हैदराबाद, कलकत्ता, दिल्लीपर्यंतच्या दलालांची इथपर्यंत पोहंच असते. व्यावहारिक लागेबांधे असतात. त्यामुळे तुमच्यासारख्या फुटकळ गि-हाईकाला तसं कुणी दाद लागू देत नाही. अजून एक कारण म्हणजे बरेचदा या गोष्टी-वस्तू गैरमार्गाने दुकानांपर्यंत पोहोचलेल्या असतात. अर्थात यात दुकानदारांचा हात नसतो. पण बरेचदा चोरीचा माल बेभाव इथे विकून चोरटे रफादफा होत असतात. एॅंटिक्सचं एक वेगळंच विश्व आणि अर्थकारण आहे. त्यामुळे या कारणांमुळे माझ्यासारख्या पत्रकार कम इंस्पेक्टर ऑफिसर दिसणा-या शहरी महिलेला कुणीही दाद लागू देत नाहीत. म्हणून तर कुठल्या तरी स्थानिक बंडू-बेबीला घेऊन फिरावं लागतं.
तर असो.
या गावात फिरताना हे पितळी झा-या, सराटा आणि दोन डाव घेतले. याच गावात एक सुरेखच पितळी डबा आवडला होता. झोकदार अक्षरात कुणाचं तरी नावं गावं लिहिलेलं. खरेदीचं नक्की झाल्यावर दुकानदार नावं गावं खोडायला लागला. खोडू नका म्हटलं तर ऐकेना.
अहो या नावामुळेच तर छान आठवण राहिलं की नाही ? पण नाही तो दुकानदार नावं मिटवायला इरेलाच पडला. शेवटी साशंक होऊन म्हणला, जाऊ द्या, मला हा डबाच विकायचा नाही. नाही म्हणजे नाहीच दिला त्याने तो डबा. त्याच्या मनात नक्कीच काहीतरी शंका उपस्थित झाली असेल.

मोठा नक्षीदार जाळीचा पितळी झा-या अमळनेर जवळच्या सोनगिर इथुन आणलाय. आणि नजाकती पोपटांच्या जोडीची नक्षीदार सांडशी औरंगाबादच्याच भांडी बाजारातल्या जाणकार दुकानदाराकडनं घेतली आहे.
माझ्या आईकडे एकेकाळी झारे, सराटे, चिमटे पितळीच होते. पण स्टिलच्या चकचकाटापुढे आमची बुध्दी भ्रष्ट होऊन या वस्तु बाजारात गेल्या. तेही मोडीच्या शुल्लक भावाने.

No comments:

Post a Comment