कैरीच्या लोणच्याच्या लेखमालेत बालपणापासून अनुभवलेले लोणचं घालतानाचे सामाजिक, वैयक्तिक अनुभव, त्याकाळच्या समजुती, त्याकाळचा बाजार, एकोपा या विषयी जास्त करुन लिहिणार आहे.
अर्थातच रेसिपीज फार टाकणार नाहीये. पण मी जी दोन-तीन प्रकारची लोणची-मुरांबे करते त्याविषयी ओघाने सांगणार आहे.
जसा आपला खिचडी हा पदार्थ राष्ट्रीय पदार्थ म्हणून मान्यता पावलाय. तसचं भाजी-वरणा व्यतिरिक्तचं राष्ट्रीय तोंडी लावणं म्हणजे हे कैरीचं रसदार आंबट, चटकमटक लोणचं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरु नये इतकं ते भारतात आणि भारतीय उपखंडात लोकप्रिय आहे आणि अक्षरशः घरोघर केलं जातं.
लोणच्यांची परंपरा किती जुनी आहे हे मला माहित नाही. पण बहुदा मनुष्य भटका असतानाच्या काळापासून ही लोणची किंवा तिखट मीठात बुडवलेल्या काही फळभाज्या हा प्रकार आस्तित्वात आला असावा. मिळेल ती शिकार किंवा चारदोन भाकरींबरोबर सहज उपलब्ध होऊ शकणारं, सोबत नेता येऊ शकणारं, पाकक्रियेची भानगड नसणारं हे खमंग तोंडी लावणं लोकप्रिय झालं असावं.
टिव्हीवर हेरिटेज चॅनलवर पुर्वीच्या युध्दकाळी सुध्दा सैन्याबरोबर लोणच्याचे बुधले रवाना करत असतं असे उल्लेख आहेत. विविध प्रांतीय लोणच्याच्या चवी-ढवींपेक्षाही बुध्दी चातुर्याने मानवाने लावलेला हा वर्षानुवर्षे टिकणारा स्वस्त आणि मस्त लोणचं प्रकार, त्यातलं शास्त्र मला थक्क करतं.
साधी गोष्ट.
आवडीची, टिकण्याच्या योग्यतेची व मुबलकपणे उपलब्ध असलेली व अंगभूत चव असलेली फळं घ्यायची त्याला तिखटमीठ लावून चटकदार करायचं तेला-मीठाचं योग्यप्रमाण टाकून ते वर्षोनुवर्ष टिकवायचं. म्हणजे मग अवर्षणात, आपत्तीच्या काळात, संकटकाळी, पावसाळ्यात चार भाकरी जरी असल्या तरी बेसिक जेवणाची सोय होऊन जाते.
Select the fruit, marinate it with oil and salt and use it as per your requirement.
तशी लोणची तर ब-याच फळांची बनतात. कैरी, मिरची, लिंबू, हळद, लसुण, अद्रक, ड्रायफ्रुटस, कडधान्य अगदी चिकन-मटनांची सुध्दा टिकावू लोणची बनत असली तरी बाजी मारली आहे ती कैरीनेच. त्या खालोखाल लिंबू आणि मिरची आहे.
माळोरान उपलब्ध असलेली कैरीची झाडं, तुडुंब येणारा बहर, अंगभुत अशी रसदार चटपटीत आंबटगोड चव आणि तिखट-तेल-मीठात टिकायची क्षमता यामुळे जून महिना म्हटलं की घरोघर लोणची घातली जातात.
आता प्रांतवार, जिनसांची उपलब्धता, निर्माण झालेली चव यामुळे कै-यांबरोबर इतरही बरेच पदार्थ या लोणच्यात वापरले जातात. पण खरं बेसिक लोणचं म्हणजे कैरींच्या फोडीत तिखट-मीठ-तेल टाकलं की झालं लोणचं तयार. सगळं कसब त्या कै-या निवडण्यात आणि बेतशीर मीठ-तेल टाकण्यात. पुर्वीच्या काळी अक्षरशः वर्षानुवर्ष लोणची टिकत असतं.
हल्लीच जरा असतील नसतील ते पदार्थ-जिनसा टाकून लोणची घालायची पध्दत रुढ झाली आहे. परत गेला बाजार फ्रिज असतातच ही लोणची टिकवायला मदत करायला. त्यामुळे लोणचं या प्रकारात वैविध्य मात्र खुप आलयं.
तर काल मी आमच्या नांदेडकडे (तेलंगण-आंध्र-कर्नाटक जवळ) ज्या एका वेगळ्या प्रकारचं कैरी लोणचं घातलं जातं त्या पध्दतीचं लोणचं घातलं. या लोणचं प्रकाराला सकुबद्दा असं म्हणतात. माझी आई-मावशी-चुलत बहिण हे लोणचं आवर्जुन करायच्या. त्यामुळे सखु(कु)बद्दा हे नावही लक्षात आहे आणि चवही सुपरिचित आहे.
छानशा टणक आंबट जास्त, गोड कमी अशा गावरान कै-या घ्याव्यात. जरा काहीवेळ पाण्यात बुडवून पुसुन सालं काढावीत आणि चाकूच्या सहाय्याने मेथ्यांब्यासाठी कापतो तशा छोट्या चिप्स करुन घ्याव्यात. नंतर या कैरी चिप्समधे चवीचे पण सढळहस्ते मीठ, तिखट हिंग टाकावा, दोन चमचे गुळही टाकावा, दोन पोहे चमचे भरुन तिळ आणि दिड चमचा मेथ्या घ्याव्यात. तिळ वेगळे भाजून व पावडर करुन घ्यावेत, मेथ्या जुजबी तेलावर लालसर परतून बारीक करुन घ्याव्यात. नंतर ही तीळ-मेथ्या पुड व चमचाभर धण्याची व जि-याची पावडर या चिप्समधे टाकून व्यवस्थित कालवून घ्यावं. पुर्ण पध्दत म्हणजे या मिश्रणावर गार झालेली मोहरी-हिंगाची फोडणी टाकावी. पण व्यक्तीश: मी असं तेल टाकण्याच्या विरुद्ध आहे. एक तर ही लोणचीच मुळी जास्तीतजास्त साताठ कै-यांची केली जातात. नवीनतम असतानाच झटपट संपतात. नसता फ्रिजचे कोपरे असतातच ही बाटलीभर लोणची सांभाळायला. त्यामुळे हा सकुबद्दा मी बिनतेलाचाच केला.
तिळ-मेथ्या-धणे-जि-यांच्या मसाल्यामुळे हा सकुबद्दा घमघमीत वासाचा व मसालेदार होतो.
सकुबद्दा वापरताना एखाद्या बाऊलमधे हे लोणचं थोडंसं काढायचं कमी तेलाची मोहरी-हिंगाची ताजी फोडणी द्यायची आणि पोळी, पुरी भाताबरोबर खायचं. अत्यंत चविष्ट लागतं.
कैरी लोणच्याचे जे काही दोन तीन प्रकार मी करते त्यातलाच हा एक प्रकार.
सकुबद्दा.
अर्थात हा सकुबद्दा करायच्या आधी चुलत-मावसबहिणींना फोन झालेच होते. परत एकदा काकू-मावशीचं ह्र्द्य स्मरण झालंच.
लोणच्यांचा महिमा हा असा असतो.
या आंबटगोड कै-यांमधे नुसतंच तेल मीठ मुरत नसतं तर ब-याच जिव्हाळ्याच्या ऋणानुबंधी आठवणी पण मुरलेल्या असतात.
उगाच नाही लोणची खमंगही होत आणि वर्षोनुवर्ष टिकतही !
No comments:
Post a Comment