Saturday, 1 June 2019

लोणचं पहावं आणि दाखवावं करुन.

लोणचं पहावं आणि दाखवावं करुन.

Come September सारखंच भारतीय उपखंडात Come June म्हणावं आणि लोणची घालायच्या प्रक्रियांना सुरुवात करावी.

जून महिन्यातलं पहिलं मळभ आकाशात दाटले की निघावंच चिनीमातीच्या येताजाता हेरुन ठेवलेल्या बरण्या आणायला. लगोलग वर्षभरात कुठे, कधी, कुणाकडे कशाप्रकारची कैरीची लोणची चाखलीत, खुप आवडलीत ते आठवावं. हाता सरशी फोन फिरवावेत. आया, मावशा, बहिणी आणि मैत्रिणींकडून खास नुख्सेदार रेसिपीज घ्याव्यात. प्रामुख्याने आपल्या आवडीचा विचार करावा, जरा घरातल्यांचीही मर्जी विचारात घ्यावी आणि यंदा किती प्रकारची कैरी लोणची घालावीत हे एकदा मनोमन ठरवून टाकावं.
जरा हवेचा आणि लोणची सटिकपणे घालायच्या आपल्याही कुवतीचा अंदाज घ्यावा आणि एका प्रसन्न सकाळी खुशाल गरजेप्रमाणे दोन-चार-आठ किलो लोणच्याच्या कै-या आणुन टाकाव्यात. आणल्यासरशी हिरव्यागार टणटणीत कै-या पाण्यात बुडवून ठेवाव्यात आणि निवांतपणे एक कप चहा करुन पीत बसावं. बसलेल्या ठिकाणी लगेचच फेसबुकवर हुंदडत लोणचं घालायच्या आपल्या धडाडीच्या कार्यक्रमाचं एक चटपटीत स्टेटस फेसबूकवर टाकून आपला कामसूपणा सार्वजनिक करावा.
परत एकदा आपापल्या लोणचं गुरुंना फोन करुन मेथ्या वाटून परतायच्या का परतून वाटायच्या ? मोहरी डाळ घरीच करावी (खलबत्ता-मिक्सर) का रेडिमेड वापरावी ? हळद-मीठही परतुन घ्यायचे का कच्चेच टाकायचे ? तिखट शिगवाटी का सपाट वाटी घ्यावी ? फोडी बाठीसहच घ्याव्या का नाही ?
आणि फोडणीचं तेल गरम-कोमट का गारीगार करुन टाकावं ? लसुण-लवंग-मिरे-बडीशोप-दालचिनी-
कलौंजी-तिळ-छोले-हरभरे-खारका असले
अनेकता मे एकतावाले राष्ट्रीय जिन्नस लोणच्यात टाकावेत का नाही टाकावेत ? या आणि अशा अनेक प्रश्नांचं एक रॅपीड सेशन उरकावं.

लोणचं घालायचा राष्ट्रीय कार्यक्रम आज घरी साजरा होत असल्यामुळे आज नाश्ता आणि जेवणाची आणीबाणी आहे असं घरात अभिमानाने जाहीर करावं. झटपट सुस्नात व्हावं, स्वच्छ पण टाकून द्यायच्या लायकीला आलेला ड्रेस घालावा, झिप-या बांधाव्यात आणि लोणचं घालायच्या प्रक्रियेला झोकात सुरुवात करावी.
अरेच्या...विसरलेच की !
अशा शुभारंभी जो कोण आपल्या जवळ असेल त्याला विनंती करुन लोणचं घालतानाचा एक सुगरणी फोटोही लगोलग काढून घ्यावा. लगेच प्रोपिक म्हणून डकवूनही टाकावा आणि आजपर्यंत काही शेकडा कै-यांची लोणची-तक्कू, मुरांबे-साखरांबे अगदी सहजपणे बभ्रा न करता केलेल्या, करत आलेल्या आपल्या तमाम आज्या, काक्वा, माम्या, आत्या आणि आयांना मनोमन स्मरावे, जय रामजी की म्हणावे आणि कै-या कापायला घ्याव्यात.

संध्याकाळी या तयार, चटकदार लालचुटुक लोणच्याचे नमुने शेजारी (म्हणजे शेजार असल्यास आणि तसे देवाणघेवाणीचे संबंध असल्यास) द्यावेत नसता भारतीय पाककलेचा एक उत्तम मुरलेला वारसा आपण कसा फार उत्साहाने जपत आहोत या अविर्भात या देखण्या लोणच्याचे काही फोटो फेसबुकवर वा व्हॉट्सॲपवर टाकून अजरामर करावेत.

No comments:

Post a Comment