Monday, 27 May 2019

मछली जल की रानी है....

गेले निदान विस वर्ष झाली औरंगाबादला एक दिवसाआड तसेच एखाद-दोन तासच कॉर्पोरेशनच पाणी येत आहे. पाणी येण्याच्या वेळाही विभागांप्रमाणे वेगवेगळ्या आहेत. म्हणजे रात्रीचे ११ आणि पहाटेचे ४ याही वेळा काही औरंगाबादकरांच्या गळी कॉर्पोरेशननी उतरवलेल्या आहेत. उन्हाळ्यात आणि येथेच्छ पाऊस पडे पर्यंत म्हणजे जुलै पर्यंत मात्र तीन दिवसाआड पाणी हा आमच्या इथला खाक्या आहे. कुरकुर करत का होईना पण तमाम शहरवासीय या सिस्टीमलाही सरावलेत. पण गेले तीन वर्ष झाले पाऊस कमी पडतोय, ऊन्हाळा तब्येतीत रणरणतोय, शहर विस्तारतंय, जनसंख्या वाढतीये, कारखानदारी स्थिरावतीये...एकूणच शहराचा पसारा अस्ताव्यस्त वाढलाय. त्यामुळे उन्हाळा म्हटलं की पाण्याचं दुर्भिक्ष्य हे पाचवीलाच पुजलंय. तरी पण म्हणू तेव्हा पाण्याचे टॅंकर्स बोलावू शकत असल्यामुळे पाणी टंचाईचे इतके जिव्हारी चिमटे बसत नव्हते. पण यावर्षीचा हा मे महिना अक्षरशः परिक्षा बघतोय.

एकतर सहन न होणारी उन्हाळी रणरण, पाण्याची थेरं, घरातल्या अडचणी, अक्षरशः कधी हा उन्हाळा, मे महिना संपतोय असं झालंय. दुष्काळात तेरावा महिना म्हटल्यासारखं गेले अठरा दिवस आमच्याकडे पाणीच आलं नाहीये. तसंही पाणी गेले अनेक महिने पाचव्या दिवशी तेही तासभरच येत होतं. पण आम्ही त्यालाही सरावलो होतो. पण मध्यंतरी नळाला गढुळ पाणी येतंय म्हणून कुणीतरी मेन लाईनमधे उकराउकरी केली आणि आम्हा साताठ घरांचं पाणीच बंद झालं. एक पाच दिवसांची गॅप कशीबशी निभावली. नंतर मात्र टाकीतलं प्यायचं आणि वापरायचंही पाणी संपलं. वापरायचं पाणी टॅंकर्सनी कधीही मागवता येतं, पण प्यायचं पाणी म्हणजे जरा तापच असतो. माझ्याकडे तर हे विकत घेतलेलं पाणी साठवायलाही मोठाली भांडी नाहियेत. सप्लायर्सवर सुध्दा पाणी पुरवठ्याचा इतका ताण आहे की ते पण डिस्पेन्सर्स ठेवायला तयार नाहीत.
त्यात आमच्यामागे दवाखाना लागलेला. त्यामुळे सगळ्यांच्या वेळा, मानसिक-शारिरीक ताण सांभाळून पाण्यासाठी घरात थांबणं, सोय लावणं अपरिहार्य आहे.
बरं कुठलेही पाणी पुरवठा करणारे देखील किती पुरे पडणार हो ? जमीनीत पाणी तर शिल्लक हवं ना ?अक्षरशः राऊंड द क्लॉक टॅंकर्स सगळीकडे धडधडताहेत.
बरं नळांची दुरुस्ती करायला, चेक करायला तरी नळांना पाणी पाहिजे ना ? म्हणजे परत ५ दिवसांनीच प्लंबर्स येणार, त्या तासाभरातच खणाखणी, जोडाजोडी करणार, तोपर्यंत आम्ही पाच पंचवीस जणं पाणी आलं का, गेलं का करतच्या चौकशा करत मोटर्स चालू बंद करत पळापळ करत रहाणार. एवढं करुनही पाणी नाहीच आलं की वॉटर सप्लायर्सचे फोन्स फिरवणार.
पैशा परी पैसा जातोय पण मनस्ताप किती होतोय ? आधीच दवाखान्यामुळे आपण अस्थिर झालेलो त्यात ही जीवनरुपी पाण्याची भानगड. काल तर अक्षरशः रात्री नऊ पर्यंत पाण्यासाठी, पाईप लाईन मधली प्रॉब्लेम शोधमोहीम चालू होती. ब-याच भानगडी उघडल्या गेल्या. नको तिथे कापलेले पाईप्स, सारासार विचार न करता आडवेतिडवे पाईप्स तोडून, जोडून चोरुन घेतलेली कनेक्शन, नळांमधला कचरा, प्लॅस्टिक्स, दगडं...खरंच आपण सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहोत का ?
रात्री नऊ पर्यंत अख्खी गल्ली पाणी...पाणी करत च्याव च्याव करत होती.

मला तर लखकन १९७२ दुष्काळच आठवला. आमच्या कोटला कॉलनीत असेच कधीही रात्री बेरात्री पाण्याचे टॅंकर्स यायचे, ही लोकांची झुंबड उडायची. बारक्या-सारक्या पोरांसह अख्खी कुटुंबच्या कुटुंब लायनीत एकेक बकेट, हंडा, डबडे घेऊन उभी असायची. भांडणही खुप व्हायची.
माझ्या राशीला आज ही पाण्याची कटकट नसती तर या जुन्या आठवणींविषयी मी ह्र्द्यपणे लिहिलं असतं. पण पस्तीस वर्षांनंतरही त्याच स्वरुपाचा हा अनुभव अतिशय उद्विग्न व हताश करणारा आहे.

तर काल आमच्यासाठी खास सोडलेलं पाणी पाच-दहा मिनिटं येऊन परत थांबलं. एवढ्या खणाखणी नंतर आलेलं ते गढूळ पाणी अक्षरशः फेकून द्यावं लागलं. शेवटी टाक्या रिकाम्या ते रिकाम्याच.
गेल्या तीन आठवड्यांच्या अनुभवाने वापरायच्या पाण्याचा टॅंकर मी संध्याकाळीच बोलावून घेते. एकतर सकाळी सप्लायर्सनाही लोड असतो आणि दिवसा लाईटही जातात त्यामुळे धोरणीपणाने संध्याकाळीच टॅंकर बोलावलेला परवडतो. तर काल अक्षरशः रात्री साडे दहा नंतर टॅंकर आला. आम्ही आॅलरेडी झोपायच्या तयारीत होतो. खाली उतरुन टॅंकरवाल्याशी संवादरुपी सामना करायचही जीवावर आलं होतं. उद्या पाणी टाका म्हटलं तर दिदी अभी घर तक पानी आया है तो ले लो ना. पैसे लगे तो कल देना. टॅंकर्सवालेही बिचारे कंटाळत असतील दिवसभर ही वणवण करुन. पैसा मिळतोय हाच एक दिलासा.

थोडक्यात उन्हाळा छळतोय. आपली आहेरेंची ही गत गरीबांची तर काय गत असेल ? खेडोपाडी तर अजूनच विदिर्ण अवस्था आहे. पाण्या सारख्या अत्यंत गरजेच्या गोष्टीसाठी आपला व दुस-यांचा विचार करुनच थकायला होतंय, चिडचिड होतीये.

नाही म्हणायला सकाळच्या सुखद हवेतला निवांत चहा आणि पॉन्डमधे अहमिकेनी फुलणारी वॉटर लिलीज मात्र जीवाला काही प्रहर तरी श्रांत करताहेत. यावर्षी ही पांढरी वॉटर लिलीज फारंच तुडुंब फुलताहेत. (तेही कुठलीही निगुतीची काळजी न घेता)
कोमेजलेली, फुललेली आणि अर्धोन्मलीत अशी ५-६ फुलं एका वेळेस दिसताहेत.

या रणरणत्या कठीण समयी हाच काय तो दिलासा.

No comments:

Post a Comment