काळाची गती अगाध आहे.
जुनं जातं, नवं येतं. नवं सुध्दा मग कालांतराने जुनं-जुनाट होत होतं नामशेष होतं. नव्याने जुनं होत अस्तगत होताना नुतन नव्याला जागा करुन देणं हा या चराचराचाच नियम आहे.
मानव, प्राणी, पक्षी, झाडं अशा सर्वच निसर्गनिर्मित गोष्टी या चक्रात अडकलेल्या असतातच. पण मानवनिर्मित देश, शहरं, राजवटी, घराणी, खानदानं, उद्योग, व्यवसाय, वास्तू, सामुहिक-वैयक्तिक यशापयशाचे अलिखीत मनोरे देखील या नव्या-जुन्याच्या जात्यात भरडून निघतात. आणि ते योग्यच आहे.
उदयास्त हाच या जगण्याच्या जीवनदायी व आश्वस्त करणारा मुलमंत्र आहे.
पण आपल्या चिमूटभर आयुष्यातल्या नजरेसमोर असा कुणाचा अस्त झाला की आपण चुटपुटतो, हळहळतो. खरंतर आपणही या लायनीतच असतो. तरीही एखादा प्रस्थापित बुरुज ढासळताना जीव हेलावतोच.
गावोगावी, गल्लोगल्ली फिरताना जुन्या इमारती ढासळताना, पाडल्या जाताना हमखास दिसतात. उखडलेलं अंगण-पाय-या, पाडलेल्या भिंती-गॅल-या, तुटके फुटके दगड-विटा-फरश्या, मातीचे ढिगारे, लाकुड-लोखंडांचे खांब-तुळया-जाळ्या...
अक्षरशः ति-हाईताच्या दृष्टीने एक सुन्न करणारं हे दृश्य असतं.
जुनी पुराणी भाऊबंदकी मधली वडिलोपार्जित प्रॉपर्टी सुसह्यपणे विकली गेली म्हणून फायदेमंद विकणारे खुश आणि हव्या तशा बेतानेच प्रॉपर्टी घेता आली म्हणून घेणारा डबल खुश.
नाही म्हणायला उघड्यावर पडलेले आणि अजून धुगधुगी असलेले भिंतीतले कोनाडे, शिसवी खुंट्या, स्वैपाकघरातल्या भिंतीतली रंगवलेली फडताळं, एखादी काचेरी खिडकी, सिमेंटचा जिना काही तरी सांगु पहात असतात. पण ऐकायला कुणालाच वेळ नसतो.
पण बहुतांशपणे या अशा खंडहरी घरांचे प्रमुख दरवाजे मात्र शाबुतच असतात, ठेवलेले असतात. काय कारण असेल माहित नाही.
आजपर्यंत मी असे खंडहरी घरांचे मुकपणे रक्षण करणारे साताठ दरवाजे तरी पाहिलेत. कित्येकदा तर चहुबाजूंनी अशा नागवल्या गेलेल्या घराच्या दिंडी दरवाज्याला कुलुपं सुध्दा पाहिलीयेत.
हे दृश्य फार करुण तसंच विचारात पाडणारं असतं.
पाठीशी इतका उध्वस्त केलेला-झालेला मातोडा घेऊन ही दारं आता कुणाचं रक्षण करत असावीत बरं ?
या अशा दारांनीही आत्मकथा सांगायला सुरुवात केली तर काय होईल ?
एक धगधगतं, सकस आणि रोमांचकारी जिवनचरित्रच आपल्याला वाचायला मिळेल.
म्हणजे रोमांचकारी जिवन जगताना माणसाला वैताग येतो, कटकट वाटते, वैफल्य येते.
पण तेच चरित्र पुस्तक रुपाने, कथेच्या रुपाने आपल्यापर्यंत पोहोचलं तर त्याला उत्तम साहित्यिक मुल्य प्राप्त करुन देण्यात आपणच पुढे असतो नाही ?
No comments:
Post a Comment