Monday, 13 May 2019

रंगबिरंगी दुनिया.

रंगबिरंगी दुनिया.

खास महिलांनाच लागणा-या गोष्टींच्या, वस्तुंच्या, कापडांच्या दुकानात सहसा पुरुष विक्रेतेच असतात. प्रासंगिक उदाहरणच द्यायचं तर साड्या, मॅचिंग ब्लाऊज पिसेस, फॉल, परकर, ओढण्या, अंतर्वस्त्रे वा तत्सम गोष्टी.

या अशा दुकानात गेलं की म्हटलं तर तसं फुलपाखरी वातावरण असतं तरीपण एक छुपा ताणही पुरुष सेल्समन आणि खरेदीदार महिलांमध्ये असतो. हा ताण जास्तकरून अंतर्वस्त्रांच्या दुकानात जास्त जाणवतो.
सगळ्यात रंगीन आणि महिलांचच उत्साही-चोखंदळ राज्य असलेलं रंगबिरंगी दुकान म्हणजे मॅचिंग ब्लाऊज पिसेसचं. भरपूरच रंगीत पसारा असतो इथे.
प्लेन कपड्यांच्या तर अक्षरशः हजारोंनी शेडस बघायला मिळतात या दुकानात. नुस्ता एकेक कोपरा जरी निटसपणे पाहिला तरी नजर निवते. आमच्यासारख्या कलावंतांचा तर रंगसंगतीचा भरपूर अभ्यासच होतो.
एकसारखे ठेवलेले, चढत्या वा उतरत्या रंगातले त्या तलम कापडांचे पट अक्षरशः नजर खेचून घेतात. सदासर्वदा चहलपहल-चिवचिवाट असलेली ही दुकानं असतात. त्यात एखादं नामांकित दुकान असेल तर विचारायलाच नको. अक्षरशः नॉन स्टॉप एंटरटेनमेंट.

संध्याकाळी सहसा बाजारात गर्दीच असते. त्यात या अशा मॅचिंगच्या दुकानात तर चिवट गर्दी असते. एकदा आत शिरलेली महिला कपड्यांच्या पाच दहा शेडस पाहिल्याशिवाय आणि कमीतकमी अर्धातास मोडल्याशिवाय या दुकानातून बाहेरच पडू शकत नाही. मग आपल्या राशीला सेल्समन मिळेपर्यंत आपणही निरिक्षण करत बसावं. भलतीच करमणूक होते हो जीवाची. दुकानात शिरणारा एकेक चेहरा निरखावा, उगा त्यावरुन अंदाज बांधावेत, बाहेर जाणा-यांची बॉडी लँग्वेज अभ्यासावी, एकत्र खरेदीला आलेल्या मैत्रीणींच्या चर्चा ऐकाव्यात, गोंधळलेल्या विक्रेतीला दिलेलं सेल्समनचं स्पष्टीकरण ऐकावं, आई-मुलीचा संवाद ऐकावा, दोन सेल्समन मधले फडफडीत आदेश ऐकावेत.
एका व्रतस्थ गुरुंप्रमाणे महिलांना समजुतदारपणे तोंड देणारे हे अल्पशिक्षित, बारा गावचे, चार धर्माचे सेल्समन पाहिले की नाही खुदकन हसू आलं तर आपलं नाव बदलायचं.

एवढ्यातलीच गोष्ट. रमजानचे रोजे, लग्नाचा सिझन आणि उन्हाळी सुट्ट्या. संध्याकाळी बाजारात ही गर्दी.
नामांकित मॅचिंगच्या दुकानात तर विचारु नका.

या..ताई, काय दाखवू तुम्हाला ?
ए..रमेश, ताईंना प्लेनमधले ब्लाऊज पिसेस दाखवं. तिकडच्या काउंटरवर जा ताई. हातावरलं गि-हाईक झालं की तुम्हालाच दाखवेल.

अहो..मला किती सेंटिमीटर कापड घ्यावं लागेल ?
कसं शिवायचं आहे ब्लाऊज ताई ? हाफ स्लिव्हज असतील तर ऐंशी सेमि घ्या.
नसता सत्तर पुरेल.

आहो किती पात्तळ कापड आहे हे, अस्तर लागेल का ?
काही गरज नाही ताई, धुतलं की भरेल हे कापड.
नको, अस्तर द्याचं. ऐंशी द्या.
दिपक..लाल सिल्क ऐंशी, अस्तर ऐंशी..फाड.

ताई..म्याचिंग तसं नाही बघत. आणा ती साडी इकडं.
हं आता बघा. होतंय ना मॅचिंग ? फुलांचा रंग नाही. काठांचा रंग बघा. आहो, काठंच तर समोर येणार आहेत ना ब्लाऊजवर ?
अगदी परफेक्ट म्याचिंग आहे हे. पटलं का ?
बोला किती फाडू ?
बस, एकच ब्लाऊज पिस ? अजून काही नको ?
खण, चिकन, जरी, नेट, रेडिमेड ब्लाऊज ?
भरपूर स्टॉक आहे. बघून तर घ्या. लग्नाचा सिझन आहे. भरपूर माल आलेला आहे.
बरं.. बरं..तुमची मर्जी.
अतूल...निळं केंब्रिक..ऐंशी फाड.

हं..बोल बेटा, तुला ही ओढणी साखरपुड्यात साडीवर शालीसारखी घ्यायची आहे ना ? मग ही नको, ती दुसरी घे. या जाळीदार ओढणीत ओटी, नारळ नाही घेता येणार. तिचं घे.

हं..बोला, एक टु बाय टु काळं आणि पांढर ?
ऐंशी नाही पुरणार मावशी. एकेक मिटर घ्या.
ए...दिपक, काळं-पांढरं टु बाय टु एकेक मिटर फाड.

दिदी आपको क्या होना ?
रेडीमेड ब्लाऊज ? क्या साईज है आपका ?
आपको फोर्टी टू नहीं आयेगा दिदी. मेरा मानो, फोर्टी फोर लेके जावो. नहीं फिटिंग हुवा तो वापस लाओ.
अरे, हमको भी समजता है दिदी. रोज के पचास ब्लाऊजेस बेच रहा हुं.

आहो मॅडम, हल्ली शेडमदी उन्नीसबीस फरक अस्ला तरी काय फरक पडत न्हाई. उल्टा कान्ट्रास्ट ब्लाऊज घालायची फॅशनच आली आहे आता.
विद्या बालन ष्टाईल.
फाडू ?
पिंट्या..हे घे, गुलाबी साऊथ कॉटन, नव्वद फाड.

हां, बोलो? आपको क्या चाहिये ? फॅन्सी ब्लाऊज पिसेस ? उपर जाव, वहां से.
खालूनच वर आदेश देत...अरे कौन है उप्पर ? रफिक..गि-हाईक आ रहा है, फॅन्सी कपडा दिखाना, और चिकनके प्लाजोज भी दिखाना. जा ताई वर.

तेवढ्यात एक एकांडा पुरुष ब्लाऊसपिस घ्यायला येतो.
एक तर आधीच घरवालीने त्याला या महिलांच्या राज्यात ब्लाऊजपिस आणायला पाठवून त्याचं ब-यापैकी खच्चीकरण केलेलं असतं. कसातरी बळ आणून तो दुकानात येतो. तिथल्या त्या सप्तरंगी कापडी भिंती, तटस्थ पण चपळ पुरुष विक्रेते, घुटमळणा-या चोखंदळ बायका, त्यांचे आपापसातले संवाद, त्यांच्या हातातल्या वैविध्यपूर्ण, रंगबिरंगी साड्या आणि काउंटरवर पडलेले रंगीत कापडी डोंगर पासुनच तो हबकतो.
पहिली पाच-दहा मिनिटं तर कुठल्या बाजूच्या काउंटरवर जाऊ आणि कशी जागा मिळवू या विचारातच जातात. मग दुकानातला एखादा बुजुर्ग सेल्समन बेरकीपणाने या भांबावलेल्या पुरुषाला ओळखतो आणि या दादा, काय पाहिजे तुम्हाला ? घरवालीने जेमतेम एक सेंटिमीटर बाय तीन सेंटिमीटरचा एक रंगीत चिंधी या यजमानांना परफेक्ट मॅचिंगसाठी दिलेली असते. ती चिंधी नेमका शर्टाच्या खिशात तळाला जाते. मग तो भांबावलेला प्राणी अख्खा खिसा काउंटरवर उपडा करतो आणि काही नोटा, नाणी, चिठ्ठ्या-चपाट्या, गुटखा, पेन, कार्डच्या चळतीमधनं तो चिंधी-तुकडा विजयी मुद्रेने सेल्समनला देतो. ये ऐसाच कपडा चाहिये.
ऐ... रफिक..सेम टू सेम कपडा धुंड के लाव तो जल्दी.
सर ब्लाऊज के लिये चाहिये ना ? कित्ता सेंटिमीटर दुं ?
आता यजमानांची इथे सपशेल विकेट पडते. या प्रांतात नवखे असल्यामुळे कापड किती आणायचं हे ते विचारायला विसरतात. आणि बायकोचं अख्ख आयुष्य ७०, ८०, १००, ९० सेंटिमीटरच्या मापातच गेल्यामुळे ती ते नेमकं सांगायला विसरते.
आता आली का पंचाईत.
पुरुषांचे कपडे घेताना उंची आणि बांधा कळला की सहसा अंदाज चुकत नाही. आणि अंदाजासाठी दुरुन कुठलाही पुरुष पुरुषाने दाखवणं, for that matter बाईने देखील दुरुन पुरुष दाखवणं गैर वाटत नाही.😉
पण आता आपल्या बायकोच्या ब्लाऊजपीससाठी सार्वजनिक ठिकाणी, समोरच्याला कळेल असं दुस-या महिला न्याहाळणं आणि अंदाज व्यक्त करणं म्हणजे धर्मसंकटच हो.😜
बिचारा खरेदीदार नवरा. सपशेल हार मानतो. अक्षरशः कच खातो आणि म्हणतो दे दो एक मिटर, बाद में लफडा नहीं होना. मग काय स्वत:च्या इज्जतीपुढे विसतीस रुपडे काहीच नाही हो.😝

समोरच्याची नजरेनीच मापं घेणारी, गोंधळलेल्या महिलांना, मुलींना आणि पुरुषांनाही आश्वस्त करणारी, गोड बोलून एकाच्या ठिकाणी दोन चिजा खरेदी करायला भाग पाडणारी ही संयमी पुरुष विक्रेत्यांची फौज पाहिली की नवल वाटतं.
वर्षोनवर्ष पाठीशी हजाररंगी कपड्यांच्या चळती आणि पुढ्यात या बहुरंगी, बहुढंगी महिला आणि फॅशनप्रमाणे बदलत जाणा-या त्यांच्या चोखंदळ आवडी.
सुदृढपणे कसं तोंड देत असतील ही मंडळी ?

अर्थात या दुकानात मुरलेले, मध्यमवयीन समजुदार, संयमी आणि तटस्थ विक्रेतेच काऊंटर सांभाळायला असतात आणि खाली जमिनीवर बसून मापातले कपडे फाडायला मात्र नवखी, तरुण मश्रुमकटवाली मुलं असतात म्हणून बरंय, नसता आक्रितच उभं राहिलं असतं हो.

एकुणातच या दुकानात खरेदी केली तरी रंगीत मजा आहे, नुसतं निरिक्षण केलं तरी सप्तरंगी धम्मालच आहे.
मरगळलेली व्यक्ती इथुन ताजीतवानी, हिरवी होऊनच बाहेर पडत असेल नाही ?
माहौल भी तो वैसाच रंगीन और चुलबुला रहता है न !😀

No comments:

Post a Comment