Wednesday, 8 May 2019

लेकूरे उदंड जाहली.

आपली मुलं लहान असताना आपण मुलं, संसार आणि आपल्या त्याकाळच्या इच्छा यात इतके डुंबलेलो असतो ना की फक्त नाकातोंडात पाणी न जाऊ देता एकेक दिवस कसेतरी हातपाय मारत रहाणे एवढंच आपल्या हाती, मनी असतं.
मुलांच खेळणं-खोड्या, हसणं-रडणं, वाढदिवस-आजारपणं, शाळा-सुट्ट्या आणि मुख्य म्हणजे आसपासच्या परिस्थितीचें भान न ठेवता निरागसपणे वागणं. अक्षरशः आला दिवस कसा मावळतो आणि निभावतो कळतही नाही.

पण मुलं जशी जशी मोठी होत जातात तशी तशी घराला शिस्त लागायला लागते. व्यवस्थितपणाची घडी बसायला लागते. जो तो आपापल्या खोल्यात साम्राज्य उभं करतो त्यामुळे सगळ्यांच्या वापराची घरातलीच एक-दोन ठिकाणं सोडली तर बाकी ठिकाणची काडी सुध्दा हलत नाही म्हटलं तरी चालेल. नकळतपणे ही परीटघडी आपल्याही पचनी कधी पडते ते कळत नाही. आपापल्या आयुष्यात आणि खोल्यात गर्क असलेली विशीच्या पुढची मुलं, आणि या सगळ्या शांत-निवांत वातावरणाला सरावलेलो आपण कुणी लहान मुलं घरात आले की अक्षरशः गांगारुन जातो.
कालच आमच्या दिरांची नातवंड आली होती. ३-७ या वयातल्या तीन मुली. रात्रीचं जेवण होतं.
बापरे ! आल्यापासून जो गोंधळ घालायला सुरुवात केली की विचारु नका. एक तर येतानाच आपली खेळणी घेऊन आल्या. आल्या आल्या तो पसारा. मग पाणी-पाणी झालं. मग तुला-तुम्हाला आजी म्हणू का काकू म्हणूची फैरी झाली. टिपॉयवरचे आमचे सगळे नामी दगडं उलटपालट करुन, टिपॉयवर वाजवून झाले. बीन बॅगवर उड्या मारुन झाल्या. मग बीन बॅग अंगावर घेऊन झाली. खाद्यपदार्थांची सांड लवंड तर अखंड चालूच होती. मनीप्लांटची बरणी फोडली.
खाण्याचे उलटसुलट कार्यक्रम, हट्ट, मग लाईनीत वॉशरुम व्हिजीट. तेवढ्यात मांजरीची पिल्लं दिसली. मग परत एकदा चिरकून हलकल्लोळ. त्यांना घाबरायची, पकडायची चढाओढ. आणि या सगळ्या बेधडक पळापळीत आमच्या घरातल्या पाय-यांच योगदान तर वादातीत आहे.
बापरे यांच्या हालचाली बघूनच डोळे थकले. तरी बरं त्यांचे आईबाप होते बरोबर. पण खरं सांगू का आश्वस्त करणारे आई-वडील बरोबर असलेकीच मुलं इतक्या आत्मविश्वासाने पण सैराटासारखे वागू शकतात. नुसत्या एखाद्या या वयातल्या मुलाला बोलवा बरं, ते मुलं अकाली पोक्त झाल्यासारखं बुजून वागेल.

म्हणजे आपल्या सद्य सहनशक्तीत न बसणारा जरी या मुलांचा गोंधळ असला तरी या मुलांची उर्जा, निरागसता, कुतुहल आणि लवचिकता अगदी भान हरपून बघत बसावी अशी असते. उड्या..उड्या...किती प्रकारच्या आणि किती वेळ उड्या माराव्यात या पोरांनी ?
बापरे !
त्यांच ते छोट्या छोट्या गोष्टींनी आनंदून जाणं, क्षुल्लक गोष्टींनी रडवेलं होतं, क्षणात भांडण, क्षणात प्रेम, क्षणात इकडे तर क्षणात तिकडे, आईवडिलांवरचा विश्वास, प्रचंड ऑब्झर्वेशन-कुतुहल, बेधडक प्रश्न.
खरोखर काय अचंबित करणारी असतात ही निखळ मुलं.
या मुलांना आपल्या पध्दतीने मोठं करणं, वाढवणं आणि एका समाजमान्य खोक्यात बसण्या योग्य करणं म्हणजे एक गुन्हाच आहे.

शेवटी आमची जेवणं कंपॅरेटिव्हली शांत वातावरणात करण्यासाठी या टोळीला टीव्ही समोर बसवून आम्ही एक प्रकारचा गुन्हाच केला. एक चैतन्यदायी शरीर आणि सृजनशील मन एका जोखडात अडकवावं लागलं याचा मला प्रचंड खेद आहे.

निसर्ग आणि लहान मुलं...are the great indirect and innocent preacher of the life. And believe me, they will never let you down.
यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं पाहिजे.

No comments:

Post a Comment