Friday, 3 May 2019

चाकू, कटर्स, चॉपर्स...

बाईमाणसाला-आईमाणसाला कुणी पण बनवू शकतं राव !

आता हेच बघा बाई माणसात नेटका, आटोपशीर संसार करायची खुमखुमी उपजतच असते.
नवीन संसार थाटला की तं त्या स्वैपाक घरात काय करु काय नाही असं होतं. गेलं बाजारात की नवनवीन वस्तु असतातचं मोहात पाडायला. मग हळूहळू संसार मुरतो-वाढतो तशा घरातल्या वस्तुही वाढतात.

म्हणजे सुरवातीला आपलं स्वैपाक घरातलं राज्य एका विळीवर, चाकूवर आणि सोलाण्यावर भागविणारी गृहिणी नंतर नंतर वाढत्या संसाराच्या गरजा लक्षात घेऊन विविध प्रकारचे चाकू, कटर्स, पिलर्स, चॉपर्स जमा करायला लागते. जागतिक खाद्यपदार्थ करुन बघायची खुमखुमी, शाळकरी पोरांचे लेकूरवाळे उदंड वाढदिवस, मित्रमंडळींच्या पार्ट्या-नातलगांची ये जाच्या मंदियाळीत ती खूप साऱ्या गोष्टी हव्यासाने जमवते. पाच पंचवीस लेकरांसह वाढदिवस साजरे करणारे लेकरं कधी मोठे होतात आणि जागतिक पदार्थांसहीत स्वैपाक करायची सुरसुरी कधी विझते ते तिला कळतही नाही.

ह्याला बोलावं, त्याला बोलावं असं करुन वाढदिवस दणक्यात साजरे करुन घेणारं पोरं जरा स्वतंत्र झाली की तिच्याच पर्सवर हजार-दोन हजारांचा डल्ला मारुन चारसहा मित्रांबरोबर कधी वाढदिवस साजरे करायला लागतात हे तिच्या लक्षातही येत नाही.
पण एव्हाना जुन्या चाकू-विळीवर काम करु करु तिच्या हातातच दिसेल ती भाजी म्हणेल तशी कापायचं इतकं हुनर आलेलं असतं की ते वेळोवेळी मोहात पडून घेतलेले, काही परदेशातून गिफ्ट म्हणून आलेले चॉपर्स, कटर्स, श्रेडर्स इत्यादी कत्ते कधी अडगळीत पडतात तिला कळतही नाही.

नंतर तं काय शिंग फुटू लागलेले विशीतले पोरं वाढदिवसाचं जेवणबिवण, नातलगफातलग कोणी नको म्हणतात. पैसे द्या आणि मोकळं व्हा, आम्ही करतो आम्हाला काय पायजे ते असेही वर म्हणतात.

तोपर्यंत आई-बाईचीही संसाराची खुमखुमी स्थिरावली असते.
आपला तो बाब्या सारखं आपलंच वडिलोपार्जित जेवण-आहार योग्य आहे हे पटलेलं असतं. साहजिकच दोनेक फॅन्सी कटर्स-चॉपर्सच्या विकेट्स परत एकदा पडतात. आणि हात बसलेल्या पारंपरिक विळी-चाकूच्या साहाय्याने ती स्वैपाकघरातली खिंड यशस्वीपणे लढवते.

मग मात्र कितीका राडा स्वैपाकाचा पडेना, कितीका वैविध्यपूर्ण पदार्थ करायला लागेनात का एक धारधार विळी आणि एक तेज चाकू असला की कापाकापीची, सोलायची किती का लहान-मोठी नजाकतीने कामं असेना ती लिलया पाहिजे तशी हुकमतीने करु शकते.
इतने साल काम करके हुनर जो आ जाता है.
फिरभी कभी परदेस जाना हुवा तो बाजारसे कुछ तो उठाने दिलतो करताही है ना बाईलोगोंका  ?
बस, हमने भी एक तगडा पिलर उठा दिया था ऑस्ट्रेलियन बाजारसे.
सांगितलं नां, बाई-आईला बनवणं सोप्प असतं ते. घरचे दारचे सगळेच युं घुमा देते है.😔

तर आज सॅन्डविचेससाठी काकडी पील करताना आपला अशा धारीधार गोष्टींवरचा वायफळ खर्च आठवला आणि आपलंही हे कापाकापीचं तेजाळलेलं हुनरही जाणवलं.😊

No comments:

Post a Comment