Thursday, 18 April 2019

सलवार-चुडीदार आणि ऋणानुबंध

ग्लोबल वार्मिंग म्हणा, वाढतं वय (वजनही) म्हणा पण तरुणपणासारखे वाट्टेल ते कपडे घालायला आता मनही धजत नाही, न ही ते शरीराला झेपतं .
स्किन टाईट, जाड्याभरड्या जिन्स, खद्दर खादीचे स्टार्चवाले कुडते, बंद गळे-कॉलर्स, लेगिंग्ज..वगैरे.
आता हा ऊन्हाळ्याचा ताप आहे का वयाचा परिणाम आहे का दोहोंचाही थोडा थोडा परिणाम आहे माहित नाही पण आताशा एखादं कापड-ड्रेस घेताना त्यांच वजन, झुळझुळीतपणा, थंडाईचा फिल याकडेच फार लक्ष दिलं जातं. आणि तसेच हलके-सुटसुटीत कपडे वापरले जातात. साहजिकच खात्यापित्या घरातले सहा-आठ वर्षांपुर्वीचे ड्रेसेस चांगले, प्रेझेंटेबल असुनही या सुसह्य न व्हायच्या कारणाने अडगळीत पडतात.
म्हणजे कपड्याची-ड्रेसची आवड, त्यात घातलेला पैसा-वेळ, त्यावर स्वत: केलेलं भरतकाम हे सगळं जरी जमेस धरलं तरी तो घट्ट, जडशीळ, खळ लावलेला सेल्फ डिझाईन्ड ड्रेस घालावाच वाटतं नाही.
विशेषत: उन्हाळ्यात तर फारच.
पुर्वीतर मी मारे मुंबईत तेही उन्हाळ्यात स्टार्च केलेले खादीचे कुडते आणि पांढरे चुडीदार फार कौतुकाने नेत असे. पण त्या कॉटनच्या क्रिस्पी ड्रेसेसने माझे जे हाल मुंबईने केलेले पाहिले आणि परत स्टार्चचे कपडे, आणि क्रॉस कपड्यातले चुडीदार इथे घालायचे नाही असा कानाला खडाच लावला.

खादीचे -कॉटनचे रंगीत कुडते आणि खाली पांढरी सलवार वा चुडीदार असा माझा साधारणतः पेहराव असतो त्यामुळे माझ्याकडे अक्षरशः डझनांनी पांढरे चुडिदार आणि सलवारी असतात. आणि शिवणाचीही खूप आवड असल्यामुळे निदान या सलवारी-चुडीदार घरीच शिवायची हौसही मी भागावून घ्यायची. वर्षानुवर्षे ठरलेली मापं आणि पॅटर्न त्यामुळे बेतलेली(कापलेली) सलवार-चुडीदार मी वीस मिनिटात शिवू शकायची. पण हळूहळू शिवण कमी झालं निटेड लेगिंग्जची फॅशनही आली. त्यातलाही तत्कालीक सुटसुटीतपणा भावला. मग मोर्चा त्या रेडिमेड लेगिंग्जकडे वळला. परत पाच-सहा पांढ-या लेगिंग्जची भर पडली. बघताबघता कपाटात पांढ-या सलवारी, चुडीदार, लेगिंग्जची ही चळत जमली.
खूप कपडे असले की कपडे टिकतातही खूप हो. आणि न फाटलेले, धडधाकट कपडे टाकवतही नाहीत.
तरी आता वाढतं वय-वजन-ऊन, कुठलेही कपडे सोसायची संपुष्टात येणारी शक्ती यांचा सारासार विचार केला, कंफर्टला झुकतं माप दिलं आणि धडाधड शिवलेले सगळे चुडीदार बाद केले. तसं हे करणं जीवावरच आलं होतं. कारण स्वत: शिवलेले हे कपडे, कुठून कुठून आणलेली शुभ्र सुती कापडं, एका बैठकीत शिवून सलवार हातावेगळी करायचा जोश या सगळ्या आठवणींकडे काणाडोळा करत या सुती क्रॉस कपड्यातल्या चुडीदारांना आणि घोळदार सलवारींना बाद केलं. अक्षरशः डझनांनी. सटीकपणे नाड्या काढून घेतल्या आणि बसले एकेक सलवार-चुडीदार शिवणी धरुन कापत.

आमच्या विशीत फार वेड होतं या खोळ करुन चुडीदार शिवायचं. आईला शिवण यायचंच. पण ही खोळ कशी करतात माहीत नव्हतं. तसंच कमी पन्ह्याच्या कपड्याला कळी लावून जास्त रुंदीची सलवार शिवणं, तसंच बरोबर गुडघ्यावर घडी येईल अशा कमरेच्या घेराच्या प्लिटस घेणं, रुंद-अरुंद पायते, त्यातलं बक्रम, पायत्यांवरच डिझाईन...बापरे केवढ्या खुब्या आहेत साध्या सलवार या प्रकारात.
मुस्लिम मुली खोळीचा चुडीदार घालायच्या. पंजाबी महिला सिंथेटिक पातळ कपड्यांची घोळदार सलवार शिवायच्या.
मी स्वत: मुस्लिम महिलांकडून कळी लावून रुंद सलवार कापायला आणि शिवायला शिकले आहे. एका नामांकित पंजाबी पार्लरवालीचे प्लिटवाले घोळदार सलवार आवर्जून बघीतले आहेत. एवढ्यातच परत क्रॉस कपड्यातल्या खोळीवाल्या चुडीदारचा मागोवा घेतला आहे. आईने ही खोळ बनवायला शिकण्यासाठी केवढी माथापच्ची केली होती तेही आठवतंय.

दहा सलवारी काय कापायला बसले आणि केवढ्या आठवणी उंचबळून वर आल्या. काय त्या रेडिमेड लेग्गिंजचा सोयीस्कर शोध लागला आणि इंडियन सब कॉन्टिनन्टमधली एक अख्खी संस्कृतीच लयाला चालली आहे की.
तर या वैविध्यपूर्ण सलवारी, त्यांच्या फिटिंगला आणि वापराला समर्पक ठरणारी कमी-जास्त रुंदीची सुती-सिंथेटिक, जाड-पातळ कापडं, त्या शिवणाला लागणारं साहित्य, कसब, ते साहित्य विकणारे, ते कसब असणारे शिंपी...एक छोटासा बदलाव आणि एका सृजनशील साखळीलाच घरघर लागली आहे.

हे पायते, या कळ्या, या प्लिटस, हे नेफे, या नाड्या...सगळं आयुष्यातून हद्दपार होतंय, बहुतांशपणे झालंय पण.
एक फार मोठा कार्यासक्त ऋणानुबंध संपुष्टात येतोय.
आता त्या गुलमंडीवरच्या पोरसवदा मुलांकडनं येता जाता नाडीचं बंडल विकत घ्यायचंही प्रयोजन राहीलं नाहीये.
Feeling absolutely disconnected !

No comments:

Post a Comment