अगदी करु करु म्हटलं तरी पुरणपोळी सहजपणे केली जात नाही. अगदी सणांची जंत्री जरी लागली तरी पुरणपोळीचा घाट घालायची हिंमत निदान माझी तरी होत नाही.
पण या पाडव्याला चंगच बांधला आणि केलंच पुरण. आता इथे पुरणपोळीच्या पुर्ण रेसिपी पेक्षा पुरणपोळी न बिघडायचे एक-दोन ठोकताळे सांगते, though I am not an expert and regular puranpoli maker. पण मित्रपरिवारामधे, या ग्रुपमधे पुरणाची इतकी वैविध्य वाचायला मिळतात ना की एॅक्च्युयली आपली पुरणपोळी आपण कशी करु आणि होईल याची कधी ग्यारंटीच नसते.
कुकरमध्ये वा पातेल्यात शिजवलेली, भिजवलेली- न भिजवलेली चनाडाळ, त्यात टाकलेली चिमटीभर हळद, डावभर तेल, चार-सहा-आठ शिट्या, कट काढणं, शिजलेली डाळ पुरणयंत्रात-चाळणीवर-मिक्सरवर- ब्लेंडवर वा पाट्यावर वाटणे. नुस्ता गुळ, नुसती साखर, दोन्ही टाकायचे असल्यास त्याचं सपाटवाटी-शिगभरुनचं प्रमाण, साखर-गुळ कधी टाकायचा, पुरण कसं आणि कितपत शिजवायचं, मग त्यात टाकायचा वेलदोडा-जायफळ-सुंठ याचं प्रमाण आणि कॉम्बिनेशन्स, मग पारीसाठी पिठ भिजवणं. साधी-चाळून कणिक, नुस्ता मैदा, कणिक-मैद्याचं एकत्रित प्रमाण, मीठाची चिमुट, तेलाची वाटी...राम...राम....राम. वाचू तितकं थोडं आहे या पुरणपोळी विषयी. हा असला चौफेर सिलॅबस बघूनच हातपाय गळतात माझ्यासारखीचे.
तरी या पाडव्याला केलीच हिंमत आणि घातलाच पुरणपोळीचा घाट.
हरब-याची डाळ आधी जरा तासभर भिजवून ठेवली मग कुकरमध्ये शिजवून घेतली. हळद-तेल टाकून. नंतर शिजलेली डाळ निथळून घेतली आणि गरम असतानाच मिक्सवर वाटून घेतली. लगेच कढईत वाटलेली डाळ आणि साखर मंद आचेवर शिजवायला ठेवली. अधुनमधून लक्ष देत हायफ्लेमवर पण चटका दिला या पुरणाला. आता हे चटका द्यायचं प्रकरण कधी थांबवायचं यांचा हमखास यशस्वी ठोकताळा सांगते. कढईतल्या पुरणात उलथणं-सराटा सरळ उभा राहिला, कलंडला नाही की पुरण परफेक्ट शिजलं असं समजावं आणि गॅस बंद करावा.
स्वानुभवाचे बोल आहेत हे, फसणार नाहीत
पुराणात जायफळ आणि सुंठ घालते मी सहसा. पण कुठलाच नियम पक्का नाही. गुळाचं पुरण मी स्वत: आजपर्यंत केलं नाहीये फक्त खाल्लय. खमंगच लागतं. पण somehow गुळ म्हटला की मी बिचकतेच. वर्षा दोन वर्षांनी करणा-या पुरणात प्रयोग नको वाटतात.
तसंच ते कणकेचं तंत्र जमलं पाहिजे. मी सहसा कणकेच्याच पुरणपोळ्या करते. कणिक चाळून घेते मग त्यात चिमुटभर मीठ आणि थोडं कच्च तेल टाकून कणिक घट्ट भिजवते. नंतर तो घट्ट गोळा पाण्यात पुर्णपणे भिजत ठेवते. साधारण तासभर तरी. मग पोळ्या करायच्या आधी तो पाणी प्यायलेला बुळबुळीत गोळा सढळपणे तेल वापरत छान तिंबून घेते आणि लगेच पोळ्या करते. सुरेख आणि मऊसुत पोळ्या होतात. मी सुद्धा एवढ्यातच या पध्दतीने कणिक भिजवायला लागले आहे. पण यावेळेस माझ्या स्वैपाकिणीनेही पुरणपोळ्या करताना या कणिक भिजवायच्या पध्दतीला दाद दिली. अजुन काय पाहिजे.
तर वर नमूद केलेल्या ठोकताळ्यांनी पुरण आणि पोळ्या करुन पहा. रिझल्टही शेयर करा.
मी पण इकडून तिकडून ऐकूनच हे ठोकताळे आजमावले आहेत. आणि ते यशस्वीही झालेत.
So sharing it. 🙂
No comments:
Post a Comment