आज पाण्याचा दिवस आहे त्यामुळे योगाक्लासला बुट्टी. योगाक्लासची आणि पाण्याची एकच वेळ आहे. सध्या पाणी दर पाच दिवसांनी येतंय. तेही तासभर. जो तो शेजारी मोटर लावून पाणी ओढून घेतो. त्यामुळे आमच्याकडे थेंबभरही पाणी येत नाही. आणि अगदी आलंच पाणी काही मिनिटांसाठी तरी खालचा हौद, वरची टाकी, प्यायचं पाणी, सोलार टाकी, त्यांचे चालूबंदचे कॉक्स अशा सगळ्या जिने चढून उतरुन, घर-अंगणाची मॅनेजमेंट करुनच मी अर्धमेली होते. नाईलाजाने आम्हीपण एवढ्यात मोटरनेच पाणी खेचून घेत आहोत. घरातले इतर हिरण्यला रहायला गेले आहेत त्यामुळे आज मला योगाक्लासवर पाणी सोडून पाण्यासाठी थांबणं क्रमप्राप्त आहे. मोटरपाशी आणि वर गच्चीत तर पाईप्स आणि कॉक्सचा इतका गोंधळ आहे की आम्हीच गोंधळतो तर बाकीच्यांची काय अवस्था. अजून उगा मोटर जाळून ठेवायचे. पाणीही जायचं, मोटरही जायची. मला तर तो पाचवा दिवस लक्षात ठेवणं देखील कठीण जातं. पण आमच्या औरंगाबादला सहजपणे कुणालाही 'किती वाजले' हे विचारण्यासारखीच मुभा 'आज पाणी आहे ना?' हे विचारायची पण मुहल्लत आहे.
एकमेका सहाय्य करु अवघे भरु सुजल.
सामुहिकपणे फर्रकीनी मोटारी सुरु झालेल्या की समजायचं आलं पाणी म्हणून. पाणी आलं की सगळ्यांचे फटाफट घरांची दारं-खिडक्या उघडल्या जातात. घरातली गाणीबीणी, रेडियो-टीव्ही बंद होतात. धाडधाड मोटारी सुरु होतात. वॉचमनला आरोळ्या सुरु होतात. तमाम घरातल्यांची लगबग सुरु होते. घरातली बाई घरात पाणी भरुन ठेवायच्या मागे लागते. घरातले पुरुष अंगण, हौद, झाडं बघायला लागतात. मुली इतर स्वच्छतेची कामं बघतात. थोडक्यात पाणी येता घरा तोची दिवाळी दसरा असाच सिन आमच्या परिसरात असतो.
बोले तो मोटारींच्या संगितावर एक सार्वजनिक संगित खुर्चीच खेळली जाते.
माझा त्रागा वेगळाच असतो. आयुष्याच्या या टप्प्यावर इतक्या मुलभुत गोष्टींसाठी आपल्याला तडतड करावी लागते यामुळे भयंकर चिडचिड होते. मग आमच्या दोघांतही कडकड होते. आपापल्या खोल्यात सुखनैव झोपलेल्या मुलांचा वैताग होतो.
सुजलाम् सुफलाम देशातल्या एका प्रांतीय राजधानीतल्या एका नागरिकाचा भर उन्हाळ्यात जळफळाट होतो. राज्यकर्त्यांच्या नावे बोटं मोडली जातात. पाण्याबाबतीतल्या अधोगतीचा विचार केला तर तळपायाची आग मस्तकात जाते. आजपर्यंत आपण एक नागरिक म्हणून याबाबतीत काहीही करु शकलो नाही, केलं नाही म्हणून अंगाची लाही लाही होते. असंवेदनशील राज्यकर्त्यांना निवडून द्याव लागतं म्हणून जिवाचा तिळपापड होते...नको नको ते विचार मनात, डोक्यात येऊन डोक्यात राख घालून घेतली जाते, मस्तकात तिडीक जाते... थोडक्यात भरपूरच कॅलरीज हे पाणी भरताना बर्न होतात. त्यामुळे योगाक्लास बुडवल्याच दु:ख थोडंतरी शितल होतं.
तर असो.
हे सर्व लिहिस्तवर एक प्रसन्न सकाळ करपली. योगाक्लास बुडाला. आणि चक्क पाणी आलंच नाही. उद्या येणार आहे म्हणे.
परत एकदा संताप, जळफळाट, तिडीक, राख, राग, उद्वेग, लाहीलाही, तिळपापड, सणक, वैताग, श्राप, तळतळाट अशा भावना शरीरभर फैलावल्या आणि बारा सुर्य नमस्कारा इतक्या कॅलरीज बसल्या ठिकाणी बर्न झाल्या.
No comments:
Post a Comment