Tuesday, 9 April 2019

शिंगाडे शेव.

उन्हाळा म्हटलं किंवा लहानपणीची वाळवणं आठवतात आणि आपसूकच पाय उन्हाळी वाळवणाच्या प्रदर्शनाकडे वळतात. पुर्वी घरोघर वाळवणं व्हायची.
पण मधल्याकाळात शहरातून वाळवणं करणं बादच झालं तरीपण घरोघरचे ग्रामीण भागातले सासर-माहेरचे नातलग या शहरी गणगोतांना आवर्जून त्यांच्या घरातले हाताने बनवलेले खास वाळवणं देत असत. हल्ली तर तिही देवाणघेवाण मोडीत निघाली आहे. पण सोशल मिडिया मुळे या वाळवणांना निदान प्रसिध्दीपुरते तरी बरे दिवस आले आहेत. आणि त्याचाच परिपाक म्हणून हल्ली ठिकठिकाणी या वाळवणांची प्रदर्शनं भरतात. ग्रामीण बचतगट हिरीरीने पदार्थिय, प्रांतीय, थोडीफार जातीय वैशिष्ट्ये असलेली वाळवणं शहरात विकायला आणतात. अगदी गल्ल्यांमधनं पापड, कुरुड्या, पापड्या, खारोड्या विकणारे आहेत. तसेच किराणा दुकानांमधून सुध्दा हरत-हेची वाळवणं मिळतात. कसं का होईना वाळवणी परंपरा सुरु आहे याचं विशेष कौतुक.

तर मागच्या वर्षी आमच्या शहरातल्या धडपड्या महिलांच्या ऑरगॅनिक पदार्थ, धान्य मिळायच्या एका सहकारी दुकानात वाळवण महोत्सव साजरा केला होता. पाहुणे म्हणून मला आमंत्रित केलं होतं. साहजिकच महोत्सवात भरपूर व्हरायटी होती वाळवणांची. माझीही जरा चोखंदळपणे बरीच खरेदी झाली. या सगळ्यांमधे सगळ्यात लक्षवेधी आणि नाविन्यपूर्ण काय होतं तर शिंगाड्यांची शेव. वाळवणाचाच प्रकार आहे हा. मी पहिल्यांदाच पाहिला आणि ऐकला पण. अंबाडी रंगाच्या केसांचा अंबाडा जसा दिसेल तशी ही पांढुरकी पीळदार शेव दिसायला तर फारच आकर्षक होती. तेलात तळून खायची म्हणे. खुप सुंदर लागते असं ऐकलं.

जवळपास सगळ्यांनाच आपला भारतीय उन्हाळा निभावणं फार कठीण जातं. लंबाचौडा गरमीचा उच्चांक गाठणारे दिवस संपता संपत नाहीत.
बाहेर जायची सोय नाही आणि थकव्याने घरकामही उरकत नाही. बस, ढकलायचे दिवस.
पण हां...या दिवसात मला संध्याकाळच्या चहाबरोबर लावलेले मुरमुरे, लाह्या, तळलेला बटाटा किस-चिप्स-पापड्या, साबुदाणा पापडी-चकली असलं स्टार्ची खाणं खुप आवडतं आणि डायट-फायटला तिलांजली देत मी निःसंकोचपणे समाचार घेते या आवडत्या पदार्थांचा. तर आज ती शिंगाड्यांची शेव तळली. एखाद्या मुठीच्या आकारा एवढी गाठी शेव बुडवून तळायला भरपूरच तेल घ्यावं. तेल तापलं की मंद गॅसवर ही शेव तळावी. सरसरुन आणि पटकिनी तळली जाते ही शेव. तळल्यानंतर अतिशय हलकी होते. चवीला तर भन्नाटच लागते. आता शिंगाडे पीठापासून ही वाळवणी शेव कशी करतात माहित नाही. पण खुखुटकलेल्या शेवेचं आंबाड्याच्या गाठीसारखं रुप आणि तळणानंतरची चव अहाहा...छानच प्रकार आहे. तळून डब्यात ठेवली तर घरातले झाडून सगळे येताजाता हात मारतात.

हा वाळवणाचा प्रकार मी केलेला नाहिये. पण या शिंगाड्याच्या वाळवणी शेवेचं अनोखेपण आणि खुमासदार चव यामुळे ही पोस्ट लिहायचा घाट घातलाय.
या विषयी कुणाला अजून जास्तीची माहिती असेल तर नक्की शेयर करा. आणि ही शेव कुठे विक्रीला दिसली तर बिना हिचकिच खरेदी करा.
You will love it.

No comments:

Post a Comment